जागतिक नृत्यदिन विशेष; क्वॉरंटाईन म्हणजे 'शॉर्ट टर्म समाधी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 07:00 AM2020-04-29T07:00:00+5:302020-04-29T07:00:08+5:30

शास्त्रोक्त नर्तक मनाच्या तरंगाला साधनेशी जोडून नवा आयाम देतात. तोच नवा आयाम विकसित करण्याची संधी क्वॉरंटाईनने दिली आहे. जणू कलावंतांना हा क्वॉरंटाईनचा काळ म्हणजे शॉर्ट टर्म समाधी होय!

World Dance Day Special; Quarantine is a short term samadhi | जागतिक नृत्यदिन विशेष; क्वॉरंटाईन म्हणजे 'शॉर्ट टर्म समाधी'

जागतिक नृत्यदिन विशेष; क्वॉरंटाईन म्हणजे 'शॉर्ट टर्म समाधी'

Next
ठळक मुद्देनृत्याच्या भावभंगिमांचे होतेय चिंतन

प्रवीण खापरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केवळ हस्तमुद्रा, नेत्राभिनय आणि पदलालित्य म्हणजेच नृत्य हा केवळ भ्रम आहे. नृत्य तेच जे सृष्टीशी निगडित होऊन चराचरातील चैतन्याच्या झऱ्यात स्वत:ला झोकून दिले जाते. सर्वसामान्य व्यक्ती स्वत:चा ताण कमी करत शरिराला सैल सोडतात आणि मनाच्या तरंगात स्वत:ला वाहवत नेतात तर शास्त्रोक्त नर्तक मनाच्या त्याच तरंगाला साधनेशी जोडून नवा आयाम देतात. तोच नवा आयाम विकसित करण्याची संधी क्वॉरंटाईनने दिली आहे. जणू कलावंतांना हा क्वॉरंटाईनचा काळ म्हणजे शॉर्ट टर्म समाधी होय!
कोरोना विषाणूच्या संक्रमणाचे थैमान सारे जग अनुभवतेय. सगळेच लॉकडाऊनमध्ये आहेत. अशात प्रशिक्षणही बंद पडले आहेत. प्रशिक्षण बंद पडले म्हणून शिक्षण बंद पडते, ती कला नव्हे. नित्य घडणाऱ्या घडामोडींचे आत्मचिंतन म्हणजे कला. उलट बंदीशाळेतूनच अभिव्यक्तीचा ऊहापोह होत असतो आणि क्रांती घडते. वनवासात असताना भीषण युद्धाची तयारी करायची म्हणून श्रीकृष्णाच्या आदेशाने अर्जुन दिव्यास्त्र कमाविण्यासाठी स्वर्गात गेला. तेव्हा इंद्राने त्यास गंधर्वाकडून कलेचे प्रशिक्षण घेण्याची आज्ञा केली. सर्व अस्त्रात कला हे सर्वश्रेष्ठ अस्त्र आणि सर्व ज्ञानात कला हे सर्वश्रेष्ठ ज्ञान असते आणि त्याशिवाय योद्धा अपूर्ण असतो.. असे इंद्र म्हणाला होता. यावरून कलेचे स्थान श्रेष्ठ आहे, हे सिद्ध होते. कलेत नृत्याचे स्थान श्रेष्ठ ठरते. अभिनय, संहिता, ताल, लय आणि भावना-संवदेनेचे एकत्रित निरुपण म्हणजे नृत्य. कोरोनाने सगळ्यांनाच एकटे पाडले आहे. एकलेपणाच्या तणावात माणूस जगतो आहे. भविष्यात इतिहास लिहिला जाईल तेव्हा या काळाचे प्री-कोरोना, मिड कोरोना आणि पोस्ट कोरोना असे भाग पाडले जातील. हाच भाग सध्या नृत्यकलेत उतरू पाहत आहे. अनेक नृत्यगुरू आपल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शैलीत साधनेत मग्न होण्याचे आवाहन करत आहेत. त्याच काळात जागतिक नृत्य दिन साजरा होत आहे. एरवी जल्लोष आणि सोहळ्यादाखल साजरा होणारा हा दिन यंदा शांत असणार आहे. नृत्यगुरू शिष्यांना संकट म्हणजेच संधी असल्याचे सांगत आहेत आणि स्वत: कलाविष्कार करण्याचे आवाहन करत आहेत. ऑनलाईन सोहळे रंगत आहेत. हे जग ऑनलाईनचे म्हणून ही सुविधा. अन्यथा, चिंतन हेच सर्वश्रेष्ठ साधन म्हणून साधनेत मग्न होण्याचे आवाहन केले जात आहे.

कोरोना आज आहे उद्या नाही - अवंती हर्षे-काटे
सारेच जण कोरोनामुळे हैराण आहेत. जो तो कोरोना-कोरोना ओरडत आहे. मात्र, त्याहीपलिकडे अस्तित्त्व आहे आणि कला ते अस्तित्त्व जपून आहे. ब्रह्मदेवानेही सृष्टीची निर्मिती करताना जन्म-मृत्यूची संकल्पना मांडली होती. अस्तातून निर्मितीची प्रेरणा देण्यासाठीच कला सादर झाली. कोरोना आज आहे, उद्या नाही. या संकटातून निघताना कलाच महत्त्वाची ठरणार आहे. नृत्य दिनाच्या पार्श्व•ाूमीवर मी सुद्धा जन्म या संकल्पनेवर स्पिरिच्युअल नृत्याविष्कार सादर करत आहे. इतरांनीही रडत बसण्यापेक्षा मिळालेल्या निवांत वेळेचा सदुपयोग कलेची साधना करण्यात घालवावा, असे आवाहन प्रसिद्ध नृत्यांगणा व नृत्यगुरू अवंती हर्षे-काटे यांनी केले आहे.

नृत्य अजूनही सुरूच!
कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्र स्तब्ध झाले आहे. नृत्याचे प्रशिक्षणवर्गही थांबले आहेत. मात्र, नृत्याचे प्रशिक्षणवर्ग फोनवरून सुरू आहे. साध्या फोनवरून गुरु तोडे वगैरे समजावून सांगत असून, प्रशिक्षणार्थी आपल्या साधनेत रमले आहेत. नृत्याशी संबंधित निबंध स्पर्धा, ऑनलाईन नृत्य स्पर्धा राबविल्या जात आहेत. नृत्य दिनाला या नृत्यांजलीने युट्यूब, फेसबूक, इन्स्टाग्राम रंगणार आहेत, हे विशेष.

Web Title: World Dance Day Special; Quarantine is a short term samadhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.