जागतिक पर्यावरण दिन; पर्यावरणपूरक झाडे लावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 10:50 AM2019-06-05T10:50:06+5:302019-06-05T10:51:43+5:30
शतकोटी वृक्ष लागवडीपेक्षा पर्यावरणपूरक झाडे लावण्यावर भर द्यावा, असा सल्ला पर्यावरण क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञांनी दिला आहे.
अंकिता देशकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाढत्या तापमानावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने शतकोटी वृक्ष अभियान राबविले. गेल्या तीन चार वर्षात लावलेले किती वृक्ष जगले, वातावरणावर त्याचा किती परिणाम झाला? याचे कुठलेही माप शासनाकडे नाही. शतकोटी वृक्ष लागवडीपेक्षा पर्यावरणपूरक झाडे लावण्यावर भर द्यावा, असा सल्ला पर्यावरण क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञांनी दिला आहे.
पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, विविध समस्या व संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेऊन पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे. वायू प्रदूषणाचा धोका वेगाने वाढतो आहे. त्यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. जागतिक पातळीवर वायू प्रदूषणाचा धोका उच्चपातळीवर वाढला आहे. प्रदूषणामुळे होणारे विविध आजार, विकार देखील वाढले आहे. वायू प्रदूषणाला कारणीभूत म्हणजे वृक्षतोड. शहरांमध्ये विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. त्याचबरोबर शासन वृक्ष लागवडीचे अभियान राबवित आहे. पण वृक्ष लागवड करताना झाडे कुठली लावावीत, हा देखील महत्त्वाचा भाग आहे.
ज्या झाडांवर पक्ष्यांची घरटी, ते झाड पर्यावरणाचे सोबती
ज्या झाडांवर पक्ष्यांची घरटी आढळतात, ते झाड वायू प्रदूषणापासून बचाव करायला सगळ्यात महत्त्वाचे ठरतात. या झाडांमध्ये पिंपळ, कडू लिंब, पळस, वड या झाडांचा समावेश आहे. भारतीय संस्कृतीमध्ये सणासुदीच्या वेळी झाडांचे महत्त्व सांगितले आहे. या मागचे कारण म्हणजे वर्षातून एकदा तरी आपण या झाडांच्या संपर्कात यावे.
उंबर किंवा औदुंबराचे झाड अशा ठिकाणी वाढते जिथे पाणी खूप प्रमाणात असेल. या झाडाचे महत्त्व म्हणजे हे उष्णता कमी करते. शहरात बांधकामामुळे तापमान वाढले आहे. ते कमी करण्यासाठी या झाडांची लागवड महत्त्वाची ठरू शकते. त्याचबरोबर सप्तपर्णी आणि मेहंदीचे झाडदेखील उष्णता कमी करण्यात मदत करतात. त्या म्हणाल्या की तुळशीचे झाड हे सर्वात उपयुक्त आहे. तुळशीमुळे प्राणवायु आणि ओझोन जास्त प्रमाणात मिळतो. तुळस ही खूप लवकर वाढते आणि कुठेही लावता येते. गुलमोहर आणि चाफा हे झाड सुद्धा उन्हाळ्यात तापमान कमी करण्यासाठी महत्त्वाचे ठरते.
- डॉ. माधुरी वाघ, द्रव्यगुण विभाग प्रमुख,
शासकीय आयुर्वेद महाविद्यालय
देशी झाड लावावीत - डॉ. विजय घुगे
निसर्ग विज्ञान मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय घुगे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत नेत्रवान हा प्रकल्प उभा केला आहे. १००० हेक्टर नापिक जमिनीवर छोटे वन उभारले आहे. निसर्ग विज्ञान मंडळ ४५ गावांसोबत काम करत आहे. डॉ विजय घुगे यांनी रक्तचंदन या झाडाच्या प्रजातींवर काम केले आहे. हे झाड इलेक्ट्रॉनिक रेडिएशन शोषून घेते. ते म्हणतात की वातावरणाला साजेसे झाड ही देशीच असतात. तीच झाडे लावल्यास पर्यावरणाला पोषक ठरतील.