जागतिक मानसिक आरोग्य दिन; मोबाईल बंद असतानाही मोठमोठ्याने बोलणे हा आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2021 07:30 AM2021-10-10T07:30:00+5:302021-10-10T07:30:02+5:30
Nagpur News १० ऑक्टोबर हा दिवस मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने शहरातील मानसोपचारतज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलून मानसिक आजारावर प्रकाश टाकला.
सुमेध वाघमारे
नागपूर : अतिउत्साहीपणा दाखवित काही जण मोबाईल बंद असतानाही मोबाईलवर मोठमोठ्याने बोलून स्वत:ला वेगळे दाखविण्याचा प्रयत्न करतात. तर, काही उघडपणे चारचौघांत मोठ्यामोठ्या गोष्टी करतात. काही जण दिलदारीपणा दाखवत वारेमाप पैसा उधळतात. वैद्यकीय भाषेत याला ‘बायपोलर मूड डिसॉडर’ म्हणतात. प्रत्येक १०० व्यक्तींमध्ये साधारण दोघांना हा आजार असू शकतो, अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञांनी दिली. (World Mental Health Day)
९ ऑक्टोबर हा दिवस मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने शहरातील मानसोपचारतज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलून मानसिक आजारावर प्रकाश टाकला.
-या आजाराला वयाची मर्यादा नाही-डॉ. शर्मा
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कनक गिल्लूरकर-शर्मा म्हणाल्या की, काही जणांना इतरांच्या तुलनेत मी कसा वेगळा आहे, मला कसे अधिकार प्राप्त आहेत, मी कसा दिलदार आहे हे दाखविण्याची सवय असते. ‘कार्पोरेट क्षेत्रात’ अशा व्यक्ती आपल्यापेक्षा उच्चपदस्थांना खूष करण्यासाठी वारेमाप खर्च करतात. वास्तविक याची काहीही आवश्यकता नसते. प्रत्यक्षात मेंदूतल्या रासायनिक घटकांचे असंतुलन झाले तर अशा गोष्टी घडत असतात. या उलट अचानक काही लोक छोट्याशा गोष्टींवर अचानक उदासीन होऊन जातात. याला ‘बायपोलर मूड डिसॉडर’ म्हणातात. हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. अशा आजाराच्या रुग्णांनी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.
-मेंदू आणि भावना यांचा परस्पर संबंध - डॉ. ठाकरे
मेडिकलच्या मनोविकृती शास्त्र विभागाचे डॉ. मनीष ठाकरे म्हणाले की, मेंदू आणि भावना यांचा परस्पर संबंध येत असल्याने व्यक्ती अतिभावूक झाला तर त्याच्या मेंदूतल्या रसायनांवर ताण पडतो. चिंता, राग, द्वेष, इर्शा, भय, अतिउत्साह, काळजी या मानवी स्वभावांचा व्यक्तीच्या मेंदूतील रयासनांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव पडतो. त्यामुळे रसायनांचे संतुलन बिघडून व्यक्ती नैराश्यात लोटली जाण्याची शक्यता असते. मानसिक आजारावरील औषधे ही मेंदूतल्या रसायनांचे संतुलन राखण्यास मदत करतात. तर समुपदेशन हे व्यक्तीच्या स्वभावावर परिवर्तनासाठी आवश्यक ठरते, असेही ते म्हणाले.
-नैराश्याचे प्रमाण वाढत आहे-डॉ. गावंडे
मानसोपचारतज्ज्ञ व सायकॅट्रिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुशील गावंडे म्हणाले की, कोरोनापूर्वी नैराश्याचे प्रमाण जवळपास १५ टक्के होते, कोरोनामुळे ते वाढून २० ते २५ टक्क्यांवर गेले आहे. या मागे कोरोनामुळे बंद झालेले व्यवसाय, बेरोजगारी, घरात झालेले मृत्यू, आजारपणामुळे शरीराला आलेले व्यंगत्व, उपचारात खर्च झालेला पैसा अशी अनेक कारणे आहेत. विशेष म्हणजे, ज्यांच्या कुटुंबामध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला अशा कुटुंबामध्ये नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. अशा १०० कुटुंबांमध्ये १२ ते १४ कुटुंबांत मानसिक आजाराचे रुग्ण दिसून येत आहेत.