जागतिक श्रवण दिन; धूम्रपानामुळे येतो बहिरेपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 06:00 AM2020-03-03T06:00:00+5:302020-03-03T06:00:02+5:30
नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने धूम्रपान करणाऱ्या व धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये श्रवण दोषाच्या प्रमाणाचे शास्त्रीय मोजमाप करण्यात आले. धूम्रपान न करणाऱ्याच्या तुलनेत धूम्रपान करणाऱ्यांमध्ये बहिरेपणा येण्याचा धोका जास्त असल्याचे अभ्यासाअंती सिद्ध झाले.
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धूम्रपानामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघाताचा धोका, तोंडाचा व फुफ्फुसाचा कर्करोग, मूत्रपिंड निकामी होण्याची भीती, स्मृतिभ्रंश व अल्झायमर होण्याची शक्यता अधिक असते. लता मंगेशकर हॉस्पिटलच्या ‘ईएनटी’ विभागाने केलेल्या एका अभ्यासात यात आणखी एका आजाराची भर पडली आणि ती म्हणजे ‘बहिरेपणा’ची. धूम्रपान करणाऱ्या ३० व्यक्तींमधून ११ व्यक्तींना बहिरेपणा असल्याचे यात आढळून आले.
धूम्रपानामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये भारताचा जगात चौथा क्रमांक लागतो. धूम्रपानामुळे डोक्यापासून ते पायापर्यंत सर्वत्र परिणाम भोगावे लागतात. जागतिक आरोग्य संस्थेनुसार (डब्ल्यूएचओ) धूम्रपान हे जागतिकदृष्ट्या मृत्यूचे टाळता येण्याजोगे कारण आहे. सिगारेट व सिगारेटच्या धुरामध्ये ४,७०० हून अधिक घातक रासायनिक संयुगे असतात, जी सर्वाधिक विषारी असतात. धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत वारंवार धूम्रपान करणारी मध्यम वयाच्या व्यक्तीमध्ये मृत्यूची शक्यता अधिक असते. याच धूम्रपानावर लता मंगेशकर हॉस्पिटलच्या कान, नाक व घसा (ईएनटी) विभागाचे प्रमुख डॉ.नितीन देवस्थळे यांच्या मार्गदर्शनाखाली सप्टेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ दरम्यान एक अभ्यास (स्टडी) करण्यात आला. नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने हा कमी कालावधीचा ‘स्टडी’ होता. यात धूम्रपान करणाऱ्या व धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये श्रवण दोषाच्या प्रमाणाचे शास्त्रीय मोजमाप करण्यात आले. धूम्रपान न करणाऱ्याच्या तुलनेत धूम्रपान करणाऱ्यांमध्ये बहिरेपणा येण्याचा धोका जास्त असल्याचे अभ्यासाअंती सिद्ध झाले.
असा केला स्टडी
डॉ. देवस्थळी यांनी सांगितले, लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आलेल्या परंतु बहिरेपणाची समस्या नसलेल्या व ज्या आजारांमुळे बहिरेपणा येऊ शकेल अशा मधुमेह, क्षयरोग, उच्चरक्तदाब नसलेल्या अशा ६० व्यक्तींची निवड करण्यात आली. या व्यक्ती २० ते ५० वयोगटातील होत्या. यातील ३० व्यक्ती धूम्रपान करणाऱ्या तर ३० व्यक्ती धूम्रपान न करणारी होत्या. यांची तपासणी केली असता धूम्रपान करणाऱ्या ३० मधून ११ व्यक्तींना तर धूम्रपान न करणाऱ्या तीन व्यक्तींना बहिरेपणा आढळून आला.
रोज २० सिगारेट पिणाऱ्यांमध्ये बहिरेपणाचा धोका अधिक
धूम्रपानामुळे बहिरेपणा आलेल्या ११ व्यक्तींमध्ये विडी किंवा सिगारेट पिण्याचे प्रमाण २० पेक्षा जास्त होते. यावरून लांब कालावधीपर्यंत व दिवसभरात जास्तीत जास्त विडी किंवा सिगारेट ओढणाऱ्यांमध्ये बहिरेपणाची शक्यता अधिक असते, असे यातून सामोर आल्याचे डॉ. देवस्थळी यांनी सांगितले.
यावर आणखी ‘स्टडी’ची गरज
नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे करण्यात आलेला हा ‘शॉर्ट टर्म स्टडी’ होता. परंतु यातून निघालेले निष्कर्ष हे धक्कादायक आहेत. धूम्रपानाच्या घातक परिणाम पाहता शासनस्तरावर यावर व्यापक ‘स्टडी’ होण्याची गरज आहे.
डॉ. नितीन देवस्थळी
विभाग प्रमुख, ईएनटी विभाग, लता मंगेशकर हॉस्पिटल