जागतिक अंडी दिवस; शाकाहारी विद्यार्थ्यांची ‘कोंडी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 11:38 AM2018-10-12T11:38:02+5:302018-10-12T11:40:11+5:30
जागतिक अंडी दिवसाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थी व पालकांना अंड्यांचे महत्त्व सांगण्याचा निर्णय घेतला आहे.
आशिष दुबे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जागतिक अंडी दिवसाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थी व पालकांना अंड्यांचे महत्त्व सांगण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात अंड्यांचे वाटप करण्यात येईल. मात्र शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभागाने इतर कुठलाही विकल्प ठेवलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर दुसरा कुठलाच पर्याय नसेल. यामुळे विभाग व शाळा प्रशासनांना पालकांच्या नाराजीचा सामना करावा लागू शकतो. याबाबत शिक्षण विभागाने निर्देश जारी केले आहेत. याअंतर्गत शाळांना विशेष कार्यक्रमाचे आयोजन करायचे आहे. यात विद्यार्थ्यांना अंडी खाण्याचे फायदे सांगण्यात येतील. तसेच त्यांना रोज अंडी खाण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येईल. शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना अंडी देण्यात येतील. मात्र योजनेचा आराखडा तयार करत असताना अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजनात काय देणार याबाबत विचारच करण्यात आलेला नाही. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने विभागातील सर्व प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयांना दिन विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत व शालेय पोषण आहारात अंडी ठेवण्यास सांगण्यात आले आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार शिक्षण विभागाचे निर्देश मिळाल्यानंतर नागपूर जिल्ह्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारा संचालित शाळांमध्ये साडेचार लाख अंडी वाटण्याचे ध्येय निर्धारित करण्यात आले आहे. मात्र हे वाटप दररोज होईल की केवळ एकच दिवस हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. योजनेला प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना देण्यात आली आहे. सर्व शाळांमध्ये आयोजन झाले पाहिजे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
काय आहे कारण ?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांअगोदर कृषी विभागाचे प्रधान सचिव (पणन) अनुप कुमार यांनी शालेय शिक्षण विभागाला पत्र लिहिले होते. यात त्यांनी १९९६ मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय अंडी परिषदेचा हवाला देत राज्यातदेखील १२ आॅक्टोबर रोजी जागतिक अंडी दिवस साजरा करण्याची शिफारस केली होती.पत्रात तामिळनाडू व आंध्रप्रदेशसह अनेक राज्यात शालेय पोषण आहारात अंडी देण्याच्या बाबीचा उल्लेखदेखील होता. या पत्रावर शिक्षण विभागाने राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना दिनविशेष आयोजित करण्याचे निर्देश दिले.
अंडी न खाणाऱ्यांचे काय ?
अनेक विद्यार्थी अंडी न खाणाऱ्या कुटुंबातील आहेत. अशा विद्यार्थ्यांना अंड्यांच्या ऐवजी काय देण्यात येईल, हे शिक्षण विभागाने स्पष्ट केलेले नाही. अंडी खाण्यास नकार देणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर वैकल्पिक आहार देण्यात येणार नाही, असे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
अंड्यांची व्यवस्था होणार कशी ?
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारा संचालित शाळांमध्ये साडेचार लाख अंडी वाटण्याचे ध्येय निर्धारित करण्यात आले आहे. मात्र ही अंडी नेमकी कुठून येतील हे अद्याप ठरविण्यात आलेले नाही. यासंदर्भात जिल्हाच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क करण्यात आला. मात्र खासगी कामात व्यस्त असल्याने त्यांनी कुठलीही माहिती देण्यास असमर्थता व्यक्त केली. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की अंड्यांसाठी ‘पोल्ट्री फार्म’सोबत संपर्क करण्यात आला आहे. याची व्यवस्था शालेय शिक्षण विभागातर्फे करण्यात आली आहे. विभागाने राज्यभरात ३० लाख अंडी वितरित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.