जागतिक वारसा सप्ताह : महालातील शेकडो वर्षे जुन्या मंदिराचा लाकडी डोलारा ढासळतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 10:31 AM2021-11-25T10:31:45+5:302021-11-25T10:48:07+5:30
नागपुरातील ३००-३५० वर्षापूर्वी आकाराला आलेल्या अनेक वास्तू आजही त्या काळातील भरभराटीची, वास्तुकलेची, सौंदर्यासक्तीची, तत्कालिन राजकारणाची आणि शौर्याची साक्ष देतात. त्यातील काही वास्तू दिमाखाने उभ्या आहेत तर काही भग्नावस्थेत आहेत.
प्रवीण खापरे - अंकिता देशकर / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर ही ऐतिहासिक नगरी आहे. भूतकाळातील गोंड राजे आणि राजे भाेसले यांच्या कर्तृत्वामुळे नागपूरचे नाव सन्मानाने घेतले जाते. या दोन्ही राजघराण्याच्या काळात म्हणजे तीनशे-साडेतीनशे वर्षापूर्वी आकाराला आलेल्या अनेक वास्तू आजही त्या काळातील भरभराटीची, वास्तुकलेची, सौंदर्यासक्तीची, तत्कालिन राजकारणाची आणि शौर्याची साक्ष देतात. त्यातील काही वास्तू दिमाखाने उभ्या आहेत तर काही भग्नावस्थेत आहेत.
महालात दुसऱ्या रघुजी भोसले राजवाडा अर्थात वर्तमानातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या आवारात केळीबाग रोडवर असलेल्या साधारणतः ३०० वर्षे जुन्या मंदिरातील लाकडी डोलारा ढासळतो आहे. या एकाच मंदिरात उजव्या सोंडेचा रिद्धी-सिद्धीविनायक, लक्ष्मीनारायण, शिवलिंगम, गरुडेश्वर आणि काळ्या हनुमंताचे ऐतिहासिक देवस्थान आहे. जागतिक वारसा सप्ताहाच्या अनुषंगाने इतिहासाची ओढ असलेल्यांसाठी ही बाब महत्त्वाची ठरते.
व्यापारी पेठेत लपला ऐतिहासिक वारसा
महाल हे जुने नागपूर म्हणून ओळखले जाते. येथेच गोंड राजांचा आणि राजे भोसले यांचे राजवाडे आजही नागपूरची शान वाढवतात. येथे आता मोठी बाजारपेठ आहे. येथेच केळीबाग रोडवर कोतवाली पोलीस ठाण्याकडून बडकस चौकाकडे जाताना चार-पाच दुकान नंतर निरखून पाहिल्यास एक लहानशी गल्ली सापडते. त्या गल्लीत शिरताच जे दृष्टीत्पथात येतो तो हा वास्तुकलेचे अद्भुत नमुना होय. व्यापारी पेठेत हा ऐतिहासिक वारसा लपलेला आहे.
देवळांच्या शिखरावर कोरीव काम
लक्ष्मीनारायण व शिवलिंगम देवळाच्या शिखरावर ओडिशा पद्धतीची नाजूक अशी शिल्पकला कोरलेली आहे. ही दोन्ही शिखरे ४० फूट उंचीची आहेत. दोन्ही देवळाकरिता लाल दगड वापरलेला आहे. लक्ष्मीनारायण, महादेवाची पिंड व नंदी संगमरवरी दगडाचे आहेत. सभामंडप नक्षीकामयुक्त लाकडाचा आहे. लक्ष्मीनारायण समोर गरुडेश्वराचे छोटे देऊळ आहे. गणपती संगमरवरी दगडाचा उजव्या सोंडेचा आहे. परंतु, डोक्यावर मुकुट नाही. आजूबाजूला रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती आहेत. बाहेर गणपतीचे वाहन उंदीर काळ्या दगडाचा असून, उंदराची ही शहरातील सर्वात मोठी मूर्ती आहे. येथेच हनुमंताचे देऊळ असून तेथे काळ्या दगडाची मूर्ती आहे. एकंदर हे मंदिर म्हणजे वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.
उजव्या सोंडेचा गणपती
साधारणतः सर्वत्र डाव्या सोंडेच्या गणपतीची स्थापना केली जाते. उजव्या सोंडेच्या गणपतीचे पूजन सोहळ्याचे आणि शास्त्रार्थाचे दंडोक पाळूनच केले जाते आणि ही पद्धत अतिशय कठीण असते. त्यामुळे, उजव्या सोंडेचा गणपती साधारणतः कुठे दिसत नाही. शिवाय, बहुतांश गणपतीच्या देवस्थानांमध्ये श्रीगणेशाच्या दोन्ही पत्नी रिद्धी-सिद्धी नसतात. येथे मात्र, या दोघीही सोबतीला असल्याने, या विनायकाचे महत्त्व आपसूकच वाढते. अशी चार मंदिरे असून ती सर्व महालात आढतात, हे विशेष.
छत तुटले, खांब मोडकळीस आले
या संपूर्ण मंदिरात लाकडी सभामंडप आहे. छत ही लाकडाचे व टिनाचे आहे. आता मात्र ते संपूर्ण जीर्ण अवस्थेत दिसून येतात. छत तुटलेले आहे. त्यातून दिवसा उन्हाचे कवडसे आत डोकावतात तर रात्री त्या मोठ्या छिद्रातून चंद्र बघता येतो. पावसाळ्यात पाण्याचा थेट आगमन असते. अनेक लाकडी खांब मोडक्या अवस्थेत असून, बरेच पडलेले आहेत. ते येथेच ठेवण्यात आलेले आहेत.
भक्तांचीही असते या देवस्थानांकडे पाठ
हे देवस्थान स्वयंभू नाही. येथील रिद्धी-सिद्धी विनायक सोबत अन्य मूर्तीही भोसल्यांनी स्थापन केल्या आहेत. गुरुपौर्णिमेला संपूर्ण भोसले कुटुंब येथे पूजनासाठी येत असतात. मात्र, बाजारपेठेमुळे लपलेल्या या देवस्थान विषयी भक्तांना माहितीच नाही. चतुर्थीला भक्तांची गर्दी शहरातील वेगवेगळ्या देवस्थानांमध्ये होत असते. मात्र, या जागृत आणि कला कौशल्य व शास्त्रार्थानुसार महत्त्व असलेल्या देवस्थानांकडे भक्तांची पाठ असते. येथे एक भुयारी रस्ता असल्याचेही सांगितले जाते आणि तो रस्ता थेट रामटेकला जात असल्याचे जुने लोक सांगत होते. ही खासगी प्रॉपर्टी असल्याने बोलता येत नाही. मात्र, या देवस्थानाचे जतन व्हावे, अशी अपेक्षा अनेकदा भोसल्यांकडे बोललो आहोत.
- विरेंद्र देशपांडे, समाजसेवक व इतिहासप्रेमी
लवकरच दुरुस्ती केली जाईल
सध्या केळीबाग रोडच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळेच, देवस्थानाची दुरुस्ती केली जात नाही. रस्त्याचे काम पूर्ण होताच मंदिराची डागडुजी केली जाईल आणि जुने वैभव पुन्हा उजळले जाईल.
- श्रीमंत राजे मुधोजी भोसले