जागतिक हृदयरोग दिन; शंभरातील ३० हृदयरोगाचे रुग्ण चाळिशीच्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2021 07:00 AM2021-09-29T07:00:00+5:302021-09-29T07:00:02+5:30

Nagpur News शंभरातील ३० रुग्ण हे चाळिशीच्या आत असल्याचे एका निरीक्षणातून पुढे आल्याचे हृदयरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

World Heart Day; 30 out of 100 heart disease patients under 40 | जागतिक हृदयरोग दिन; शंभरातील ३० हृदयरोगाचे रुग्ण चाळिशीच्या आत

जागतिक हृदयरोग दिन; शंभरातील ३० हृदयरोगाचे रुग्ण चाळिशीच्या आत

Next
ठळक मुद्देतरुणांमध्ये वाढतोय हृदयरोगहार्ट फेल्युअरच्या ५० टक्के रुग्णांचा पहिल्या पाच वर्षांत मृत्यू

सुमेध वाघमारे

नागपूर : अलीकडे वृद्धांपेक्षा तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढला आहे. यामुळे, अकाली मृत्यूची प्रकरणे दिसून येत आहेत. अयोग्य जीवनशैली, तणाव, अनियंत्रित उच्चरक्तदाब व मधुमेहामुळे मागील १० वर्षांत हृदयरोगाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. धक्कादायक म्हणजे, यात शंभरातील ३० रुग्ण हे चाळिशीच्या आत असल्याचे एका निरीक्षणातून पुढे आल्याचे हृदयरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (World Heart Day; 30 out of 100 heart disease patients under 40)

भारतात जवळपास दर ३३ सेकंदांनी एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो. शिवाय मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत; यामुळे जगभराच्या तुलनेत देशात हृदयविकाराची संख्या वाढत चालली आहे. शिवाय भारतीयांना नैसर्गिकरीत्याच हृदयविकाराची जोखीम आहे; कारण आपल्या रक्तवाहिन्यांचा आकार पाश्चिमात्यांच्या तुलनेत छोटा आहे. शिवाय हृदयाच्या एकाहून अधिक रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण होण्याचे प्रमाणही अधिक आहे.

हृदयविकाराची जोखीम वेळेत ओळखा - डॉ. हरकुट

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पंकज हरकुट म्हणाले, शंभरामधून ७० टक्के रुग्ण हे चाळिशीच्या आतील असल्याने तरुणांमध्ये हृदयविकाराची जोखीम वाढली आहे. वेळीच निदान, योग्य उपचार, आहाराचे नियोजन व व्यसनाला दूर ठेवून नियमित व्यायाम केल्यास जिवाचा धोका निश्चितच टाळता येतो. विशेष म्हणजे, अधिक वेळ बसून राहिल्यास हृदयरोग होण्याचा धोका धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीएवढाच असतो. आजच्या जीवनशैलीत आठ तास बसावे लागते. त्यामुळे प्रत्येक खुर्चीवर ‘सीटिंग इज इंज्युरिअस टू हेल्थ...!’ लिहून ठेवणे गरजेचे आहे. सलग खुर्चीवर बसू नये, काही वेळाने अवकाश घ्यावा, मीटिंग्स उभ्याने घेता येतील का, याच्या शक्यता तपासल्या पाहिजेत.

- हार्ट फेल्युअरचा धोका वाढला - डॉ. तिवारी

हृदयरोग तज्ज्ञ डॉ. नितीन तिवारी म्हणाले, हृदयविकाराचा झटका येऊन गेल्यानंतर हृदयाला इजा पोहोचल्यास किंवा हृदय कुमकवत झाल्यास अनेकदा ‘हार्ट फेल्युअर’चा धोका वाढतो. यात हृदय पुरेसे रक्त पंप करू शकत नाही. हृदयाचे पंपिंग चेंबर्स (व्हेंट्रिकल्स) कडक होऊ शकतात. काही लोकांमध्ये हृदयाचे स्नायू खराब आणि कमकुवत होऊ शकतात. एका अभ्यासानुसार, ‘हार्ट फेल्युअर’च्या ५० टक्के रुग्णांमध्ये पहिल्या पाच वर्षांत मृत्यू होतो आणि ९० टक्के रुग्णांचा पुढील १० वर्षांत मृत्यू होतो. ‘हार्ट फेल्युअर’ची लक्षणे दीर्घकाळापासून किंवा अचानक तीव्रतेने सुरू होऊ शकतात. यामुळे यात वेळीच निदान व उपचार महत्त्वाचा ठरतो.

हृदयविकारामुळे तरुणांमध्ये अकाली मृत्यू - डॉ. जगताप

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सत्यजित जगताप म्हणाले, अलीकडे वृद्धांपेक्षा तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढलेला आहे. विशेषत: तरुणांमध्ये अकाली मृत्यूची प्रकरणे दिसून येत आहेत. यामागे अनेक तरुण अपेक्षा पूर्ण करण्यासाठी खूप तणावातून जातात. तीव्र तणावामुळे रक्तातील ग्लुकोज, कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब वाढू शकतो. सततच्या तणावामुळे तो दारू किंवा ड्रग्स किंवा धूम्रपानासारख्या व्यसनांचा बळी ठरतो. यामुळे वजन वाढते आणि धोकादेखील वाढतो.

वयाच्या २० वर्षांनंतर संपूर्ण वैद्यकीय तपासणी आवश्यक - डॉ. संचेती

हृदय शल्यचिकित्सक डॉ. आनंद संचेती म्हणाले, धूम्रपान, उच्च कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, मधुमेह व व्यायामाच्या अभावामुळे कोरोनरी धमन्या कडक होतात. यामुळे अचानक ‘थ्रोम्बोसिस’चा धोका वाढतो. यामुळे वयाच्या २० वर्षांनंतर प्रत्येकाने दरवर्षी संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली पाहिजे. आपला रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टेरॉलच्या पातळीवर लक्ष ठेवायला हवे आहे. उंचीनुसार वजन ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. धूम्रपान आणि अल्कोहोल टाळायला हवे. नियमित व्यायाम व योग्य आहार घ्यायला हवा.

Web Title: World Heart Day; 30 out of 100 heart disease patients under 40

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.