जागतिक बौद्धिक संपदा दिन; स्वत:च्या बौद्धिक संपदेचे करा पेटंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 11:03 AM2018-04-26T11:03:20+5:302018-04-26T11:03:28+5:30

आपल्या बौद्धिक संपदेला सुरक्षित करणे ही काळाची गरज झाली आहे. तसे केले नाही तर भारतीयांचे ज्ञान चोरून जग पुढे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

World Intellectual Property Day; Do your own intellectual property patents | जागतिक बौद्धिक संपदा दिन; स्वत:च्या बौद्धिक संपदेचे करा पेटंट

जागतिक बौद्धिक संपदा दिन; स्वत:च्या बौद्धिक संपदेचे करा पेटंट

googlenewsNext
ठळक मुद्देभारतीय संशोधनात पुढे पण पेटंट करण्यात मागे पेपर प्रसिद्ध करून नुकसान करू नका

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय विद्यार्थी, संशोधक हे संशोधनात पुढे आहेत. त्यांचे संशोधन जगाच्या संशोधनापेक्षा वेगळे व बहुउपयोगी आहे. मात्र, इतर देशांच्या तुलनेत ते आपल्या संशोधनाचे पेटेंट मिळवित नाही. गेल्यावेळी चीनसारख्या देशाने त्यांच्या संशोधनांचे पेटेंट घेण्यासाठी तब्बल ११ लाख फाईलिंग केले. तर भारतातून येणाऱ्या अर्जांची संख्या फक्त ४७ हजार होती. विशेष म्हणजे या ४७ हजारांमध्येही विदेशातील अर्ज करणाऱ्यांची संख्या ७० टक्क्यांवर होती.
आपल्या बौद्धिक संपदेला सुरक्षित करणे ही काळाची गरज झाली आहे. तसे केले नाही तर भारतीयांचे ज्ञान चोरून जग पुढे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
राजीव गांधी इन्टलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स (आरजीआयजीआर) ही केंद्र सरकारची संस्था बौद्धिक संपदेचे पेटेंट करण्यासाठी जगजागृतीचे काम करीत आहे. भारतात अनेक लोक संशोधन करतात. संशोधन झाले की एखाद्या राष्ट्रीय परिषदेत त्याचा पेपर प्रसिद्ध करून मोकळे होतात. असे केल्याने त्यांनी केलेल्या संशोधनावर त्यांचा कुठलाही हक्क शिल्लक राहत नाही. ती माहिती जगासाठी मोकळी झालेली असते. एकदा माहिती प्रसिद्ध झाली की नंतर तिचे पेटेंट मिळविता येत नाही. त्यामुळे संशोधकांनी आपल्या संशोधनाचे आधी पेटेंट मिळवून आपली बौद्धिक संपदा कशी सुरक्षित करता येईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
१९८० मध्ये नागपुरात फक्त पेटेंट इन्फरमेशन सेंटर होते. मात्र, आता या केंद्रातर्फे प्रशिक्षण कार्यक्रमही राबविले जात आहेत. एखाद्या विद्यार्थ्याने, संशोधकाने एखादे संशोधन केले तर त्या संशोधनाचे पेटेंट त्याने कसे मिळवावे, याची माहिती देण्यासाठी संस्थोतर्फे शिबिर आयोजित केले जातात. प्रशिक्षण घेतले जाते.
गेल्या वर्षभरात संस्थेने अशा ९४ कार्यशाळा घेतल्या आहेत असून चार हजारावर लोकांना प्रशिक्षणही दिले आहे. यातून जागृती निर्माण होऊन आता पेटेंटसाठी येणाऱ्या अर्जांची संख्या वाढली आहे. देशात आजवर दोन लाखावर लोकांनी पेटेंट घेतले आहे. येत्या काळात या संख्येत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे.

असे मिळवा पेटंट
आपण एखादे संशोधन केले की त्याची नोंदणी ipindia.gov.in या वेबसाईटवर जाऊन करता येते. वेबसाईटवर फॉर्म नंबर १,२ व ३ मध्ये आपल्या संशोधनाची संपूर्ण माहिती भरावी लागते. त्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स नंबर मिळतो. त्यानंतर तुम्ही सादर केलेल्या माहितीचे परीक्षण करण्याची प्रकिया सुरू होते. संस्थेचे परीक्षक त्याचे आॅनलाईन परीक्षण करतात. त्यात काही त्रुटी असतील, अडचणी असतील तर आपल्याला आॅनलाईन कळविले जाते. त्रुटी पूर्ण करण्याची संधी दिली जाते. ही सर्व प्रक्रिया तीन ते चार वर्षे चालते. यासाठी फक्त ५,६०० रुपये शुल्क आकारले जाते. एखाद्याला ही प्रकिया कमी वेळात करायची असेल तर त्यासाठी मात्र विशेष शुल्क भरावे लागते.

विदर्भाने घ्यावा पुढाकार
राजीव गांधी इन्टलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स या संस्थेद्वारे इन्टलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्सबाबत विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. देशभरातील अनेक तरुण येथे येऊन प्रशिक्षण घेऊन जातात. परंतु, संस्थेकडे विदर्भ व नागपुरातून येणारा तरुण वर्ग तुलनेने फारच कमी आहे. विदभार्तून दरवर्षी पेटंट नोंदणीसाठी फक्त एक हजार अर्ज प्राप्त होतात. ही संख्या वाढण्याची गरज आहे.
 

Web Title: World Intellectual Property Day; Do your own intellectual property patents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.