जागतिक हृदय दिन; हार्ट अटॅक हे अकाली मृत्यूचे ठरते कारण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2022 08:00 AM2022-09-29T08:00:00+5:302022-09-29T08:00:01+5:30
Nagpur News ३० ते ४५ वयोगटात हृदयविकाराच्या झटक्याचे आणि विशेषत: अचानक येणाऱ्या हृदयघाताचे प्रमाण वाढलेले आहे. यामुळे हृदयविकाराचा धोका ओळखा, असे आवाहन शहरातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञांनी केले आहे.
नागपूर : भारतामध्ये दरवर्षी सात लाखांहून अधिक लोकांच्या मृत्यूचे कारण अकाली ‘हार्ट अटॅक’ आहे. त्यापैकी सुमारे १० टक्के रुग्ण इस्पितळात, २० टक्के रुग्ण ऑफिस किंवा सार्वजनिक ठिकाणी आणि ७० टक्के रुग्णांना घरामध्ये अचानक हृदयघात होतो. अलीकडे सेलिब्रिटींपासून ते अगदी आसपासच्या तरुणांपर्यंत ३० ते ४५ वयोगटात हृदयविकाराच्या झटक्याचे आणि विशेषत: अचानक येणाऱ्या हृदयघाताचे प्रमाण वाढलेले आहे. यामुळे हृदयविकाराचा धोका ओळखा, असे आवाहन शहरातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञांनी केले आहे.
-व्यायामासोबत ‘मेटाबॉलिक हेल्थ’ कडे लक्ष द्या-डॉ. देशमुख
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. पी. पी. देशमुख म्हणाले, हृदयविकाराला दूर ठेवण्यासाठी व्यायामासोबतच ‘मेटाबॉलिक हेल्थ’कडे लक्ष द्यायला हवे. यासाठी मधुमेहावर नियंत्रण, कोलेस्ट्रॉलची पातळी १०० तर ‘ट्रायग्लिसरायड्स’पातळी १५० च्या खाली असावी, रक्तदाब हा १२०/१८० च्या खाली असावा, तंबाखूजन्य पदार्थ टाळावे, तणावाचे व्यवस्थापन, रोज ३० ते ४० मिनिटे जलद गतीने पायी चालावे, मीठ, तूप, डालडा, मैदायुक्त पदार्थ, साखर टाळावे व वजन नियंत्रणात ठेवावे.
-कोविडनंतर हृदयात गुंतागुंत मृत्यूचे कारण - डॉ. संचेती
हृदयरोग शल्यचिकित्सक डॉ. आनंद संचेती म्हणाले, कोरोनाच्या गंभीर लक्षणांतून बरे झालेल्यांना ‘हार्ट अटॅक’, हृदयाच्या स्नायूंना इजा, फुप्फुसात रक्ताची गाठ किंवा रक्तवाहिनीत गाठ झालेले रुग्ण दिसून येत आहेत, ही गुंतागुंत कोरोनामुळे निर्माण होत आहे. यामुळे ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांच्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे, वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिले.
-तरुणांमध्ये २० ते ३० टक्क्यांनी ‘हार्ट अटॅक’ ची वाढ - डॉ. हरकुट
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पंकज हरकुट म्हणाले, गेल्या सहा महिन्यात तरुणांमध्ये २० ते ३० टक्क्यांनी हार्ट अटॅकची वाढ दिसून येत आहे. यामागे कोविड हे एक कारण आहे. ‘हार्ट अटॅक’ साठी जुन्या कारणांसोबतच पुरेशी झोप न होणे, सतत तणावात राहणे, ‘पॅसिव्ह स्मोकिंग’, ‘पोस्ट कोविड’, फार वेळ बसून राहणे, आहारात साखरेचे प्रमाण अधिक असणे ही नवी कारणे दिसून येत आहे. यात कोविडची जोखीम सोडली तर बाकीच्यांवर नियंत्रण मिळविता येते.
नियमित तपासणी आवश्यकच - डॉ. जगताप
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत जगताप म्हणाले, कुटुंबातील कुणा सदस्याला उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा उच्च कोलेस्ट्रॉल असेल तर लहानपणापासूनच नियमित तपासणी करायला हवी. आजच्या काळात हृदय रोगाच्या उपचारापेक्षा तो होणारच नाही याकडे लक्ष द्यायला हवे. आपला आहार योग्य केल्यास, शारीरिक हालचाली वाढविल्यास, तंबाखूला दूर ठेवल्यास आणि तणावाचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन केल्यास हृदय रोगाला दूर ठेवणे शक्य आहे.
‘सीपीआर’ने जीव वाचण्याची शक्यता तिप्पट-डॉ बीडकर
हिमोहार्ट फाउंडेशनचे संचालक व प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अमेय बीडकर म्हणाले, हृदयविकाराचा झटका येऊन हृदय बंद पडल्यास तातडीने ‘सीपीआर’ (कार्डियो पल्मोनरी रिसॅसिटेशन) दिल्याने रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता तिप्पट असते. त्यामुळे प्रत्येकाने ‘सीपीआर’ तंत्र शिकावे, प्रत्येक व्यक्तीने हे तंत्र आत्मसात केल्यास अनेकांचा जीव वाचविणे शक्य आहे. परंतु सध्यातरी केवळ ५ टक्के रुग्णांनाच वेळेत योग्य सीपीआर मिळतो, असे आढळून आले आहे.