जागतिक मलेरिया दिवस: पूर्व विदर्भात मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 10:04 AM2018-04-25T10:04:02+5:302018-04-25T10:04:10+5:30
आजही पूर्व विदर्भात मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येतात. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत ५,८४४ मलेरियाचे रुग्ण आढळून आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मलेरिया हा आजार दरवर्षी राज्यात शेकडोंचा जीव घेतल्याशिवाय राहत नव्हता; शिवाय मोठ्या संख्येत रुग्णांचे निदान व्हायचे. परंतु नागपूर आरोग्य विभागाने तत्काळ निदान, औषधोपचार व जनजागृतीवर विशेष भर दिल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णाच्या संख्येत २,६१४ ने घट आली आहे. असे असले तरी राज्याचा विचार केल्यास आजही पूर्व विदर्भात मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येतात. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत ५,८४४ मलेरियाचे रुग्ण आढळून आले आहेत. यात एकट्या गडचिरोली जिल्ह्यात मलेरियाच्या ४,७६१ रुग्णांची नोंद आहे.
मलेरियाची लागण होणाऱ्या जगातील प्रमुख देशांमध्ये भारताचाही नंबर लागतो. ‘अॅनोफेलिस’ नावाचा डास चावल्यामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो. वाढती लोकसंख्या आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे मलेरिया पसरतो. जगात दरवर्षी ३० ते ५० कोटी नागरिकांना मलेरिया होतो. त्यापैकी हजारो नागरिक मृत्यूच्या खाईत ढकलले जातात. जगात प्रति ३० सेकंदाला एक बालक मलेरियाला बळी पडतो. उपसंचालक नागपूर आरोग्य विभागांतर्गत येणाºया नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये आजही सर्वाधिक रुग्ण दिसून येतात. यात गडचिरोलीसह चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यात आजही सर्वाधिक रुग्णांची नोंद होत आहे.
गडचिरोलीत २०१६ मध्ये होते ३२ हजार रुग्ण
गडचिरोली जिल्ह्यात मलेरियाचे २०१४-१५ मध्ये २४ हजार ४६९ रुग्ण होते. २०१५-१६ मध्ये यात वाढ होऊन रुग्णांची संख्या ३२ हजार १३६ वर पोहचली. मात्र हिवताप विभागाने या भागात विशेष उपक्रम हाती घेतल्याने २०१६-१७ मध्ये हीच संख्या ६ हजार ८३७ वर आली. तर २०१७-१८ मध्ये हा आकडा ४,७६१वर पोहचला. रुग्ण कमी होत असले तरी राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत हा आकडा सर्वात मोठा आहे. विशेष म्हणजे, २०१५-१६ मध्ये १२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद होती ती आता २०१६-१७ मध्ये चारवर आली आहे. गेल्या वर्षीही चारच मृत्यूची नोंद आहे.
गडचिरोलीत हिवताप अधिकारी वाढण्याची गरज
गडचिरोली जिल्ह्याचा परिसर मोठा आहे. परंतु येथे एकच जिल्हा हिवताप अधिकारी आहे. यामुळे त्यांच्याकडून संपूर्ण जिल्ह्याचे नियोजन करणे कठीण जात असल्याचे चित्र आहे. तज्ज्ञानुसार, येथे तीन जिल्हा हिवताप अधिकारी दिले तर हे चित्र पालटू शकेल व रुग्णांची संख्या कमी होऊ शकेल.
तीन वर्षांत रुग्णांची संख्या झाली कमी
गडचिरोलीत २०१६ मध्ये ३२ हजार रुग्ण आढळून आले होते. येथील मलेरियावर नियंत्रण मिळविण्यासाठी वार्षिक जंतू निर्देशांकानुसार गावांचे वर्गीकरण केले. यातील प्रभावित गावांमध्ये जास्तीत जास्त सर्वेक्षण करून उपाययोजना करण्यात आल्या. सोबतच प्रयोगशाळेच्या विकेंद्रीकरणामुळे तत्काळ आजाराचे निदान करून रुग्णाला औषधोपचाराखाली आणले. यामुळे २०१७ मध्ये या जिल्ह्यातील मलेरियाच्या रुग्णांमध्ये ७७ टक्के अशी मोठी घट झाली आहे. तर यावर्षी ३० टक्क्यांनी घट झाली आहे.
डॉ. मिलिंद गणवीर
सहायक संचालक आरोग्य सेवा (हिवताप) नागपूर