जागतिक सायकल दिवस : नागरिकांमध्ये राबविणार मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 11:00 AM2020-06-03T11:00:13+5:302020-06-03T11:00:40+5:30
सायकलिंगसह आयुष्यात परिवर्तन घडवा, असा संदेश देत पुढील दहा वर्षांत नागपूरला सायकलिंग सिटी बनविण्याचा निर्धार ‘इंडिया पेडल्स’ या सायकलिंगला प्रोत्साहन देणाऱ्या नागरिकांच्या समूहाने व्यक्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सायकलिंगसह आयुष्यात परिवर्तन घडवा, असा संदेश देत पुढील दहा वर्षांत नागपूरला सायकलिंग सिटी बनविण्याचा निर्धार ‘इंडिया पेडल्स’ या सायकलिंगला प्रोत्साहन देणाऱ्या नागरिकांच्या समूहाने व्यक्त केला आहे.
३ जून रोजी विश्व सायकल दिवसानिमित्त ‘सायकल टू बिल्ड द नेशन’ असा संदेश नागरिकांना देत त्यांना सायकल चालविण्यास प्रोत्साहन देण्याचा या ग्रुपचा मानस आहे. सायकल चालवणे, धावणे, चालणे हे सर्व वयोगटातील नागरिकांसाठी कसे उपयुक्त आहे, हे पटवून देणारी ही मोहीम संपूर्ण देशात राबविली जाईल, अशी माहिती प्रो हेल्थ फाऊंडेशन आणि माईल्स अन् मायलर्स एन्ड्युरन्स स्पोर्ट्स अकादमीचे संचालक, प्रसिद्ध सायकलपटू डॉ. अमित समर्थ यांनी दिली. कोरोनानंतरच्या बदलत्या जगात शारीरिक अंतर राखून स्वत:चे आरोग्य सांभाळण्याची गरज असेल. शाळेत, कामावर किंवा खरेदीसाठी जाताना सायकलचा वापर व्हावा. ही बाब लक्षात घेत इंडिया पॅडल्सने ‘सायकल्ािंग हाच जगण्याचा मार्ग’ ही संकल्पना रुजविण्याचा ध्यास घेतल्याचे’ समर्थ यांनी सांगितले.
इंडिया पॅडल्स मोहिमेची सुरुवात म्हणून आज बुधवारी शहरात सायकल रॅली काढण्यात येणार आहे. आयोजनात शहरातील अनेक सायकलपटू सहभागी होणार असल्याची माहिती समर्थ यांनी दिली.