जागतिक पर्यावरण दिन विशेष : उन्हाळ्यात पाऊस, पावसाळ्यात ऊन, निसर्गाचे हे बदल समजेल काेण?
By निशांत वानखेडे | Published: June 5, 2023 10:59 AM2023-06-05T10:59:34+5:302023-06-05T11:01:26+5:30
हवामान बिघडले की आपण बिघडविले? : उन्हाळ्याच्या ९० पैकी ६० दिवस पाऊस
निशांत वानखेडे
नागपूर : गेल्या काही वर्षांत विदर्भच नाही तर महाराष्ट्र आणि देशवासीयांनीही अनुभवलेले हवामानाचे बदल विचार करायला लावणारे आहेत. गेल्या वर्षी पावसाळ्याचा अतितीव्रपणा लाेकांनी पाहिला आहे. मात्र पावसाचा धुमाकूळ आताही सुरूच आहे. अर्धा अधिक उन्हाळा पावसातच गेला. हिवाळ्यातही हीच स्थिती हाेती. निसर्गाच्या लहरीपणाची लाेकांना कल्पना आहे पण हा बदल जरा वेगळा आहे आणि हेच चिंतेचे कारण आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात मार्च ते मे हा तीन महिन्याचा काळ पाहिला तर ९० दिवसात कमीतकमी ६० दिवस एकतर ढगाळ वातावरण किंवा पावसाने हजेरी लावली आहे. ही स्थिती उन्हापासून दिलासा देणारी आहे पण भविष्यात कदाचित विपरीत परिस्थिती असू शकते, कारण गेल्या वर्षीचा उन्हाळा अत्याधिक तापदायक ठरला हाेता. चार ते पाच वेळा उष्ण लाटांनी हाेरपळले आणि विदर्भाची ५ शहरे अनेक दिवस तापमानाच्या जागतिक यादीत चढले हाेती. त्यानंतरचा पावसाळाही प्रचंड त्रासदायक ठरला. अनेक शहरे पुराने वेढली हाेती. विदर्भातच अनेक दिवस पावसाने कहर केला हाेता. हवामान शास्त्रज्ञांच्या मते भविष्यात असे प्रकार आणखी वाढणार आहेत. ‘आयपीसीसी’ने तर हवामान बदलामुळे भारतावरच अधिक संकटाचा इशारा दिला आहे. त्यामुळे आताच सतर्क हाेण्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.
बदल दर्शविणाऱ्या काही घटना
- यंदा मे महिन्यात अमरावती जिल्ह्यात वरुड नदी आणि भंडारा जिल्ह्यात बावनथडी नदीला आलेला पूर.
- गेल्या वर्षी जागतिक क्रमवारीत गेलेले विदर्भातील शहरांचे तापमान यंदा काही माेजके दिवस ४४ अंशावर गेले.
- मे महिन्यात नागपूरसह इतर काही शहरांचे कमाल तापमान २५ अंशापर्यंत खाली आले हाेते.
- गेल्यावर्षी पावसाळ्यात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, काेकणमध्ये पुराने थैमान घातले हाेते.
- यंदा मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक या भागात उन्हाची तीव्रता अधिक जाणवली हाेती.
ऋतूंचा तीव्रपणा वाढला का?
तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, गेल्या काही वर्षात बंगालच्या खाडीत वादळांचे प्रमाण वाढले आहे. या बदलामुळे हिमालयाचे क्षेत्र, उत्तराखंड, लडाख, केदारनाथ, बद्रीनाथ या भागात ढगफुटीचे प्रमाणही वाढले आहे. दक्षिण भारतात तर पाऊस पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. आता तर हवामानाचा अंदाजही बांधणे कठीण झाले आहे. कुठेही कमी दाबाचा पट्टा तयार हाेताे आणि पाऊस पडतो, तर कधी उष्ण लाटा झाेंबतात. तज्ज्ञांच्या मते, विदर्भात ‘हीट आयलँड इफेक्ट’मुळे तीव्र ऊन किंवा तीव्र पाऊस हा ऋतूंचा तीव्रपणा वाढला आहे.
तरी काेळशावरील वीज प्रकल्पांना प्राेत्साहन
जागतिक तापमानवाढ राेखण्यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. प्रदूषणाचे स्राेत हळूहळू बंद करण्याचे लक्ष्य ठरले असून भारताचाही या करारात सहभाग आहे. आहे. मात्र असे हाेताना दिसत नाही. वाहनांचे प्रदूषण कायम आहे. काेळसा आधारित वीज प्रकल्पावरची निर्भरता कमी करून हळूहळू बंद करणे निर्धारित आहे पण आपल्या देशात ते बंद करण्याऐवजी त्यांना प्राेत्साहन दिले जात आहे. काेराडी वीज प्रकल्पाला विस्तारित करून १३२० मेगावॅटची वीज निर्मिती याचेच उदाहरण आहे.