World COPD Day : धूम्रपान न करणाऱ्या ५० टक्के लोकांना फुफ्फुसाचे आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 03:00 PM2021-11-17T15:00:59+5:302021-11-17T15:11:46+5:30
‘सीओपीडी’ विकाराच्या रुग्णांमध्ये धूम्रपान न करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण तब्बल ५० टक्क्यांहून अधिक आहे. धूम्रपानासोबतच चुलीचा धूर, वायुप्रदूषण, घरातील मच्छर अगरबत्ती, औद्योगिक प्रदूषण हेदेखील ‘सीओपीडी’ विकारास कारणीभूत ठरत आहे.
नागपूर : क्रॉनिक ऑब्स्ट्रेक्टिव्ह पल्मोनरी डिसिज (सीओपीडी) हा फुप्फुसांचा आजार धूम्रपान करणाऱ्यांनाच होतो, असे नाही. ‘सीओपीडी’ विकाराच्या रुग्णांमध्ये धूम्रपान न करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण तब्बल ५० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे धूम्रपानासोबतच चुलीचा धूर, वायुप्रदूषण, घरातील मच्छर अगरबत्ती, औद्योगिक प्रदूषण हेदेखील ‘सीओपीडी’ विकारास मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत आहे.
गेल्या दोन वर्षात कोविड-१९ विकारामुळे फुप्फुसांच्या आरोग्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, अजूनही सीओपीडी विकारासंबंधी जनजागृती नसल्याने अर्ध्याहून अधिक रुग्ण आजार बिकट झाल्यावर येतात, असे निरीक्षण ज्येष्ठ श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी क्रिम्स हॉस्पिटलमधील श्वसनरोग विभागातील रुग्णांच्या अभ्यासावरून नोंदविले आहे.
..का होतो सीओपीडी
प्रदूषण, धूर अथवा धूम्रपान आदी कारणांनी कार्बन मोनोक्साइड, सल्फर डायऑक्साइड, धूलिकण अथवा अन्य कण श्वासाद्वारे प्रवेश करतात. फुप्फुसात ‘ॲल्विओलाय’ नामक घटक रक्तात ऑक्सिजन सोडण्याचे व कार्बन डायऑक्साइड शोषून घेण्याचे कार्य करते. हे प्रदूषित घटक त्या ‘ॲल्विओलाय’वर आघात करून त्याचा घेर वाढवितात. त्यामुळे फुप्फुसाची लवचिकता कमी होते. शरीराला पुरेसा प्राणवायू मिळत नाही. कार्बन डायऑक्साइडचे योग्य पद्धतीने उत्सर्जन होत नाही.
- ‘सीओपीडी’चा सर्वाधिक धोका यांना
साधारणत: चाळिशी किंवा पन्नाशीनंतर आजाराला सुरुवात होते. जे लोकं सतत प्रदूषणयुक्त वातावरणात फिरत असतात, धूम्रपान व तंबाखूचे व्यसन करतात, जाळण्याच्या धुराशी प्रत्यक्ष संपर्कात असतात, कारखान्यामध्ये अथवा धूरयुक्त वातावरणात आपला वेळ अधिक घालवतात, त्यांना हा ‘सीओपीडी’ होण्याचा धोका सर्वाधिक असतो.
- ही आहेत लक्षणे
: सीओपीडीच्या लक्षणांमध्ये सुरुवातीला अधून मधून सर्दी, खोकला होतो.
: सर्दी-खोकल्यास बरे होण्यास वेळ लागतो.
:: कफ चिकट असतो; पण निघत नाही.
:: कालांतराने दम लागणे सुरू होते. तो कायमस्वरूपी राहतो.
:: उपचारपद्धती ही दम्याप्रमाणे इनहेलर थेरपी व औषधोपचार हीच आहे.
-सीओपीडी होऊ देऊ नका
फुप्फुसांचे विकार वाढले आहेत. काही विकारांवर प्रतिबंध शक्य नसले तरी धूम्रपान टाळणे, प्रदूषणापासून दूर राहणे, मोकळ्या हवेत राहण्याचा प्रयत्न करणे व फुप्फुसाचे व्यायाम केल्याने ‘सीओपीडी’ टाळता येऊ शकतो. हा आजार होऊ न देणे हे उपचारांहून फार अधिक हितावह आहे.
- डॉ. अशोक अरबट, श्वसनरोगतज्ज्ञ
-सीओपीडी मृत्यूचे तिसरे मुख्य कारण
बदलती जीवनशैली, शहरीकरण, औद्योगिकीकरण, वाढते प्रदूषण परिणामी श्वसनाचे आजार वाढत असल्याने ‘सीओपीडी’च्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. धूम्रपान करणाऱ्यांमधील ५० टक्के लोकांना हा आजार होण्याचा धोका असतो. जागतिक स्तरावर ‘सीओपीडी’ मृत्यूचे तिसरे कारण ठरले आहे. परिणामी, फुप्फुसांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे.
- डॉ. राजेश स्वर्णकार, ज्येष्ठ श्वसनरोगतज्ज्ञ
:: रुग्णालयातील अभ्यासातून समोर आलेले वास्तव
-क्रिम्स रुग्णालयाने केलेल्या अभ्यासात ७४ टक्के पुरुषांमध्ये तर २६ टक्के महिलांमध्ये ‘सीओपीडी’चा आजार दिसून आला.
-यातील ५० टक्के रुग्ण गंभीर ‘सीओपीडी’ने ग्रस्त आहेत.
- १८ टक्के लोकांना धूम्रपानाची सवय आहे.
- २४ टक्के लोक धूम्रपान करीत होते.
- ५८ टक्के लोक धूम्रपान करीत नव्हते.
- ३२ टक्के रुग्ण नागपुरातील आहेत.
- ६८ टक्के रुग्ण नागपूर बाहेरील आहेत.