नागपूर विद्यापीठात होणार जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल; राज्य शासनाने दिली मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 09:22 PM2023-03-15T21:22:19+5:302023-03-15T21:22:58+5:30
महाराष्ट्र सरकारने ४४ कोटी ४१ लाख ३८ हजार रुपये इतक्या किमतीच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली आहे.
-आनंद डेकाटे
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात जागतिक दर्जाचे आंतर क्रीडा संकुल साकारले जाणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी वर्ष महोत्सवाच्या निमित्ताने जागतिक दर्जाचे आंतर क्रीडा संकुल उभारण्याकरिता महाराष्ट्र सरकारने ४४ कोटी ४१ लाख ३८ हजार रुपये इतक्या किमतीच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने जागतिक दर्जाचे आंतर क्रीडा संकुल उभारण्याचे प्रस्तावित करीत संकुलाच्या बांधकामासाठी अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याची विनंती केली होती. या कामाची तांत्रिक पडताळणी सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे. उच्चस्तरीय सचिव समितीने मान्यता दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाची किंमत निश्चित केली. त्यानंतर उच्चस्तरीय समितीने याकरिता ४४ कोटी ४१ लाख ३८ हजार इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास चक्रीय पद्धतीने मान्यता दिली आहे.
आंतरक्रीडा संकुलात अशा असतील
सुविधा आंतर क्रीडा संकुलामध्ये इनडोअर बास्केटबॉल, इनडोअर हँडबॉल, जिम्नॅस्टिक एरिना, रेसलिंग एरिना, फेन्सिंग एरिना, ज्युडो, कराटे, इनडोअर कबड्डी, खो-खो, क्वॅश आदी विविध खेळांच्या सुविधा राहणार आहे. या सोबतच ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोर, सेकंड फ्लोर, रेन, रूप वॉटर हार्वेस्टिंग, फर्निचर आणि स्पेशलाईज इक्विपमेंट, फायर फायटिंग अरेंजमेंट, कंपाउंड वॉल इंटरनल रोड, डेव्हलपमेंट ऑफ ग्राउंड, पार्किंग, लँडस्केपिंग अँड गार्डनिंग, लिफ्ट, एअर कंडिशनिंग, ट्रान्सफॉर्मर, सीसीटीव्ही आधी विविध सुविधा या आंतर क्रीडा संकुलामध्ये राहणार आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला शताब्दी महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने जागतिक दर्जाचे आंतरक्रीडा संकुल उभारणीला राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे. अशा प्रकारचे जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल होणारे नागपूर विद्यापीठ हे महाराष्ट्रातील प्रथमच विद्यापीठ ठरणार आहे. खेळाडूंना जागतिक दर्जाचे सुविधा युक्त क्रीडा संकुल उपलब्ध होणार असल्याने महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त करतो.- डॉ. सुभाष चौधरी, कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर