World Doctor's Day; युद्ध आमचे न दिसणाऱ्या शत्रूशी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 10:44 AM2020-07-01T10:44:56+5:302020-07-01T11:28:36+5:30

‘डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने मेयो, मेडिकलचे अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक आणि एम्स संचालकांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा...

World Doctors Day; War with our invisible enemy ... | World Doctor's Day; युद्ध आमचे न दिसणाऱ्या शत्रूशी...

World Doctor's Day; युद्ध आमचे न दिसणाऱ्या शत्रूशी...

Next
ठळक मुद्देबरे होणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ हेच यांचे यशमेयो, मेडिकल, एम्सची दिवस-रात्र सेवा

सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या पहिल्या रुग्णाची नोंद ११ मार्च रोजी झाली आणि त्यानंतर मेयो, मेडिकल व एम्सवरील जबाबदाºया वाढतच गेल्या. साडेतीन महिन्यावर कालावधी लोटला असतानाही या तिन्ही संस्थांचे प्रमुख, वैैद्यकीय अधीक्षक यांनी एकही सुटी घेतली नाही. उलट रात्री-बेरात्री रुग्णसेवा देत आहेत. रोज बारीकसारीक गोष्टींचे नियोजन करून चांगल्यात चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळेच आज राज्यात सर्वाधिक रुग्ण बरे करण्याचा व मृत्यूदर कमी ठेवण्याचा मान या तिन्ही संस्थांना आहे. हे करीत असताना चतुर्थ श्रेणी कर्मचारी, परिचारिका व निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेला त्यांनी प्राधान्य दिले आहे. परिणामी, आतापर्यंत एकही कर्मचारी, परिचारिका किंवा डॉक्टर बाधित झाला नाही, ही त्यांच्या कामाची पावती आहे. रुग्णसेवेत स्वत:ला झोकून दिले असताना कुटुंबाला आपल्यापासून बाधा होऊ नये याचीही काळजी घेत आहे. रुग्णालयातून घरी आल्यावर स्वत:लाच क्वारंटाईन करून घेत आहे. घरी असूनही कुटुंबापासून दूर आहे. याची जाणीव त्यांच्या कुटुंबालाही आहे. यामुळे न दिसणाऱ्या शत्रूच्या या लढ्यात त्यांच्या कुटुंबाचाही तेवढाच वाटा आहे. ‘डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने मेयो, मेडिकलचे अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक आणि एम्स संचालकांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा...

मेडिकल : जगातील सर्वात मोठ्या प्लाझ्मा थेरपी प्रकल्पाचे नेतृत्व
नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होण्यापूर्वीपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या नेतृत्वात तयारी सुरू केली होती. नुकतेच वैद्यकीय अधीक्षक पद स्वीकारलेले डॉ. अविनाश गावंडे यांच्यावर नवीन जबाबदारी आली होती. नव्या रुग्णसेवेला सामोरे जाताना अडचणी येऊ नये म्हणून प्रत्येक गोष्टीचे नियोजन केले. नोडल अधिकारी डॉ. मोहम्मद फैजल यांचीही साथ होती. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपासून ते परिचारिकांना प्रशिक्षण दिले. वॉर्ड २५ ला कोविड वॉर्डाचे स्वरूप दिले. १३ मार्च रोजी पहिल्या दोन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली, तेव्हापासून ते आजपर्यंत केवळ आणि केवळ रुग्णसेवेत व्यस्त आहेत. या साडेतीन महिन्याच्या कालावधीत रविवारी सुटीचा दिवसही ते रुग्णालयात घालवीत आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी व संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनात प्रयोगशाळेची क्षमता वाढवून ७५० वर नेली. २२ दिवसात मध्यभारतातील पहिले कोविड हॉस्पिटल सुरू केले. दीड महिन्यात कोविड आयसीयू सुरू केले. ६०० खाटांच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा सुरू झाल्याने याचा फायदा रुग्णांना होत आहे. आतापर्यंत ७४ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. गंभीर लक्षणे असलेल्या कोविड रुग्णांवरील उपचारातील जगातील सर्वात मोठा प्रकल्प ‘प्लॅटिना प्लाझ्मा थेरपी ट्रायल’चे नेतृत्व मेडिकल करीत आहे. हे एक मोठे यश आहे. डॉ. मित्रा म्हणाले, हे एक ‘टीमवर्क’ आहे. यात सुरक्षा रक्षकापासून ते चतुर्थ श्रेणी कर्मचारी, परिचारिका, निवासी डॉक्टर, वरिष्ठ डॉक्टर यांचे योगदान आहे.

मेयो : पहिल्या रुग्णाच्या सेवेपासून ते ६०० खाटांचे कोविड हॉस्पिटल
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) विकासाला आता कुठे सुरुवात झाली होती. त्यादृष्टीने पावले उचलली जात असताना कोविडचा पहिला रुग्ण मेयोत दाखल झाला. तेव्हापासून ते आजपर्यंत अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया व वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवी चव्हाण, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी पायाभूत सोर्इंचे नियोजन करीत अद्ययावत रुग्णसेवा उभी केली. त्यांच्या मदतीला सर्व विभागाचे प्रमुख, निवासी डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी होते. यामुळे ७४ टक्क्यांपेक्षा अधिक रुग्णांना बरे करून त्यांना घरी पाठविण्यात यश आले. वैद्यकीय सचिव डॉ. मुखर्जी व संचालक डॉ. लहाने यांच्या नेतृत्वात ६०० खाटांचे कोविड हॉस्पिटल तयार झाल्याने रुग्णसेवेला याचा फायदा होत आहे. कोविड चाचणीची गती वाढविण्यात आल्याने त्याच दिवशी चाचणीचा अहवाल उपलब्ध होत आहे. यामुळे रुग्णावरील उपचाराची गती वाढली आहे.

एम्स : रातोरात प्रयोगशाळा सुरू केली, प्रत्येक जिल्ह्यात कोविड चाचणीला वेग दिला
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) संचालक, मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांच्या मार्गदर्शनात कोविड चाचणी प्रयोगशाळेची तयारी सुरू केली होती. परंतु एकदिवशी अचानक मेयोचा प्रयोगशाळेतील यंत्र बंद पडले आणि रातोरात एम्सने ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. याच दरम्यान ‘एम्स’ला ‘मेंटर इन्स्टिट्युशन’चा दर्जा मिळाला. यामुळे प्रत्येक शासकीय रुग्णालयात, विद्यापीठात आणि सिव्हील हॉस्पिटलमध्ये प्रयोगशाळा सुरू करण्याला वेग आला. यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यास मदत झाली आहे. एम्सच्या इमारतीचे बांधकाम सुरू असताना ६० खाटांचा वॉर्ड तर पाच खाटांचे आयसीयू तयार केले. लवकरच प्लाझ्मा थेरपी देण्याची एम्सची तयारी आहे. यासाठी लागणारी यंत्रणा त्यांनी उभारली आहे. ‘लोकमत’शी बोलताना डॉ. दत्ता म्हणाल्या, कोरोनाच्या या युद्धात एम्सच्या प्रत्येक डॉक्टरांपासून ते कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. या सर्वांच्या योगदानामुळे हे युद्ध नक्कीच जिंकू, अशी खात्री आहे.

Web Title: World Doctors Day; War with our invisible enemy ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर