जागतिक नेत्रदान दिवस; नेत्रपेढ्यांना सक्षम करण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 10:31 AM2018-08-25T10:31:42+5:302018-08-25T10:35:03+5:30
भारतात २२५ नेत्रपेढ्या आहेत, यातील केवळ १५ नेत्रपेढ्याच क्षमतेने काम करीत असल्याचे वास्तव आहे. ज्या नेत्रपेढ्या चांगले काम करतात त्यांना शासकीय व खासगी हॉस्पिटल जोडून लक्ष्य दिल्यास अंधत्व निवारणाला गती येणे शक्य असल्याचे नेत्ररोग तज्ज्ञाचे मत आहे.
सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुबुळासंबंधी येणारे अंधत्वाचे प्रमाण हे जगभरात चौथे मोठे कारण आहे. भारतात प्रतिवर्ष दरहजारामागे ७.३ लोक मृत्युमुखी पडतात, मात्र यातील ५२ हजार नेत्रदान करतात. गेल्यावर्षी राज्यात केवळ ५ हजार लोकांनीच नेत्रदान केले. ते प्रत्यारोपणासाठी गरज असलेल्या बुबुळांपेक्षा खूप कमी आहे. नागपूर जिल्ह्याचे चित्रही फारसे चांगले नाही. ‘राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत’ २०१७-१८ या वर्षांत नेत्रदानातून ५४० बुबुळ मिळाले परंतु १३० रुग्णांमध्येच प्रत्यारोपण होऊ शकले. विशेष म्हणजे, नागपूर विभागात सहा नेत्रपेढ्या आहेत परंतु मेडिकल व महात्मे नेत्रपेढी सोडल्यास इतरांकडून प्रभावी कामकाज होत नसल्याने अंधत्व निवारण सत्कर्माला खीळ बसत आहे.
मोतीबिंदू, काचबिंदू, बुबुळ खराब होणे, जीवनसत्वाची कमतरता, मधुमेह, अपघात आदी कारणांमुळे ४० दशलक्ष लोकांना अंधत्व येते. भारतात हे प्रमाण १६ दशलक्ष आहे. यात बुबुळ खराब झाल्यामुळे अंधत्व आलेल्या लोकांची संख्या ११ लाख आहे. भारतात गेल्यावर्षी २६ हजार बुबुळ प्रत्यारोपण झाले. परंतु दरवर्षी याच्या दुप्पट म्हणजे ४० हजार रुग्णांची भर पडते. हे प्रमाण कमी करण्यासाठी दरवर्षी २ लाख ५० हजार बुबुळांची गरज आहे. मात्र ५० हजारच बुबुळ मिळतात, त्यातही ४० टक्के बुबुळ विविध कारणांमुळे वापरणे शक्य होत नाही. भारतात २२५ नेत्रपेढ्या आहेत, यातील केवळ १५ नेत्रपेढ्याच क्षमतेने काम करीत असल्याचे वास्तव आहे. ज्या नेत्रपेढ्या चांगले काम करतात त्यांनाच ठेवून त्यांना शासकीय व खासगी हॉस्पिटल जोडून लक्ष्य दिल्यास अंधत्व निवारणाला गती येणे शक्य असल्याचे नेत्ररोग तज्ज्ञाचे मत आहे.
मेयोमध्ये केवळ ९ प्रत्यारोपण
मेयोच्या नेत्ररोग विभागाला आरोग्य विभागाने ५० बुबुळ संग्रह व ३० बुबुळ प्रत्यारोपणाचे लक्ष्य दिले होते. मात्र, आवश्यक सोई व वरिष्ठांसह निवासी डॉक्टरांचा मोठा ताफा असतानाही केवळ नऊ बुबुळ प्रत्यारोपण झाले.
मेडिकल, महात्मे नेत्रपेढीमध्ये सर्वाधिक बुबुळ प्रत्यारोपण
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागाच्या नेत्रपेढीला २०१७-१८ वर्षात ७४ बुबुळ मिळाले. यातून ४८ लोकांचे अंधत्व दूर करण्यात आले. महात्मे नेत्रपेढीला १८२ बुबुळ मिळाले यातून ३६ लोकांचे अंधत्व दूर करण्यात आले. आय केअर एनकेपी साळवे इन्स्टिट्यूटला ९६ बुबुळ मिळाले यातून २० लोकांचे तर सुरज आय इन्सिट्यूटला १७ बुबुळ मिळून ८ लोकांचेच अंधत्व दूर करण्यात यश आले.
गेल्या तीन वर्षांपासून लक्ष्य अपूर्णच
‘राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत’ २०१५-१६ या वर्षांत सहा नेत्रपेढ्यांसह तीन रुग्णालयांना ६५० बुबुळ प्रत्यारोपणाचे लक्ष्य दिले होते. यांना ४५२ बुबुळ मिळाले यातील ९५ लोकांचे अंधत्व दूर झाले. २०१६-१७मध्ये ६५० लक्ष्य दिले होते. ५६९ बुबुळ मिळून ९९ लोकांचे अंधत्व दूर झाले. गेल्या वर्षी म्हणजे २०१७-१८मध्ये लक्ष्य तेवढेच होते, ५४० बुबुळ मिळाले असलेतरी १३० लोकांनाच दृष्टी मिळू शकली.
‘नॅशनल कॉर्निअल ग्रीड’ झाल्यास नेत्रपेढ्या एका छताखाली येतील. त्यांच्या कामकाजात सुसूत्रता येईल. कोणत्या नेत्रपेढीत किती बुबुळ उपलब्ध आहेत, प्रतीक्षा यादी किती लोकांची आहे, याची माहिती उपलब्ध होऊन जास्तीतजास्त बुबुळ प्रत्यारोपण होतील.
- डॉ. अशोक मदान, विभाग प्रमुख, नेत्ररोग विभाग, मेडिकल.