जागतिक कुटुंब दिन : अख्या कुटुंबानेच केलाय अवयवदानाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 11:57 PM2019-05-14T23:57:47+5:302019-05-14T23:58:49+5:30
काही कुटुंब एखाद्या व्यवसायाला समर्पित असतात, काही क्रीडा क्षेत्राला, नाट्य क्षेत्राला किंवा सिनेमा क्षेत्राला वाहून घेतलेले कुटुंब आपल्या पाहण्यात येतात. काहींनी सामाजिक संवेदना जपत समाजसेवेच्या माध्यमातून मानवतेच्या ध्येयाला वाहून घेतले आहे. याच सामाजिक जाणिवा जोपासणारे नागपुरातील मेश्राम कुटुंबाने अवयव दानाचे मानवतावादी ध्येय स्वीकारले आहे. अख्या कुटुंबाने अवयवदानाचा संकल्प केला असून ७५ वर्षाच्या आजोबांपासून दोन वर्षाच्या नातवापर्यंत कुटुंबातील २८ सदस्यांनी अवयवदानाचे संकल्पपत्र भरून घेतले. या कुटुंबाने इतरांनाही प्रोत्साहित करण्याचा विडा उचलला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काही कुटुंब एखाद्या व्यवसायाला समर्पित असतात, काही क्रीडा क्षेत्राला, नाट्य क्षेत्राला किंवा सिनेमा क्षेत्राला वाहून घेतलेले कुटुंब आपल्या पाहण्यात येतात. काहींनी सामाजिक संवेदना जपत समाजसेवेच्या माध्यमातून मानवतेच्या ध्येयाला वाहून घेतले आहे. याच सामाजिक जाणिवा जोपासणारे नागपुरातील मेश्राम कुटुंबाने अवयव दानाचे मानवतावादी ध्येय स्वीकारले आहे. अख्या कुटुंबाने अवयवदानाचा संकल्प केला असून ७५ वर्षाच्या आजोबांपासून दोन वर्षाच्या नातवापर्यंत कुटुंबातील २८ सदस्यांनी अवयवदानाचे संकल्पपत्र भरून घेतले. या कुटुंबाने इतरांनाही प्रोत्साहित करण्याचा विडा उचलला आहे.
प्रा. सुशील मेश्राम हे या कुटुंबातीलच एक प्रमुख सदस्य. त्यांच्या पुढाकारामुळेच संपूर्ण मेश्राम कुटुंबाने समाजासमोर एक आदर्श घालून दिला आहे. प्रा. सुशील मेश्राम हे सक्करदरा येथील सेवादल महिला महाविद्यालयात मराठी विभागाचे विभाग प्रमुख आहेत. पाच वर्षांपूर्वी त्यांनी अवयवदानाचा संकल्प केला. यासाठी आपल्या कुटुंबीयांनाही तयार केले. त्यांचे वडील गंगाराम मेश्राम, त्यांचे दोन भाऊ चंदू मेश्राम व गोपाल मेश्राम त्यांच्या पत्नी, मुले, नातवंड असे २८ जणांचे त्यांचे संयुक्त कुटुंब आहे. सर्वात लहान कुशल विशाल मेश्राम आहे. या सर्वांनीच मिळून अवयवदानाचा संकल्प केला असून रीतसर संकल्प पत्रही भरून घेतले आहे.
प्रा. सुशील यांनी केवळ भावनेच्या भरात येऊन अवयवदानाचा संकल्प केलेला नाही. तर याचा बारीक अभ्यास केला. त्यानंतर देहदान, नेत्रदान आणि अवयवदानाच्या जनजागृतीसाठी काम करण्याचा निर्णयसुद्धा घेतला आहे. त्यांनी आतापर्यंत तीन हजारावर नागरिकांना प्रेरित करून त्यांच्याकडून देहदान संकल्प फार्म भरून घेतले आहेत, इतकेच नव्हे तर महाविद्यालयीन विद्यार्थिनींनाही यासाठी प्रेरित केले आहे. अशा दीड हजारावर विद्यार्थिनींनी संकल्प पत्र भरलेले आहेत.
लोकमतमुळेच मिळाली प्रेरणा
प्रा. सुशील मेश्राम यांनी सांगितले, ५ ऑगस्ट हा जागतिक अवयवदान दिवस आहे. २०१५ साली लोकमतने या दिवशी एक विशेष पान प्रसिद्ध केले होते. त्यात त्यांनी लोकांना अवयवदानाचे महत्त्व समजावून अवयवदान करण्याचे आवाहन केले होते. आपण त्या वृत्ताने खूप प्रेरित झालो आणि अवयवदानाचा संकल्प केला. परंतु त्यानंतर माझ्या महाविद्यालयाने माझा सन्मान केला. समाजाकडून मला जे प्रोत्साहन मिळाले, त्यामुळे मला नवी दृष्टी मिळाली. अवयवदान, नेत्रदान आणि देहदानाच्या चळवळीत मी स्वत:ला झोकून दिले. अनेक प्रतिष्ठित लोकांकडूनही मी देहदान व नेत्रदानासह अवयवदानाचा संकल्प करून घेतला आहे.
मानवता, बंधुता आणि समतेची शिकवणही
रक्तदान, अवयवदान, देहदान व नेत्रदान ही चळवळ केवळ दानासाठी प्रोत्साहन करण्यापूर्ती मर्यादित नाही, तर ही तथागत गौतम बुद्धांची मानवतेची शिकवण आहे. या चळवळीच्या माध्यमातून संविधानाला प्रेरित असलेली बंधुता व समता समाजात प्रस्थापित करण्याचाही एक प्रयत्न असल्याचे प्रा. सुशील मेश्राम यांचे म्हणणे आहे.