जग अनुभवणार नागपुरी संत्र्याचा गोडवा : नागपुरात १८ जानेवारीपासून वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 08:41 PM2019-01-15T20:41:50+5:302019-01-15T20:56:05+5:30

नागपुरी संत्र्याचे देशभरातच नव्हे तर जगभरात ब्रँडिंग व निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने चार दिवसीय दुसऱ्या जागतिक संत्रा महोत्सवाचे आयोजन १८ ते २१ जानेवारीदरम्यान रेशीमबाग मैदान आणि सिव्हिल लाईन्स येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आले आहे.

World experience Nagpuri orange's sweetness : World Orange Festival in Nagpur from January 18 | जग अनुभवणार नागपुरी संत्र्याचा गोडवा : नागपुरात १८ जानेवारीपासून वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल

जग अनुभवणार नागपुरी संत्र्याचा गोडवा : नागपुरात १८ जानेवारीपासून वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल

googlenewsNext
ठळक मुद्देसंत्रा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधणारचार दिवसीय आयोजन, कार्यशाळा आणि धमाल मस्ती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरी संत्र्याचे देशभरातच नव्हे तर जगभरात ब्रँडिंग व निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने चार दिवसीय दुसऱ्या जागतिक संत्रा महोत्सवाचे आयोजन १८ ते २१ जानेवारीदरम्यान रेशीमबाग मैदान आणि सिव्हिल लाईन्स येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आले आहे.
महोत्सवाचे उद्घाटन १८ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी राहतील तर प्रमुख अतिथी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जा, उत्पादन शुल्क व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, खासदार, आमदार आणि अनेक मान्यवर उपस्थित राहतील. या आंतरराष्ट्रीय महोत्सवात विविध देशातील वैज्ञानिक आणि कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ भाग घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
चार दिवसीय महोत्सवांतर्गत रेशीमबाग मैदानावर कृषी प्रदर्शन तर दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र आणि डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात फूड शो, नाटक, नृत्य, फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि संगीतमय कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. यूपीएल लिमिटेड हे महोत्सवाचे मुख्य प्रायोजक आहेत.
रेशीमबाग मैदानावर कृषी प्रदर्शन, नामांकित कंपन्यांचे स्टॉल आणि कार्यशाळा 


रेशीमबाग मैदानावर कृषीशी संबंधित नामांकित कंपन्यांचे स्टॉल राहणार असून मुख्यत्वे विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संत्र्याची कलम, लागवड आणि दर्जेदार उत्पादन आणि निर्यातीसंदर्भात माहिती देण्यात येणार आहे. १८ जानेवारीला सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणारी समूह चर्चा आणि सीसीआरआय फ्रूट शोचे आयोजन करण्यात येणार आहे. 

१९ आणि २० जानेवारीला संत्र्याच्या ‘नवीन प्रजाती, निर्यात आणि ऑरेंज व्हॅल्यू चेंज’ यावर सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा आणि सीसीआरआय फ्रूट शो होणार आहे. बिझनेस टू बिझनेस अशी संकल्पना राहणार आहे.
२१ जानेवारीला संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत कार्यशाळा, चर्चासत्र आणि फ्रूट शो होणार आहे. सायंकाळी ५.३० ते ७ पर्यंत गायक स्वप्निल बांदोडकर यांचा संगीतमय कार्यक्रम होणार आहे. तसेच निवडक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी पुरस्कार देण्यात येणार आहे.
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात धमाल मस्ती
केंद्रात १८ ते २१ जानेवारीदरम्यान दुपारी २ ते रात्री १० पर्यंत धमाल मस्ती होणार आहे. या कार्यक्रमांमध्ये युवक-युवतींसह सर्वांना भाग घेण्याची संधी आहे. त्याअंतर्गत ‘फूड आणि फ्ली बाजार’चे आयोजन, लाईव्ह म्युझिक परफार्मन्स, स्टॅण्डअप कॉमेडियन शो, कठपुतली शो, कॅण्डी फ्लॉस गर्ल, मिरर मॅन आदींसह अनेक धमाल कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे.
१९ जानेवारीला १२ ते ३ पर्यंत नामांकित शेफ विष्णू मनोहर हे सखींना ‘ऑरेंज हलवा’ तयार करण्याच्या रेसिपी सांगणार आहेत. यात सखींना सहभागी होता येईल.
२० जानेवारीला नामांकित शेफ संजीव कपूर दुपारी १२ ते २ पर्यंत सखींसाठी कार्यशाळा आणि ऑरेंजपासून विविध रेसिपी तयार करणार आहेत. कार्यशाळा सर्वांसाठी खुली आहे. शिवाय यावेळी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या महिलांना घरूनच रेसिपी तयार करून आणायच्या आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.
२१ जानेवारीला गौतम मेहऋषी यांचे कुकिंग वर्कशॉप दुपारी १२ ते ३ पर्यंत होणार आहे. यात डेझर्ट आणि प्लेटिंगचा समावेश राहील. त्याची प्राथमिक फेरी १७ आणि १८ जानेवारीला नागपुरातील विविध हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये होणार आहे.
वसंतराव देशपांडे सभागृहात संगीतमय कार्यक्रम व नाटक
२० जानेवारीला दुपारी १ ते ३ पर्यंत डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात ‘आमचे हिचे प्रकरण’ या मराठी नाटकाचा शो होणार आहे. शो नि:शुल्क आहे.
२० जानेवारीला सायंकाळी ७ ते रात्री १० पर्यंत डॉ. वसंतराव देशपांडे सभागहात सुफी गायक कुतले खान यांचा संगीतमय कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रम नि:शुल्क असून संगीतप्रेमींना भाग घेण्याची आहे.
१९ ला फटाका शो
१९ जानेवारीला रात्री ९ ते १० पर्यंत फुटाळा तलावाजवळ फटाका शो होणार आहे. नागपूरकरांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
२० ला डीएनसीमध्ये ऑरेंज स्ट्रीट
२० जानेवारीला सकाळी ७ ते १० पर्यंत काँग्रेसनगर येथील धनवटे नॅशनल कॉलेजच्या (डीएनसी) मैदानावर ऑरेंज स्ट्रीट कार्यक्रम होणार आहे. त्याअंतर्गत फ्लॅश मॉग, ड्रान्स वर्कशॉप, योगा, झुंबा, सायकल स्टंट, फूटबॉल स्टंट आणि विविध खेळीय कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. यात सर्वांना भाग घेण्याची संधी आहे.
२० ला कार्निव्हल परेड
२० जानेवारीला दुपारी ४ ते ७ पर्यंत कार्निव्हल परेड होणार आहे. यात मोबाईल म्युझिक स्टेटवर आंतरराष्ट्रीय कलावंत कला सादर करतील. परेड वेस्ट हायकोर्ट रोड येथून निघणार आहे.
शाळा व कॉलेज सहभागी होणार
जागतिक संत्रा महोत्सवात आयोजित नृत्य व फॅन्सी ड्रेस स्पर्धेत शाळा आणि कॉलेजचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
वर्कशॉपमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
नामांकित शेफ संजीव कपूर, विष्णू मनोहर आणि गौतम मेहऋषी यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या कार्यशाळेत संत्र्यापासून चविष्ट पक्वान्न तयार करण्याच्या रेसिपी शिकविणार आहेत. या कार्यशाळेत युवक-युवती, महिला-पुरुषांसह सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

Web Title: World experience Nagpuri orange's sweetness : World Orange Festival in Nagpur from January 18

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.