जागतिक दृष्टिदान दिन; अंधत्व रोखण्यात विदर्भ आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 09:50 AM2019-06-10T09:50:03+5:302019-06-10T09:50:59+5:30
आरोग्य विभागाने २०१८-१९ या वर्षात लोकसंख्येच्या आधारावर प्रत्येक जिल्ह्याला मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिले होते. यात भंडारा जिल्ह्याने १९७ टक्के लक्ष्य गाठत राज्यात प्रथम स्थान पटकविले आहे.
सुमेध वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतात मोतीबिंदू हे अंधत्वाचे मुख्य कारण आहे. दरवर्षी मोतिबिंदूमुळे अंधत्व येणाऱ्याची सरासरी काढल्यास ती साधारण ७२ टक्के आहे. मोतीबिंदूमुळे येणारे अंधत्व रोखण्यासाठी सरकारने ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ मोहीम हाती घेतली आहे. आरोग्य विभागाने २०१८-१९ या वर्षात लोकसंख्येच्या आधारावर प्रत्येक जिल्ह्याला मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिले होते. यात भंडारा जिल्ह्याने १९७ टक्के लक्ष्य गाठत राज्यात प्रथम स्थान पटकविले आहे. तर पहिल्या पाचमध्ये गोंदिया, नागपूर, चंद्रपूर व अमरावतीचा जिल्ह्याचा समावेश आहे. सर्वात कमी लक्ष्य गाठणारा पालघर जिल्हा आहे.
बुबुळासंबधी येणाऱ्या अंधत्वाचे प्रमाण हे जगभरात अंधत्वाचे चौथे मोठे कारण आहे. विशेषत: मोतीबिंदूमुळे येणारे अंधत्व टाळता येणारे आहे. एकट्या महाराष्टष्ट्रात सुमारे १७ लाख मोतीबिंदू रुग्णांच्या शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत. यातील सुमारे पाच लाख रुग्णांवर तातडीने मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. याला ‘राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमां’तर्गत दरवर्षी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या व एनजीओ हॉस्पिटल्सना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिले जाते. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी शासनाकडून निधी व साहित्याचा पुरवठाही केला जातो. गेल्या वर्षात आरोग्य विभागाने राज्यातील ३५ जिल्ह्यांना त्यांच्या लोकसंख्येनुसार लक्ष्य दिले होते. यात भंडारा जिल्ह्याने १९७ टक्के लक्ष्य पूर्ण करून मोतीबिंदू शस्त्रक्रियेत प्रथम स्थान पटकाविले आहे. तर दुसºया स्थानावर १७७ टक्के लक्ष्य पूर्ण करणारा गोंदिया जिल्ह्या, तिसºया स्थानावर १४८ टक्के लक्ष्य पूर्ण करणारा नागपूर जिल्हा, चौथ्या स्थानावर १४६ टक्के लक्ष्य पूर्ण करणारा चंद्रपूर जिल्हा तर पाचव्या स्थानावर १३६ टक्के लक्ष्य पूर्ण करणारा अमरावती जिल्हा आहे. त्या खालोखाल यवतमाळ जिल्ह्याने १२४ टक्के, अकोला जिल्ह्याने १२२ टक्के, लातुर जिल्ह्याने १७७ टक्के, बिड जिल्ह्याने ११३ टक्के तर मुंबईने १०९ टक्के लक्ष्य पूर्ण केले आहे.
आरोग्य विभागाने राज्यातील ३५ जिल्हे मिळून १६५६९९ लक्ष्य दिले होते. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने ४२४५५ तर जिल्हा रुग्णालय, उप-जिल्हा रुग्णालय व इतरही केंद्र मिळून ८९१०० असे एकूण १३१५५५ शस्त्रक्रिया केल्या. दिलेल्या लक्ष्याचा ७९ टक्के लक्ष्य पूर्ण करण्यास यश आले आहे.