जागतिक होमिओपॅथी दिन; अॅडव्हान्स होमिओपॅथी ‘स्टेम सेल्स’सारखीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 10:41 AM2019-04-10T10:41:32+5:302019-04-10T10:44:11+5:30
होमिओपॅथी उपचारपद्धती मनोरचना व मनोकार्याशी जवळीक साधते. यामुळे ही पॅथी आजाराला बरे करीत नाही तर आजारी रुग्णाला बरे करते. असा सूर, होमिओपॅथी तज्ज्ञाचा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्या आजारावर कोणतेही उपचार नाहीत, तो आजार ‘स्टेम सेल्स’च्या माध्यमातून बरा होण्याची शक्यता असते, त्याचप्रमाणे आता ‘अॅडव्हान्स होमिओपॅथी’मध्येही कुठल्याही असाध्य आजारावर यशस्वी उपचार शक्य झाले आहेत. होमिओपॅथी उपचारपद्धती मनोरचना व मनोकार्याशी जवळीक साधते. रुग्णाच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करते. त्याच्या वागणूक व व्यक्तिमत्त्वामधील सूक्ष्म बदल अनुभवून योग्य औषधांची निवड करते. यामुळे ही पॅथी आजाराला बरे करीत नाही तर आजारी रुग्णाला बरे करते. असा सूर, होमिओपॅथी तज्ज्ञाचा आहे. जागतिक होमिओपॅथी दिनाच्या पूर्वसंध्येवर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
केवळ सर्दी, खोकल्यापुरतेच मर्यादित नाही-डॉ. चिमथानवाला
डॉ. आदिल चिमथानवाला म्हणाले, होमिओपॅथी केवळ सर्दी, खोकला व त्वचारोग या आजारांसाठीच मर्यादित नाही. हृदयरोग, उच्चरक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, व्यंध्यत्व, स्तनाचा कर्करोग, रक्ताचा कर्करोग, ब्रेन ट्युमर, अस्थमा, थायरॉईड यासारख्या दुर्धर आजारांवरही होमिओपॅथीमध्ये उपचार आहेत.
अयोग्य जीवनशैलीच्या आजारांवरही उपचार-डॉ. धमगाये
डॉ. सचिन धमगाये म्हणाले, अयोग्य जीवनशैली, तणाव, औषधांचा अधिक वापर, रोगप्रतिबंधात्क लसीचा अधिक वापर, आहाराची चुकीची पद्धत आदींमुळे विविध आजाराच्या विळख्यात व्यक्ती सापडत आहे. यावर ‘मॉडर्न होमिओपॅथी’ वरदान ठरत आहे. विशेषत: लहान मुलांवर होमिओपॅथीच्या औषधोपचाराचा चांगला प्रभाव दिसून येत आहे. मुलींमध्ये वाढत असलेला ‘पीसीओडी’ आजारावरही होमिओपॅथीमध्ये औषधोपचार आहे.
अॅलर्जीवर प्रभावी उपचार -डॉ. सातपुते
डॉ. यशस्वी सातपुते म्हणाल्या, मॉडर्न होमिओपॅथीमुळे अनेक आजार बरे होताना दिसून येत आहे. परिणामी, रुग्णांचा विश्वास या पॅथीवर दिवसेंदिवस वाढत आहे. महत्त्वाचे म्हणजे, विविध अॅलर्जीवर दुसऱ्या पॅथीच्या उपचारानंतरही बरे न झालेले रुग्ण होमिओपॅथीने बरे होत आहे. आता होमिओपॅथीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असल्याने याचा फायदा रुग्णांना होत आहे.
आजाराचे मूळ शोधून उपचार-डॉ. पाटील
डॉ. मनीष पाटील म्हणाले, होमिओपॅथीमध्ये आजाराचे मूळ शोधून त्यावर उपचार केला जातो. यामुळे आजार समूळ नष्ट होण्यास मदत होते. दुर्दैवाने लोक होमिओपॅथीकडे तेव्हाच जातात जेव्हा गंभीर समस्या आणखी जुनी झालेली असते. साहजिकच अशा प्रकरणांमध्ये उपचार करण्याला कालावधी जास्त लागतो आणि लोक होमिओपॅथी तेव्हा स्वीकारतात जेव्हा बाकी उपचार पद्धती अयशस्वी होते. असे असलेतरी अनेक दुर्धर आजाराचे रुग्ण होमिओपॅथीने बरे झाले आहेत.
होमिओपॅथी काळाची गरज-डॉ. व्यवहारे
डॉ. प्रसाद व्यवहारे म्हणाले, लक्षणाची अनुपस्थिती म्हणजे आरोग्य नव्हे , तर आपल्या शरीरात रोग उत्पन्न करू शकणाऱ्या कारणांचा शोध व त्याचे समूळ उच्चाटन म्हणजे खरे आरोग्य आणि या विचाराचा मागोवा घेणारे शास्त्र म्हणजे होमिओपॅथी. रोगाला नव्हे तर रोगी ला ठीक करते म्हणून अनेक जुनाट व अवघड आजार होमिओपॅथीमुळे बरे होतात. ही सम चिकित्सा पद्धती आहे.
वंशपरंपरागत आजारही बरे झालेत -डॉ. पंचभाई
डॉ. सोनल पंचभाई म्हणाले, अनेक व्याधी ज्या आधुनिक वैद्यकशास्त्राला आव्हानात्मक वाटतात त्या व्याधीवर अॅडव्हान्स होमिओपॅथीमुळे ६० ते ८० टक्के यश मिळाले आहे. यात वंशपरंपरागत आजारही बरे झाले आहेत. एवढेच नव्हे तर, या संपूर्ण केसेसचे ‘डाक्युमेंटेशन’सुद्धा उपलब्ध आहे. सध्या उपचारपद्धतीला ‘जेनेटिक बेस्ड’ बनवून ‘सायंटिफिक’ उपचार करण्यात येत आहे. ही उपचार प्रणाली केवळ आजारच दूर करीत नाही तर मूळासकट नष्ट करते.