जागतिक पर्यावरण दिन; पृथ्वीला कुठल्याही संरक्षणाची गरज नाही, ती आपली गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2022 08:30 AM2022-06-05T08:30:00+5:302022-06-05T08:30:02+5:30
Nagpur News पृथ्वीला कोणाच्याही संरक्षणाची गरज नाही. ती स्वत:च पुनर्निर्माणाच्या प्रक्रियेत असते, अशी भावना ‘यूएनईपी’ची गुडविल ॲम्बेसेडर प्रख्यात अभिनेत्री दिया मिर्झा हिने व्यक्त केली.
मेहा शर्मा
नागपूर : आपल्याकडे केवळ एकच पृथ्वी आहे आणि तिच्यामुळेच आपले अस्तित्व आहे. पृथ्वीला कोणाच्याही संरक्षणाची गरज नाही. ती स्वत:च पुनर्निर्माणाच्या प्रक्रियेत असते, अशी भावना ‘यूएनईपी’ची गुडविल ॲम्बेसेडर प्रख्यात अभिनेत्री दिया मिर्झा हिने व्यक्त केली. दिया भारतभरातील अनेक महत्त्वपूर्ण पर्यावरणीय अभियानाचा प्रमुख चेहरा असून ती वन्यजीव संवर्धनासाठी कार्य करते. दिया युनायटेड नेशन्ससोबत ग्लोबल वाॅर्मिंग, वन्यजीव सुरक्षा, स्वच्छ वायू, स्वच्छ समुद्र आदी उपक्रमांशी जुळलेली आहे. त्याच अनुषंगाने जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर तिने ‘लोकमत’शी संवाद साधला.
भारतीय संस्कृतीच मुळात निसर्गपूजक आहे आणि हजारो वर्षांपासून निसर्गाशी आपले नाते घनिष्ठ राहिलेले आहे. मात्र, गेल्या ५० वर्षांत आपण पश्चिमेकडील विकासाची व्याख्या आत्मसात करताना त्रिस्तरीय जगाच्या निर्मितीकडे वाटचाल करू लागलो. विकासाची ही शैली भारतीय विचारांना, विकासाच्या व्याख्येशी अनुरूप नाही. विकासाची श्रुंखला निर्माण करताना प्राचीन भारतीय ज्ञान जसे आयुर्वेद, वास्तुविज्ञान आणि पर्यावरणाकडे बघण्याची जिज्ञासा पुन्हा आत्मसात करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याच अनुषंगाने चिपको मूव्हमेंट, ग्रासरूट पिपरसारख्या महत्त्वाच्या चळवळी उभ्या राहिल्या आहेत. जगातील भूभागापैकी २.३ टक्के जागा भारताने व्यापली आहे आणि या लहानशा भूभागावर जगातील दुसरी मोठी लोकसंख्या वास्तव्य करते. त्यामुळे, निसर्गाशी ताळमेळ साधणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त हिरवळ कशी वाढवता येईल, याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे.
उत्तर गोलार्धातील देशांची ऊर्जेची लालसा आज दक्षिण गोलार्धातील देशांना भोगावी लागत आहे. या संकटापासून दूर नेण्याचे सामर्थ्य भारताकडे आहे आणि ते ज्ञानही आपल्याकडे आहे. ऊर्जेच्या बाबतीत अपारंपरिक ऊर्जास्रोतांवर भर देणे ही काळाची गरज आहे. जैविक इंधनाचा वापर कमी करण्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही. त्याअनुषंगाने या उपाययोजनांकडे निधी वळवणे महत्त्वाचे ठरेल. त्यासाठी इतर देशांवर दबाव आणणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने आपल्या पंतप्रधानांनी यूएनईएमध्ये केलेली सौरऊर्जा निर्मितीवर भर देण्याची घोषणा अत्यंत महत्त्वाची असल्याचे दिया मिर्झा म्हणाली. याबाबत जनजागरण विश्वस्तरावर होणे गरजेचे आहे. ‘एक पृथ्वी’ हे यंदाचे घोषवाक्य आहे आणि हे घोषवाक्य आपल्या एका घराच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहे. आपण पृथ्वीशिवाय कुठेही जगू शकत नाही. ही बाब जागतिक नेत्यांनी समजणे, समजावणे आणि कृतीत आणणे गरजेचे असल्याचे दिया म्हणाली.
पर्यावरणाबाबत चित्रपट उद्योगही संवेदनशील
चित्रपट उद्योगातही पर्यावरणाच्या बाबतीत बरेच परिवर्तन दिसून येत आहे. या क्षेत्राने पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा लाभ आपल्या दैनंदिन जीवनातही दिसून येत असल्याचे दिया मिर्झा म्हणाली.
..............