कागदी घोड्यांत अडकला ‘विश्वस्तरीय रेल्वे स्टेशन प्रकल्प’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:07 AM2021-07-20T04:07:27+5:302021-07-20T04:07:27+5:30
- अजूनही निश्चित झाला नाही युजर चार्ज : रेल्वे बोर्ड, वित्त मंत्रालयाची मंजुरी नाही - लोकमत एक्सक्लुझिव्ह आनंद शर्मा ...
- अजूनही निश्चित झाला नाही युजर चार्ज : रेल्वे बोर्ड, वित्त मंत्रालयाची मंजुरी नाही
- लोकमत एक्सक्लुझिव्ह
आनंद शर्मा / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरचा वर्ल्ड क्लास रेल्वे स्टेशन प्रोजेक्ट कागदी घोड्यांत अडकला आहे. त्यामुळे नागपूरच्या प्रवाशांना विश्वस्तरीय रेल्वे स्टेशनच्या सुविधांसाठी बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.
इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन (आयआरएसडीसी)कडे नागपूर रेल्वे स्टेशनला विश्वस्तरीय बनविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याअनुषंगाने आयआरएसडीसीने २० नोव्हेंबर २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय आर्किटेक्चरल डिझाईन स्पर्धाही घेतली होती. स्पर्धेतील विजेत्या फ्रान्सच्या इनिया कंपनीला १९ जुलै २०१८ रोजी करारान्वये नागपूर स्टेशनचे आर्किटेक्चरल डिझाईन तयार करण्याचे काम सोपविण्यात आले होते. कंपनीने डिझाईन तयारही केले. दरम्यान, जुलै २०२० पूर्वी संबंधित नऊ मोठ्या कंपन्यांनी या प्रकल्पात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आणि निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यास सज्ज झाले होते. परंतु, वर्ल्ड क्लास सुविधा झाल्यावर नागपूर स्टेशनवर प्रवाशांकडून घेतला जाणारा अतिरिक्त युजर चार्ज निश्चित झाला नाही आणि याबाबतचे नोटिफिकेशन जारी झाले नसल्याने निविदा प्रक्रिया रखडली. आता समांतर स्वरूपात रेल्वे बोर्ड आणि केंद्रीय वित्त मंत्रालयाकडे निविदेचा मसुदा मंजूर करण्यासाठी पाठविण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. युजर चार्ज निश्चित होईपर्यंत निविदा मसुद्याला मंजुरी मिळेल आणि त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निर्माण कार्य सुरू होऊ शकेल, असे सांगितले जात आहे.
तारखेत अडकली निविदा
वर्ल्ड क्लास स्टेशनसाठी सप्टेंबर २०२० पूर्वी निविदा जारी होणे अपेक्षित होते. परंतु, युजर चार्ज निश्चित झाले नसल्याने नोटिफिकेशन जारी होऊ शकले नाही. त्यानंतर आयआयएसडीसीच्या दाव्यानुसार जानेवारी २०२१ मध्ये निविदा जारी होणार होती. मात्र, तसे झाले नाही. त्यानंतर निविदेचा मसुदा रेल्वे बोर्ड आणि केंद्रीय वित्त मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल आणि मंजूर होताच निविदा प्रक्रिया सुरू होईल. यात दोन ते तीन महिने जातील, असे सांगितले गेले. परंतु, जुलै २०२१ मध्ये असे होताना दिसत नाही. अशा तऱ्हेने तारखांवर तारखा दिल्या जात आहेत. मात्र, प्रकल्प मार्गी लागताना दिसत नाही.
डिसेंबर २०१९ मध्ये मागविली होती आवेदने
आयआरएसडीसीने नागपूरसह अन्य संबंधित स्टेशन्सच्या पुनर्विकासासाठी डिसेंबर २०१९ मध्ये आवेदने मागविली होती. २५ जून २०२० रोजी ही आवेदने उघडण्यात आली. यातील नऊ कंपन्यांनी नागपूर स्टेशनच्या पुनर्विकासाचे कंत्राट मिळविण्यासाठी सहा आवेदने दिली आहेत. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ३७२ कोटी रुपये आहे. मात्र, यासाठी रेल्वे आणि आयआरएसडीसीमध्ये स्टेशन व्यवस्थापन कराराची प्रक्रिया अद्यापही पूर्ण झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे.
...........