जागतिक किडनी दिवस; मूत्रसंसर्गाकडे दुर्लक्ष केल्यास मूत्रपिंडांचे नुकसान होण्याचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 08:45 AM2022-03-10T08:45:00+5:302022-03-10T08:45:02+5:30
Nagpur News मूत्रमार्गाच्या संसर्गाच्या कोणत्याही लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करू नये कारण उपचारात उशीर झाल्यास किडनीला कधीही भरून न येणारे नुकसान होऊ शकते, असे प्रतिपादन सुपर स्पेशालिटीतील युरोलॉजिस्ट डॉ.धनंजय सेलुकर यांनी केले.
मेहा शर्मा
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील बालरोग ओपीडीमध्ये प्रत्येक १०० रुग्णांपैकी ५-६ मुले मूत्रसंसर्गाची तक्रार करतात. लक्ष न दिल्यास हा संसर्ग अनेकदा मूत्रपिंडांना नुकसान पोहोचविण्यास कारणीभूत ठरतो. ‘युटीआय’चे (युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन) लवकर निदान आणि उपचार केल्यास किडनीच्या भविष्यातील समस्या टाळता येतात.
मुलांमध्ये ‘नेफ्रोटिक सिंड्रोम’ नावाची स्थिती असते. हा एक किडनीचा विकार आहे, ज्यामुळे तुमच्या शरीरात तुमच्या लघवीत जास्त प्रमाणात प्रथिने जातात. नेफ्रोटिक सिंड्रोम सामान्यतः तुमच्या मूत्रपिंडातील लहान रक्तवाहिन्यांच्या क्लस्टर्सच्या नुकसानीमुळे होतो. यामुळे १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढीची समस्या उद्भवते.
मूत्रमार्गाच्या संसर्गाच्या कोणत्याही लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करू नये कारण उपचारात उशीर झाल्यास किडनीला कधीही भरून न येणारे नुकसान होऊ शकते, असे प्रतिपादन सुपर स्पेशालिटीतील युरोलॉजिस्ट डॉ.धनंजय सेलुकर यांनी केले.
ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. सतीश देवपुजारी यांच्या मते, काही औषधे घेतल्याने मुलांना किडनीचा विकार होऊ शकतो. मूत्रपिंडाच्या सहभागाबद्दल औषधांची सुरक्षितता तपासली पाहिजे. काही अँटीबायोटिक्स किडनीला हानी पोहोचवू शकतात, असे ते म्हणाले.
मुलांपेक्षा मुलींमध्ये युरिन इन्फेक्शन जास्त आढळते. प्रौढ जीवनात मूत्रपिंड निकामी टाळण्यासाठी पाठपुरावा आणि योग्य निदान करणे महत्त्वाचे आहे. अनेक रुग्णांना बालपणी मूत्रसंसर्गाचे निदान होत नाही आणि ते मोठे झाल्यावर किडनीच्या गंभीर समस्या निर्माण करतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
युरोलॉजिस्ट डॉ. आचार्य शिवनारायण यांनी मुलांमध्ये किडनी निकामी होण्याची विविध कारणे सांगितली. व्हेसीकोरेटरल रिफ्लेक्स म्हणजे मूत्राशयातून मूत्र परत वाहणे व यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. या परिस्थितीमुळे बालपण किंवा किशोरवयीन जीवनात मूत्रपिंड निकामी होऊ शकतात, असे ते म्हणाले.
ग्रामीण भागात जास्त तपासाचा खर्च, संपर्काचा अभाव यामुळे प्रकरणे जास्त असतात, ते घरगुती उपचारांवर किंवा पर्यायी औषधांवर अवलंबून असतात व ज्यावेळी ते इस्पितळात पोहोचतात तोपर्यंत प्रकरण गुंतागुंतीचे होते. ग्रामीण भागात युटीआयबाबत जागृती आवश्यक आहे, असे मत युरोलॉजिस्ट डॉ.प्रकाश खेतान यांनी व्यक्त केले.