जागतिक फुफ्फुस दिन; ‘लंग इन्स्टिट्यूट’चा प्रस्ताव कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 10:42 AM2019-09-25T10:42:20+5:302019-09-25T10:45:50+5:30
विदर्भाचा विचार केल्यास सध्याच्या स्थितीत वीज निर्मितीचे १४ प्रकल्प आहेत. परिणामी, या भागात श्वसनाच्या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणाची टक्केवारी वाढताना दिसून येत आहे. नागपूर मेडिकलच्या श्वसनरोग विभागात दरवर्षी साधारण ‘लंग कॅन्सर’चे ५० वर रुग्णांची नोंद होते.
सुमेध वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाढते प्रदूषण व धुम्रपानाच्या सवयीमुळे शहरांमध्ये फुफ्फुसांच्या आजारांचा फास आवळत आहे. यातून केवळ अस्थमाच नव्हे तर फुफ्फुसांच्या कर्करोगाचे प्रमाणही वाढले आहे. याला गंभीरतेने घेत नागपूर मेडिकलने ‘लंग इन्स्टिट्यूट’चा प्रस्ताव तयार केला. यात लहान मुलांच्या श्वसन रोग विभागापासून ते मोठ्यांच्या छातीच्या शस्त्रक्रिया असे २३ विभागांचा समावेश असणार होता. देशातील १९५ खाटांचे हे पहिले केंद्र ठरणार होते. मेडिकल प्रशासनाने हा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला. परंतु दोन वर्षांचा कालावधी होऊनही अद्यापही हा प्रस्ताव कागदावरच आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) अहवालानुसार जगात फुफ्फुसाच्या आजाराने भारतात सर्वाधिक लोकांचा मृत्यू होतो. एक लाख लोकांमध्ये १२७ लोकांचा मृत्यू असे हे प्रमाण आहे. महाराष्ट्रातही याचे प्रमाण मोठे आहे. विदर्भाचा विचार केल्यास सध्याच्या स्थितीत वीज निर्मितीचे १४ प्रकल्प आहेत. परिणामी, या भागात श्वसनाच्या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणाची टक्केवारी वाढताना दिसून येत आहे. धक्कादायक म्हणजे, नागपूर मेडिकलच्या श्वसनरोग विभागात दरवर्षी साधारण ‘लंग कॅन्सर’चे ५० वर रुग्णांची नोंद होते. अशा रुग्णांवर तात्काळ व योग्य पद्धतीचे उपचार करण्यासोबतच संशोधनाचे दारे उघडण्यासाठी श्वसनरोग विभागाचे तत्कालीन विभाग प्रमुख डॉ. एस. व्ही. घोरपडे यांनी २०१६ मध्ये ‘लंग इन्स्टिट्यूट’चा प्रस्ताव केंद्रीय आरोग्य सेवेकडे पाठविला होता. परंतु अद्यापही याला मंजुरी मिळाली नाही.
टीबी वॉर्ड परिसरात असणार होते केंद्र
मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरात साधारण २५ एकर परिसरात ‘लंग इन्स्टिट्यूट’ प्रस्तावित होते. यात ६० खाटांचे श्वसन विभाग, ६० खाटांचे क्षयरोग विभाग, १० खाटांचा ‘ऑबस्ट्रॅक्टीव्ह एअरवे डिसीज’, पाच खाटांचा ‘इन्टरस्टीशिअल लंग डिसीज’, पाच खाटांचे निद्रा विकार, पाच खाटांचे इंटरव्हेंशनल पल्मोनरीलॉजी’, १० खाटांचे ‘इन्टरमेडिएट रेस्पीरेटरी केअर युनिट’ २० खाटांचे ‘छाती शस्त्रक्रियेचा विभाग’, तर १० खाटांचे ‘पेडियाट्रीक पल्मोनोलॉजी’ असे २३ विभागांसह त्याच्या सब विभागांचा यात समावेश होता.
फुफ्फुसांच्या रुग्णांसाठी आशेचे किरण ठरणार होते
मेडिकलमध्ये विदर्भासह छत्तीसगड, तेलंगाणा, मध्य प्रदेश येथून रुग्ण येतात. यामुळे हे ‘लंग इन्स्टिट्यूट’ मध्यभारतातील रुग्णांसाठी आशेचे किरण ठरणार होते. येथे सर्व समावेशक सेवा तर उपलब्ध होऊन सोबतच संशोधनाला प्रोत्साहन देऊन जगात हे संशोधन प्रसिद्ध केले जाणार होते.
६०० कोटीचा प्रकल्प
उपलब्ध माहितीनुसार, मेडिकलच्या ‘लंग इन्स्टिट्युट’साठी केंद्र शासन साधारण ६०० कोटी रुपये देणार होते. शिवाय १७ प्राध्यापक, २९ सहयोगी प्राध्यापक, ३४ सहायक प्राध्यापक, ३१ वरिष्ठ निवासी डॉक्टर, ६७ कनिष्ठ निवासी डॉक्टरांचे पदे निर्मिती केली जाणार होती.
नव्याने प्रस्ताव पाठविणार
वाढते श्वसन विकार व वाढता फुफ्फुसाचा कर्करोग लक्षात घेता ‘लंग इन्स्टिट्युट’ची गरज आहे. पूर्वी जो प्रस्ताव पाठविला होता त्यात नव्याने बदल केले जाणार आहे. शिवाय, आवश्यक त्या बाबींचा समावेश करून पुन्हा पाठविला जाईल. त्याचा पाठपुरावाही केला जाईल.
-डॉ. सजल मित्रा,
अधिष्ठाता, मेडिकल