जागतिक हृदय दिन; हृदयविकाराच्या रुग्णांना कोरोना झाल्यास गुंतागुंत वाढण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 11:08 AM2020-09-29T11:08:57+5:302020-09-29T11:09:16+5:30
हृदयविकाराच्या रुग्णांना कोरोना झाल्यास सामान्य रुग्णांच्या तुलनेत गुंतागुंत वाढण्याची शक्यता अधिक असते. अलीकडे कोरोनाच्या भीतीमुळे हृदयविकाराचे रुग्ण डॉक्टरांकडे जाऊन नियमित तपासणीकडे दुर्लक्ष करीत आहे, यामुळेही विकार गंभीर होऊन जीवाचा धोका वाढला आहे.
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे श्वसन रोग आणि फुफ्फुसांच्या संसर्गाचा धोका वाढतो, सोबतच हृदयाचेही नुकसान होत असल्याचे हृदयरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार हृदयाशी संबंधित आजार नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना पुढे हृदयाचे आजार होऊ शकतात. परंतु हृदयविकाराच्या रुग्णांना कोरोना झाल्यास सामान्य रुग्णांच्या तुलनेत गुंतागुंत वाढण्याची शक्यता अधिक असते. अलीकडे कोरोनाच्या भीतीमुळे हृदयविकाराचे रुग्ण डॉक्टरांकडे जाऊन नियमित तपासणीकडे दुर्लक्ष करीत आहे, यामुळेही विकार गंभीर होऊन जीवाचा धोका वाढला आहे.
विदर्भात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. या सात महिन्याच्या कालावधीत रुग्णांची संख्या रविवारी १ लाख ४४ हजार ५४९, तर मृतांची संख्या ३,७७३ वर गेली. रोज दोन ते तीन हजार रुग्णांची व ६० ते ९० मृतांची भर पडत आहे. यात एकट्या नागपूर जिल्ह्यात ७४ हजार ८२१ रुग्ण व २,३८३ मृतांची नोंद आहे. मृतांमध्ये सुमारे ३५ ते ४० टक्के रुग्णांना हृदयविकाराशी संबंधित आजार असल्याचे सांगितले जाते. यामुळे कोरोना होणारच नाही याची काळजी प्रत्येकाने घेण्याची गरज आहे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे
-चार प्रकारचे हृदयाला नुकसान-डॉ. जगताप
प्रसिद्ध कॉर्डिओलॉजिस्ट डॉ. प्रशांत जगताप म्हणाले, कोरोनामुळे चार प्रकारे हृदयाचे नुकसान होऊ शकते. एक कोरोनामुळे ‘डायरेक्ट टॉक्सिसिटी’, दुसरे ‘इम्युनोग्लोब्युलीन रिलेटेड टॉक्सिसिटी’, तिसरे कोरोनामुळे श्वसनाशी संबंधित आजार होत असल्याने आॅक्सिजनचे प्रमाण कमी होऊन हृदयाला हानी पोहचण्याची आणि चौथे म्हणजे, ‘हार्ट इलेक्ट्रिकल डिस्टर्बन्सी’ होऊ शकते.
-अधिक काळजी आवश्यक-डॉ. अर्नेजा
प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जसपाल अर्नेजा म्हणाले, कोरोनाच्या या काळात हृदयरोगाच्या रुग्णांना पूर्र्वी पेक्षा अधिक काळजी घेणे महत्त्वाचे झाले आहे. कारण, हृदयविकाराच्या रुग्णांना दुप्पट समस्यांचा सामना करावा लागतो. जर तुम्हाला हृदयरोग, हार्ट फेल्युअर, मधुमेह, उच्च रक्तदाब, आणि लठ्ठपणा यासारख्या गंभीर समस्या असतील तर डॉक्टरांकडून नियमितपणे तपासणीवर भर देण्याचे आवाहनही त्यांनी के ले आहे.
-रक्तात गुठळ्या होण्याचे प्रमाण वाढले-डॉ. संचेती
प्रसिद्ध हृदयरोग शल्यचिकित्सक डॉ. आनंद संचेती म्हणाले, कोरोनामुळे रक्तात गुठळ्या होण्याची शक्यता अधिक असते. सध्या कोरोना होऊन बरे झालेल्या रुग्णांमध्ये रक्तात गुठळ्या होऊन हृदयविकाराचा झटका येणारे रुग्ण अधिक दिसून येत आहेत. याला तरुणही बळी पडत आहे. यामुळे हृदयविकार असलेल्या रुग्णांनी नियमित तपासणी व औषधोपचार करावा.
-‘हार्ट अटॅक’ व ‘ब्रेन स्ट्रोक’ वाढले-डॉ. गांजेवार
प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शैलेंद्र गांजेवार यांनी सांगितले, कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होऊन ‘हार्ट अटॅक’ व ‘ब्रेन स्ट्रोक’चे प्रमाण वाढले आहे. यामुळे जुन्या हृदयविकाराच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच कोरोनामुळे अनेक रुग्ण हॉस्पिटलमध्ये जाणे टाळत आहेत. गंभीर झाल्यावरच रुग्ण हॉस्पिटलमध्ये येत आहेत. हे अनेकांसाठी धोकादायक ठरत आहे.