‘स्क्रीन ॲडिक्शन’च वाढवतेय मानसिक आजार; मुलांपेक्षा प्रौढांमध्ये अधिक व्यसन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2022 02:32 PM2022-10-10T14:32:44+5:302022-10-10T14:36:32+5:30
जागतिक मानसिक आरोग्य दिन : मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता
नागपूर : जेव्हा ‘स्क्रीन ॲडिक्शन’ विचार केला जातो, तेव्हा स्मार्ट फोन, कॉम्प्युटर, टीव्ही वापरणारी मुले किंवा किशोरवयीन मुलांची चर्चा होते. परंतु त्यांच्या तुलनेत ‘स्क्रीन ॲडिक्शन’चे प्रमाण प्रौढांमध्ये अधिक आहे. परिणामी, त्यांच्यामध्ये मानसिक समस्या अधिकच निर्माण होत असल्याची माहिती मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आभा बंग सोनी यांनी येथे दिली.
१० ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. त्यानिमित्ताने सायक्रियाट्रिक सोसायटी नागपूरच्यावतीने रविवारी ‘आयएमए’ सभागृहात आयोजित निरंतर वैद्यकीय शिक्षण (सीएमई) कार्यक्रमात ‘स्क्रीन टाइम कसे नियंत्रित करावे’ या विषयावर त्या बोलत होत्या. उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सागर चिद्दरवार व सचिव डॉ. अभिजित फाये उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित तज्ज्ञांनी तणावाचे व्यवस्थापन या विषयांवर मार्गदर्शन केले. या दरम्यान वरिष्ठ मनोचिकित्सक डॉ. राजेंद्र सारडा यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सायकोलॉजी विभागाचा माजी विभाग प्रमुख डॉ. सी.जी. पांडे यांना ‘समाज मन स्वास्थ’ पुरस्कार देण्यात आला.
दररोज दोन तासांपेक्षा कमी वेळ ‘स्क्रिन’ पाहा
डॉ. सोनी यांनी ‘डिजिटल मिनिमलिझम’ची संकल्पना स्पष्ट करताना सांगितले, प्रौढांनी त्यांच्या कामाचा व्यतिरिक्त दररोज दोन तासांपेक्षा कमी ‘स्क्रीन’ पाहण्याचा वेळेची मर्यादा पाळायला हवी.
पहाटे फोन वापरणे टाळा
त्या म्हणाल्या, ‘स्क्रीन टाइम’चा उद्देश स्पष्ट असला पाहिजे. यावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक ‘ॲप्स’ स्मार्ट फोनमध्ये आधीपासूनच स्थापित आहेत. परंतु अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात. ‘स्क्रीन ॲडिक्शन’टाळण्यासाठी स्मार्ट फोन वापरताना ‘टाइम फ्रेम’ सेट करा, पहाटे फोन वापरणे टाळा, घरी परतल्यानंतर, झोपण्याच्या एक तास आधी फोन बंद करा.
‘स्क्रीन’चे वाढते व्यसन
: डॉ. सोनी यांच्यानुसार, भारतात ६५.८ कोटी लोक इंटरनेट वापरतात
: ४६.७ कोटी लोक सोशल मीडियाचा वापर करतात
: दररोज ४ तासांपेक्षा जास्त वेळ प्रौढ स्क्रीनसमोर घालवतात
: एक प्रौढ व्यक्ती दिवसातून ५८ वेळा फोन तपासतो
: ६६ टक्के लोक स्मार्ट फोनचा वापरतात
: ८४ टक्के लोक त्यांना आलेले फोन बेडवर घेतात
: ५६ टक्के लोक जेवण करताना देखील फोन तपासतात
: १५ टक्के लोक मान्य करतात की, वाहन चालवितानाही ते ‘एसएमएस’ पाठवतात