जागतिक प्रथमोपचार दिन; प्रथमोपचार करणे माणुसकीचे लक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 10:30 AM2018-09-11T10:30:07+5:302018-09-11T10:33:02+5:30
अपघातग्रस्तांना प्रथमोपचाराची नितांत गरज लक्षात घेऊन नागपुरातील एका ध्येयवेड्या तरुणाने ही माणुसकी पेरण्याचाच विडा उचलला.
सुमेध वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अपघात हा कसा व कुठे होईल हे सांगता येत नाही. अपघातानंतर लगेच मिळालेला प्रथमोपचार अगदी लाखमोलाचा ठरू शकतो. यामुळे प्रथमोपचाराबद्दल पूर्ण माहिती असणे हे सर्वसामान्य नागरिकांचे कर्तव्यच नाही तर सच्चा माणुसकीचे लक्षण आहे. अपघातग्रस्तांना प्रथमोपचाराची नितांत गरज लक्षात घेऊन नागपुरातील एका ध्येयवेड्या तरुणाने ही माणुसकी पेरण्याचाच विडा उचलला. चौकाचौकातील पानठेला चालकांपासून ते आॅटोचालक, शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, खासगी व शासकीय संस्थामधील कर्मचाऱ्यांना प्रथमोपचाराचे धडे देत सुटला. यातील अनेक लोक आज अपघातग्रस्तांसाठी देवदूत ठरत आहेत.
राजू वाघ त्या तरुणाचे नाव. रस्त्यावर अपघात झाल्यास धावून जाणारा माणूस, अशी त्याची ओळख. अपघात झाल्यानंतर जखमीसाठी पहिला एक तास महत्त्वाचा असतो. या तासभरात प्राथमिक उपचार करून डॉक्टरांपर्यंत पोहोचविण्याचे अमूल्य कार्य तो गेल्या अनेक वर्षांपासून धन्यवादाचीही अपेक्षा न करता करीत आहे अपघातानंतर रस्त्यावर तडफडत कुणाचा जीव जाऊ नये एवढाच त्या मागचा उद्देश. जास्तीत जास्त लोकांची अपघातग्रस्तांना मदत व्हावी यासाठी प्रथमोपचाराचे प्रशिक्षण केंद्रच त्याने उघडले आहे. याला ‘जीवन सुरक्षा प्रकल्प’ नाव दिले आहे. गेल्या १८ वर्षांपासून या संस्थेच्या माध्यमातून शेकडो अपघातग्रस्तांचे जीव वाचविले जात आहे. आकड्यात सांगायचे झाल्यास पाच हजारापेक्षा जास्त अपघातात संस्थांच्या लोकांनी मदत केली आहे.
‘जीवन सुरक्षा प्रकल्प’ जीव वाचविण्याचा उद्देश
‘लोकमत’शी बोलताना वाघ म्हणाले, आजही रस्त्यावर अपघात झाला की,नागरिक जमा होतात. आपल्या ओळखीचा कुणी आहे का ते पाहतात, आणि हळहळ व्यक्त करून आल्यापावली निघून जातात. अपघातग्रस्त तडफडत असतो. बघ्यांची गर्दी असते. पोलिसांचा ससेमारा लागेल या भीतीने कुणीच समोर येत नाही. काही जण सामाजिक कार्यकर्त्यांचा आव आणतात. जखमीशी घिसडघाई करतात. आॅटोरिक्षामध्ये कोंबतात आणि रुग्णालयात पाठवितात. अशावेळी जखमींना मदत होण्यापेक्षा जीवावर बेतण्याची शक्यताच अधिक असते. या दोन्ही प्रकारांवर उपाय शोधून काढण्यासाठी व अपघातग्रस्तांचा जीव वाचावा या उद्देशाने ‘जीवन सुरक्षा प्रकल्प’ हाती घेतला.
प्रत्येकाने देवदूत व्हावे एवढीच अपेक्षा
वाघ म्हणाले, प्रथमोपचाराची माहिती चौका-चौकातील चहा टपरी, पानठेले, हॉटेल्स, किरकोळ दुकानदारांना देताना अपघाताला मदत केल्यास पोलिसांकडून कुठलाही त्रास होत नाही येथून सुरुवात करतो. का मदत करावी, कशी मदत करावी, प्रथमोपचार कसा करावा याची प्राथमिक माहिती देतो. तज्ज्ञ डॉक्टरांकडून जे प्रशिक्षण घेतले त्यानुसार जखमी अपघातग्रस्तांना कसे उचलावे, हाड मोडले असेल तर रुमालने कसे बांधावे, खूप रक्तस्राव होत असेल तर कापडाने कसे घट्ट बांधावे, डोक्याला मार लागला, कानातून रक्तस्राव होत असेल, अपघातग्रस्त मृच्छित अवस्थेत असेल तर काय काळजी घ्यावी, या बाबत प्रशिक्षण देतो. अपघातग्रस्तांची मलमपट्टी करण्यासाठी दुकानदारांना प्रथमोपचाराची पेटी देतो, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, एक जीव वाचविण्याचा, उद्ध्वस्त होणारे त्याचे कुटुंब वाचविण्याचे समाधान म्हणजे काय असते, तो अनुभव शेअर करतो. यामुळे या प्रकल्पाशी लोक जुळत आहे. परंतु रोज होणारे अपघात व मदतीचे हात पाहता ते अल्प ठरतात. प्रथोमपचार हा रुग्णांसाठी एकप्रकारे देवदूतच ठरत असल्याने प्रत्येकाने ते व्हावे एवढीच अपेक्षा आहे.