जगाचे कल्याण बौद्ध धम्मातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 01:12 AM2017-11-06T01:12:28+5:302017-11-06T01:12:45+5:30
बौद्ध धम्म हा मानवधर्म आहे. जगातील मानवाच्या कल्याणाचा खरा उपाय म्हणजे बौद्ध धम्म होय. जगात जोपर्यंत शांती राहणार नाही तोपर्यंत जगाचा उद्धार होणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बौद्ध धम्म हा मानवधर्म आहे. जगातील मानवाच्या कल्याणाचा खरा उपाय म्हणजे बौद्ध धम्म होय. जगात जोपर्यंत शांती राहणार नाही तोपर्यंत जगाचा उद्धार होणार नाही. बौद्ध धम्म हा हितकारक व कल्याणकारी आहे. त्यामुळे जगाचे कल्याण हे बौद्ध धम्मानेच होऊ शकेल, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय निचिरेन शू फेलोशिप असोसिएशन जपानचे प्रमुख भदंत कानसेन मोचिदा यांनी येथे केले.
कामठी येथील जगविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी आयोजित विशेष धम्मदेसना करताना ते बोलत होते. यावेळी ओगावा सोसायटीच्या अध्यक्ष व ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख माजी राज्यमंत्री अॅड. सुलेखा कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
भदंत कानसेन मोचिदा म्हणाले, बुद्धाचे तत्त्वज्ञान हे चातुर्वर्ण्य व्यवस्था, जातीभेद नाकारते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धाचे तत्त्वज्ञान आवडले. बौद्ध धम्म म्हणजे हिरे, माणिक, मोत्यांची खाण आहे. ही खाण डॉ. आंबेडकरांनी जातीव्यवस्थेनेने ग्रासलेल्या लोकांसाठी शोधून काढली. तसेच यातील जवाहिरांचा मुक्त वापर करण्याचा मंत्र येथील नागरिकांना दिला. बौद्ध धम्माच्या दृष्टीने भारताची स्थिती शून्यवत असली तरी भारतात बौद्ध धम्माचा वृक्ष अद्यापही जिवंत आहे. फक्त त्याचा पाला सुकलेला आहे. या वृक्षाला खतपाणी घातले तर हा वृक्ष पुन्हा फोफावेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अॅड. सुलेखा कुंभारे यांनी सांगितले की, ड्रॅगन पॅलेस टेम्पलमधून बुद्धाचे विचार हे जगभरात पोहोचवले जात आहे. या बुद्ध विहाराला आतापर्यंत एक कोटीपेक्षा अधिक लोकांनी भेटी दिल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
भिक्खू संघाच्या उपस्थितीत विशेष बुद्धवंदना
प्रारंभी जपान येथील भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना करण्यात आली. यावेळी भदंत जिजो हाताकेयामा, भदंत केन्शो नकानो, भदंत होशो सायतो, भदंत गिशो वातानाबे, भदंत ज्युसेन ताचिओका, भदंत मायोत्सू योशीमुरा, भदंत बुनजेन ईझावा, भदंत सेईजेन कोमोनोस भदंत केन्जो सायतो आदी प्रामुख्याने उपस्थित होते.