वर्ल्ड कॉपीराईट डे; प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांमध्ये सजगता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 09:31 AM2018-04-23T09:31:06+5:302018-04-23T09:31:25+5:30

World Copyright Day; The administrative machinery and the citizens do not have awareness | वर्ल्ड कॉपीराईट डे; प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांमध्ये सजगता नाही

वर्ल्ड कॉपीराईट डे; प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांमध्ये सजगता नाही

googlenewsNext
ठळक मुद्देतीन वर्षांत ‘पायरसी’चे केवळ पाच गुन्हेराज्यात कशी थांबणार ‘पायरसी’ ?‘कॉपीराईट’चा उघडपणे भंग होत असल्याचे ‘आॅफलाईन’ चित्र

योगेश पांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अथक संशोधन व परिश्रमातून तयार झालेल्या बौद्धिक मालमत्तेची वा उत्पादनाची कुणी सहजासहजी नक्कल करू नये साठी ‘कॉपीराईट’ कायद्याचे संरक्षण देण्यात आले आहे. मात्र तंत्रज्ञानाचा उपयोग वाढत असतानाच ‘पायरसी’चे प्रमाणदेखील वाढत असल्याचे दिसून येत आहेत. जागोजागी ‘कॉपीराईट’ कायद्याचा भंग होताना दिसतो.
यासंदर्भात राज्यातील प्रशासकीय यंत्रणा व नागरिक या दोहोंमध्येदेखील उदासीनता दिसून येते. २०१४ ते २०१६ या ३ वर्षांच्या कालावधीत ‘पायरसी’च्या प्रकरणात समाविष्ट असलेल्या केवळ ५ जणांविरुद्धच गुन्हे दाखल करण्यात आले. या आकड्यांवर नजर टाकली असता राज्यात ‘कॉपीराईट’ कायद्याबाबत खरोखर जनजागृतीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होत आहे.
प्रदर्शनाअगोदरच ‘लिक’ होणारे चित्रपट, सहजपणे ‘आॅनलाईन’ उपलब्ध होणारी ‘पायरेटेड कॉपी’ इत्यादी प्रकारच्या ‘सायबर’ गुन्ह्यांची चित्रपट उद्योगाने धास्ती घेतली आहे. परंतु ‘पायरसी’ थांबविण्यासाठी अद्यापही फारशी पावले उचलण्यात आलेली नाही. शेकडो संकेतस्थळे आणि शहरांपासून ते ग्रामीण भागांत रस्त्यारस्त्यांवर हा उद्योग खुलेआमपणे सुरू असल्याचे दिसून येते. मात्र कारवाईचे प्रमाण नाममात्र असल्यामुळे कुणावरही वचक राहिलेला नाही.
‘एनसीआरबी’च्या अहवालानुसार २०१६ साली राज्यभरात ‘सायबर क्राईम’अंतर्गत एकूण २३८० गुन्हे दाखल झाले. यात ‘आयटी अ‍ॅक्ट’अंतर्गत झालेले ३५९ आणि ‘आयपीसी’अंतर्गत दाखल २००६ गुन्ह्यांचा समावेश आहे. यात ‘पायरसी’साठी झालेल्या गुन्ह्याांची संख्या केवळ ३ इतकी आहे. २०१४ ते २०१६ या वर्षांची आकडेवारी पाहिली तर ‘पायरसी’साठी केवळ ५ गुन्हे दाखल झाले.

शहरात बिनदिक्कतपणे ‘कॉपीराईट’चा भंग
धरमपेठ, बर्डी, शनिमंदिर परिसर, गांधीबाग, सेंट्रल एव्हेन्यू, मानेवाडा, रेल्वे स्थानक, कॉटन मार्केट या परिसरांसोबत जवळपास सगळीकडेच मोठ्या प्रमाणात चित्रपट, संगीतासोबतच ‘कॉपीराईट’ कायद्याचा भंग करत संगणक सॉफ्टवेअरचीदेखील विक्री होताना दिसून येते. शिवाय अनेक इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्येदेखील बनावट सॉफ्टवेअरची विक्री सुरू असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर संगणकक्षेत्रातीलच काही व्यापाऱ्यांनी दिली.

तक्रारींचेच प्रमाण कमी
मागील काही वर्षापासून ‘पायरसी’मुळे चित्रपट उद्योग तसेच ‘सॉफ्टवेअर्स कंपन्या’ हैराण आहे. मात्र ‘पायरसी’च्या प्रकरणात जोपर्यंत तक्रार येत नाही, तोपर्यंत पोलिसांकडून कारवाई करण्यात येत नाही. तक्रारकर्त्यांचे प्रमाण नगण्य असते व पोलीसदेखील स्वत:हून पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे ‘पायरसी’अंतर्गत दाखल होणाºया गुन्ह्यांचे प्रमाण कमी असते. याचा अर्थ ‘पायरसी’चे प्रमाण कमी असते असे नाही, असे मत शहरातील ‘सायबर’ तज्ज्ञांनी व्यक्त केले.

‘कॉपीराईट’ म्हणजे काय?
संगीत, नाट्य, कथा, कविता व तत्सम साहित्य व कलाकृती यांच्या संरक्षणासाठी बनविण्यात आलेला कायदा म्हणजे कॉपीराईट अ‍ॅक्ट. चित्रपटकार, नाटककार, साहित्यकार, सिनेमा, संगीतकार यांच्या कामाची नक्कल होऊ नये याकरता ‘कॉपीराईट’चा उपयोग होतो. नवीन काळात संगणक सॉफ्टवेअर्सचादेखील त्यात समावेश करण्यात आला आहे. ‘कॉपीराईट’ कायदा हा मर्यादित कालावधीसाठी असतो.‘ कॉपीराईट’साठी साहित्य किंवा तत्सम गोष्टी ‘ओरिजनल’ हव्यात ही महत्त्वाची अट आहे. आपल्या देशात संगणक सॉफ्टवेअर हे भारतीय कॉपीराईट अ‍ॅक्ट १९५७ अंतर्गत संरक्षित करण्यात आले आहे. विनापरवाना कुठल्याही सॉफ्टवेअरची विक्री करणे, कॉपी करणे, शेअर करणे या बाबींमुळेदेखील कॉपीराईट कायद्याचा भंग होतो.

Web Title: World Copyright Day; The administrative machinery and the citizens do not have awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा