जागतिक मधुमेह दिन; सत्तरीच्या आधीच मृत्यूचे प्रमाण वाढते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2021 07:00 AM2021-11-14T07:00:00+5:302021-11-14T07:00:07+5:30

Nagpur News आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्या माहितीनुसार, रक्तातील वाढलेल्या ग्लुकोजमुळे झालेल्या मृत्यूंपैकी जवळजवळ निम्मे मृत्यू हे वयाच्या ७० वर्षांच्या आधी ओढवतात.

World Diabetes Day; Mortality increases before the age of seventy | जागतिक मधुमेह दिन; सत्तरीच्या आधीच मृत्यूचे प्रमाण वाढते

जागतिक मधुमेह दिन; सत्तरीच्या आधीच मृत्यूचे प्रमाण वाढते

googlenewsNext
ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाचा अहवालमधुमेहाची गुंतागुंत रोखण्यासाठी निदान व उपचार आवश्यक

नागपूर : मधुमेहाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. चीननंतर भारत मधुमेहाची राजधानी ठरू पाहत आहे. आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्या माहितीनुसार, रक्तातील वाढलेल्या ग्लुकोजमुळे झालेल्या मृत्यूंपैकी जवळजवळ निम्मे मृत्यू हे वयाच्या ७० वर्षांच्या आधी ओढवतात. २०१६मध्ये मृत्यूच्या कारणांपैकी मधुमेह हे सातवे प्रमुख कारण होते, असेही या अहवालात म्हटले आहे.

जगभरात सध्या ४२ कोटी ५० लाखांहून अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. वय ४५ किंवा त्यापेक्षा जास्त असेल, मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास असेल किंवा वजन जास्त असेल तर तुम्हाला ‘टाईप-२’ मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. मधुमेहाची गुंतागुंत रोखणे व त्यावर नियंत्रण आणण्यासाठी लवकर निदान व उपचार हीच गुरुकिल्ली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

- मधुमेहावर आहाराचे व्यवस्थापन गरजेचे

मधुमेह तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर म्हणाले, मधुमेहग्रस्तांनी सक्रिय जीवनशैली आत्मसात करावी. यामुळे कॅलरी जळण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होते. याशिवाय, आहारात संपूर्ण धान्य, कडधान्ये व भाज्यांंचा समावेश करायला हवा. हंगामी फळांना प्राधान्य द्यायला हवे. विशेष म्हणजे, प्रतिबंधात्मक आहार असू नये, कारण आहाराचे व्यवस्थापन अयशस्वी होण्यामागे हे सर्वात मोठे कारण ठरते.

- नियमित व्यायामामुळे चयापचय सुधारते

नियमित व्यायामामुळे शरिरातील चयापचय सुधारते आणि इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी होते. व्यायाम चरबी जाळण्याच्या प्रक्रियेला गती देते. तज्ज्ञांनी दर आठवड्याला १५० मिनिटं व्यायामाची शिफारस केली आहे, असेही डॉ. गिल्लूरकर म्हणाले.

- मानसिक आरोग्य सांभाळा

तणाव, चिंता आणि नैराश्य यांचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. हे थेट हार्मोनल चक्रात अडथळा आणतात. ज्यामुळे अनेक आजार होतात. त्याचा रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवरही नकारात्मक परिणाम होतो. निरोगी राहण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, संयम, समर्पण या सर्व गोष्टी आवश्यक ठरतात.

- औषधांशिवाय साखरेची सामान्य पातळी गाठणे शक्य 

‘टाईप २’ मधुमेहावर रामबाण उपचार नाही. परंतु, एका अभ्यासावरून काही लोकांना ते उलट करणे शक्य आहे. आहारात बदल केल्यास, वजन कमी केल्यास व नियमित व्यायामाने औषधांशिवाय रक्तातील साखरेची सामान्य पातळी गाठणे शक्य आहे. आहार संतुलित असल्यास ग्लुकोजची योग्य पातळी राखण्यास मदत होते.

 डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर, फिजिशियन व मधुमेह तज्ज्ञ

 २०३० पर्यंत भारतात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण 

भारतात मधुमेहाचे प्रमाण गतीने वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, २०३०पर्यंत भारतात मधुमेहाचे सर्वात जास्त रुग्ण दिसून येण्याची शक्यता आहे. लहान मुलांमध्ये वाढत्या लठ्ठपणामुळे कमी वयामध्ये ‘टाईप २’ मधुमेह आढळून येत आहे. हे चिंताजनक आहे. अनियंत्रित मधुमेहामुळे डोळे, मूत्रपिंड व मज्जासंस्थेवर (नर्व्ह) परिणाम होतो. हृदयविकार, पक्षाघात आणि पायाचा रक्तपुरवठा कमी होऊन अनेक गुंतागुंत निर्माण होते. या सर्वांना दूर ठेवण्यासाठी मधुमेहाला प्रतिबंध करणे गरजेचे आहे.

- डॉ. परिमल तायडे, मधुमेह तज्ज्ञ व एन्डोक्रायनोलॉजिस्ट

Web Title: World Diabetes Day; Mortality increases before the age of seventy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य