जागतिक मूलनिवासी दिन; देशातील ७५ आदिम जमातींचे अस्तित्व संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 11:11 AM2021-08-09T11:11:43+5:302021-08-09T11:16:25+5:30
Nagpur News केवळ भारतातीलच ७५ प्रकारच्या आदिम जमाती नामशेष हाेण्याच्या मार्गावर आहेत. मानववंशशास्त्र विभागाचे हे सर्वेक्षण माेठ्या धाेक्याकडे संकेत देणारे आहे.
निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानवी उत्पत्तीचे असंख्य रहस्य जगभरातील संशाेधकांसाठी कायमच कुतूहलाचा विषय आहेत. जगभरातील आदिम जमातींचा इतिहास हा हजाराे वर्षांपूर्वीच्या मानवी अस्तित्वाशी जुळला असण्यावर संशाेधक ठाम आहेत. मात्र, मानवी उत्क्रांतीचे रहस्य मांडणाऱ्या या आदिम जमातींचे अस्तित्वच संकटात सापडले आहे. केवळ भारतातीलच ७५ प्रकारच्या आदिम जमाती नामशेष हाेण्याच्या मार्गावर आहेत. मानववंशशास्त्र विभागाचे हे सर्वेक्षण माेठ्या धाेक्याकडे संकेत देणारे आहे.
भारतीय आदिम जमातींच्या अस्तित्वाला अनेक कंगाेरे आहेत. अनेक संशाेधने सुरू आहेत, पण प्रश्न या आदिम जमातींच्या अस्तित्वाचा आहे. मानववंशशास्त्र विभागाने दशकभरात केलेल्या सर्वेक्षणानुसार ७५ आदिम जमातींचे अस्तित्व धाेक्यात आले आहे. यातील बहुतेक जमातींची लाेकसंख्या १००० च्याही खाली, तर काही १००च्याही खाली आहे. त्यांच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारने २००८ पासून कार्यक्रम राबविला आहे. मात्र हे प्रयत्नही कुचकामी ठरताना दिसत आहेत.
काही धाेकाग्रस्त प्रजाती व त्यांची संख्या
- महाराष्ट्रातील कतकरी, काेलाम, माडिया गाेंड.
- मध्य प्रदेश व छत्तीसगडमधील अबुज माडिया, बैगा, भारिया, हिलकाेरबा, कमाड, सहारिया, बिर्हाेर.
- बिहार व झारखंडच्या असूर, बिर्जिया, हिलखडिया, काेवांस, मालपहाडिया, साैदा पहाडिया, सावर.
- ७५ पैकी १२ जमातींची संख्या ५० हजाराच्यावर हाेती. इतर जमाती १०००च्या खाली आहेत.
- अंदमानमधील ग्रेट अंदामानिज जमातीची लाेकसंख्या २००१च्या गणनेनुसार ४३ व सेंटिलेट्स जमातीची संख्या केवळ ३९ हाेती.
- जरवास २४१ तर ओंग्स जमातीची संख्या ९६ आहे. सहारिया जमातीची ४.५० लाख लाेकसंख्या सर्वाधिक आहे.
या जमातींचा मानवी उत्क्रांतीशी संबंध?
मानववंशशास्त्र विभागातर्फे आणखी एक महत्त्वाचे संशाेधन चालले आहे. लाखाे वर्षांपूर्वी मानवाचे आफ्रिकेतून भारतात व नंतर इतरत्र स्थलांतरण झाल्याचे गृहितक आहे. यानुसार भारतीय आदिम जमातींचा पहिल्या मानवाशी संबंध आहे का, यावर संशाेधन सुरू आहे. त्यासाठी सर्व ७५ जमातींचे डीएनए सॅम्पल गाेळा करण्यात आल्याची माहिती विभागाचे संशाेधन सहायक राजकिशाेर महताे यांनी दिली. या डीएनएमधून पूर्वीच्या १६ ते १७ वंशजांची व त्यापूर्वीचीही ओळख करणे शक्य हाेईल.