जागतिक हिमोफिलिया जागृती दिवस; रुग्णांना आता प्लाझ्माची गरजच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2022 08:00 AM2022-04-17T08:00:00+5:302022-04-17T08:00:01+5:30
Nagpur News १७ एप्रिल हा जागतिक हिमोफिलिया जनजागृती दिवस साजरा केला जातो.
नागपूर : हिमोफेलियाच्या रुग्णांमध्ये रक्त गोठविण्यासाठी प्रामुख्याने कारणीभूत असलेले ‘फॅक्टर-८’ व ‘९’ या दोन घटकांची उणीव राहते. परिणामी, रक्त गोठत नसल्याने रुग्णांमध्ये अनेक गुंतागुत निर्माण होतात. पूर्वी या विकारावर निर्धारित कालावधीमध्ये प्लाझ्मा द्यावा लागत असे, मात्र आता आधुनिक ‘फॅक्टर्स’ उपलब्ध असल्याने प्लाझ्माची गरज पडत नाही, अशी माहिती रक्तविकार व रक्त कर्करोगतज्ज्ञ डॉ. रिया बालीकर यांनी दिली.
१७ एप्रिल हा जागतिक हिमोफिलिया जनजागृती दिवस साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’शी त्या बोलत होत्या. डॉ. बालीकर म्हणाल्या, शरीरात रक्त गोठण्याची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते. पूर्वी या विकारावर निर्धारित कालावधीमध्ये प्लाझ्मा देण्याची गरज पडत होती; परंतु ‘प्लाझ्मा’चे साईड इफेक्ट आहेत. ‘हेपेटायटिस बी’, ‘सी’, ‘एचआयव्ही’ होण्याचा धोका असतो. ८०० ग्रॅमवर प्लाझ्मा दिला जातो. अशावेळी हृदयावर दाब वाढतो. फुप्फुसामध्ये इन्फेक्शन होण्याची भीती असते. परंतु आता रक्त गोठविणारे ‘फॅक्टर’ उपलब्ध झाल्याने व पूर्वीच्या तुलनेत त्यातही बरेच बदल झाल्याने हिमोफिलिया विकारावर नियंत्रण आणणे शक्य झाले आहे.
काय आहे हा आजार ?
हिमोफिलिया विकारामध्ये एक्स गुणसूत्रात (क्रोमोसोम्स) दोष आढळतो. हा विकार मुख्यत्वेकरून पुरुषांनाच होतो. मात्र, महिला या विकाराच्या वाहक ठरू शकतात. ‘फॅक्टर ८’ या घटकाची उणीव असेल तर त्यास ‘हिमोफिलिया ए’ असे म्हणतात, तर‘ फॅक्टर ९’ या घटकाची उणीव असेल तर त्यास ‘हिमोफिलिया बी’ म्हणतात. जागतिक स्तरावर ‘हिमोफिलिया-ए’ हा विकार पाच हजार पुरुष बालकांमागे एकास होतो. ‘हिमोफिलिया-बी’ हा विकार तीस हजार पुरुष बालकांमागे एका बालकास होऊ शकतो. नातेसंबंधांमध्ये होणारे विवाह हे हिमोफिलियाचे एक महत्त्वाचे कारण आहे.
ही आहेत लक्षणे
लहानपणी बालक रांगायला लागल्यावर गुडघे लाल होणे, दुखणे आणि सूज येणे अशी लक्षणे दिसून येतात. सोबतच अन्य सांध्यांमध्येही रक्तस्त्राव होऊन लक्षणे दिसू लागतात, तेव्हा हिमोफिलिया असण्याची शक्यता असते. याशिवाय त्वचेवर रक्तस्त्राव, स्नायूंमध्ये रक्तस्त्राव, ब्रश करताना रक्त निघणे, अंतर्गत अवयवांमध्ये रक्तस्त्राव होणे, मूत्रमार्गाद्वारे रक्त जाणे, मलमार्गाद्वारे रक्त जाणे किंवा काळ्या रंगाची मलनिर्मिती होणे ही लक्षणे आहेत.
यावर दोन प्रकारे उपचार
या विकारावर दोन प्रकारे उपचार केले जातात. अचानक रक्तस्त्राव झाला असेल, शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असेल किंवा वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असेल तर रक्त गोठविणारे ‘फॅक्टर’ सलाइनद्वारे चढविले जातात. मात्र, जेव्हा रोग तीव्र असतो व हिमोफिलियामुळे होणारे दुष्परिणाम दीर्घकाळासाठी टाळावयाचे असतात, तेव्हा हे ‘फॅक्टर’ नियमित द्यावे लागते.
हिमोफिलियाचा दुष्परिणाम कमी करता येतो
हिमोफिलिया विकारावर उपचार म्हणून रक्त गोठण्यासाठी आवश्यक फॅक्टर सलाइनद्वारे दिले जातात. जर हे फॅक्टर वैद्यकीय सल्ल्याने नियमित अंतरात घेत राहिले तर हिमोफिलियाचा दुष्परिणाम कमी होतात. रुग्ण सामान्य जीवन जगू शकतात.
-डॉ. रिया बालीकर, रक्तविकारतज्ज्ञ