जागतिक पर्यावरण दिन; बांधकामावर नियंत्रण हवे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 10:37 AM2019-06-05T10:37:40+5:302019-06-05T10:39:42+5:30
गेल्या काही दिवसांपासून सूर्याचा प्रकोप जरा अधिकच जाणवायला लागला असून तापमान वाढ सर्वांच्या चिंतेचा विषय ठरत आहे. नागपूरसह विदर्भाच्या तापमानात लक्षणीय वाढ होत असून पर्यावरण तज्ज्ञांना हा प्रश्न भेडसावत आहे.
निशांत वानखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून सूर्याचा प्रकोप जरा अधिकच जाणवायला लागला असून तापमान वाढ सर्वांच्या चिंतेचा विषय ठरत आहे. नागपूरसह विदर्भाच्या तापमानात लक्षणीय वाढ होत असून पर्यावरण तज्ज्ञांना हा प्रश्न भेडसावत आहे. केवळ तापमानच नाही तर प्रदूषणाच्या बाबतही भीतीदायक स्थिती निर्माण झाली आहे. उपराजधानीचा एअर क्वॉलिटी इंडेक्स (वायू गुणवत्ता मानक) १०० च्या पार गेला असून ही स्थिती धोक्याचे संकेत देणारी आहे. या स्थितीवर नियंत्रण आणले नाही तर नागपूरचीही धोकादायक शहरात गणना होण्याची शक्यता येईल, अशी भीती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
कोणत्याही शहराचा वायु गुणवत्ता मानक हा १०० च्या खाली असणे आवश्यक आहे. दिल्ली, कोलकाता, मुंबई, ठाणे व पुणेसह विदर्भातील चंद्रपूर शहराने ही धोक्याची पातळी ओलांडली आहे. आतापर्यंत नागपूरबाबत हा इंडेक्स समाधानकारक होता. मात्र गेल्या काही वर्षात औद्योगिकीकरण व झपाट्याने होणाऱ्या विकासकामामुळे व बांधकामामुळे नागपूरही धोकादायक शहराकडे वाटचाल करीत आहे. यावर्षी शहराने ही धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार २०१९ च्या एप्रिल महिन्यात इंडेक्सने १०० चा आकडा ओलांडला आहे. मंडळाने शहरातील काही भागात केलेल्या गणनेनुसार हिंगणा रोडची स्थिती अत्यंत धोकादायक मोजण्यात आली आहे. हिंगणा रोडवर ६ एप्रिल (एक्युआय ९७) वगळता इतर दिवशी तो वाढला आहे. ५ एप्रिलला १०१ असलेला इंडेक्स १२ एप्रिल रोजी ११०, १३ एप्रिल रोजी ११५ तर पुढचे दिवस आसपास राहून ३० एप्रिलला तो ११६ वर गेला आहे. हीच अवस्था सदर भागातून घेतलेल्या आकडेवारीमध्येही दिसून येत आहे. सदर भागात वायू प्रदूषणाचा इंडेक्स २५ एप्रिल रोजी ११७ पर्यंत पोहचला आहे. आरोग्य विभागानुसार ही स्थिती श्वास घेण्यास त्रासदायक ठरणारी आहे. तसेच हृदय आणि लंग्जचे आजार वाढण्यास आणि लहान मुले व ज्येष्ठांसाठी हानीकारक आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) च्या वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक आणि वायु प्रदुषण नियंत्रण विभागाच्या प्रमुख डॉ. पद््मा राव यांनी या धोक्याचे संकेत दिले आहेत. गेल्या काही वर्षात शहरात प्रचंड प्रमाणात बांधकामे होत आहेत. यामध्ये निवासी घरांच्या बांधकामासह रोड, मेट्रो, उड्डाणपूल, मॉल आदींचा समावेश आहे. वाहनांचे प्रमाणाही प्रचंड वाढले आहे. त्यामुळे प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. यासह दहनघाटातील ज्वलन असो की कचरा जाळण्याची पद्धती, या गोष्टीही प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत. पूर्वी शहराच्या आसपास शेती आणि वनक्षेत्र (बफर झोन) असायचे. त्यामुळे शहरातील कोअर एरियामध्ये होणारे प्रदूषण नियंत्रित राहत होते. मात्र गेल्या काही वर्षात शहराचा विस्तार होत असून सर्वत्र कन्स्ट्रक्शन वाढले आहे आणि यामुळे कोअर एरिया वाढला असून बफर झोन झपाट्याने घटले आहे. त्यामुळे प्रदूषणावर नियंत्रण ठेवणारी नैसर्गिक यंत्रणाच नष्ट झाली आहे. ही बाब अधिक चिंता वाढविणारी आहे.
यावर उपाय आहेत
डॉ. राव यांनी सांगितले की देशातील सर्वच शहराप्रमाणे नागपूरही धोकादायक स्थितीकडे वाटचाल करीत आहे. मात्र शहरातील प्रत्येकाने काही गोष्टी पाळल्या तर ही धोक्याची स्थिती काही वर्षतरी टाळली जाऊ शकते. शहरात जे काही बांधकामे होत आहेत ती विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची असली तरी त्यावर नियंत्रण येणे आवश्यक आहे. बांधकाम टाळले जाऊ शकतात किंवा तसे शक्य नसेल तर बांधकाम करताना तयार केलेले कायदेशीर दिशानिर्देश पाळले जाणे आवश्यक आहे. बांधकाम करताना धुलिकण उडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे व त्यासाठी यंत्रणा करणे बंधनकारक आहे. ते नियम कुणीच पाळत नाही ही खंत डॉ. राव यांनी व्यक्त केली. रस्त्यावर वाहनांची संख्या कमी करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी सार्वजनिक वाहनांचा अधिकाधिक उपयोग करण्याची सवय नागरिकांनी लावावी असे आवाहन त्यांनी केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेवढी शक्य होत असेल तेवढी वृक्षलागवड करणे होय. जेथे रिक्त जागा असेल तेथे वृक्षलागवड व्हावी, रस्त्याच्या बाजूला, दुभाजकांवरही वृक्षांची लागवड अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सिमेंट रस्त्यामुळे तापमान वाढ?
शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंटचे जाळे पसरले आहे. केवळ घरे व मॉलचे बांधकाम नाही तर रस्त्यांचेही सिमेंटीकरण होत आहे. मुख्य मार्ग असोत की वस्त्या सर्वच रस्ते सिमेंटचे केले जात आहेत. यामुळे तापमानात प्रचंड वाढ होत असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांकडून बोलले जात आहे. डॉ. पद््मा राव म्हणाल्या की सिमेंट रस्त्यांमुळे तापमान वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, मात्र याबाबत कुठलेही अधिकृत संशोधन नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र सिमेंटीकरण पर्यावरणाच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे त्या मानतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षलागवडीचे आवाहन त्यांनी केले.