भगवान महावीरांच्या जन्मोत्सवात विश्वशांतीचा संदेश
By Admin | Published: April 10, 2017 02:24 AM2017-04-10T02:24:44+5:302017-04-10T02:24:44+5:30
भगवान महावीर स्वामी यांचा २६१६ वा जन्म कल्याणक महोत्सव रविवारी शहरात आनंदात साजरा झाला.
उपराजधानीत ठिकठिकाणी अभिषेक-पूजा : शोभायात्रेतील नयनरम्य देखाव्यांनी वेधले लक्ष
नागपूर : भगवान महावीर स्वामी यांचा २६१६ वा जन्म कल्याणक महोत्सव रविवारी शहरात आनंदात साजरा झाला. यावेळी धर्मध्वजा उंचावून ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत भगवान महावीर रथावर स्वार होऊन निघाले. या महोत्सवाने विश्वशांतीचा संदेश दिला.
अहिंसेचा मार्ग पत्करून ‘जीयो और जीने दो’चा मूलमंत्र सांगितला. विविध मंदिरांमध्ये सकाळपासूनच अभिषेक, पूजाअर्चना सुरू झाली. धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले. संध्याकाळी भक्तीसंध्येत सहभागी होऊन भाविकांनी भगवान महावीर यांचे गुणगान केले. या महोत्सवादरम्यान श्री जैन सेवा मंडळातर्फे सकाळी ७.३० वाजता इतवारीतील श्री दिगंबर जैन शांतिनाथ मंदिरातून शोभायात्रा काढण्यात आली. भव्य रथावर भगवान विराजमान झाले. सोबत विविध देखाव्यांच्या माध्यमातून प्रेम, करुणा, दयेचा संदेश देण्यात आला. या शोभायात्रेत मुनिश्री उपशमसागरजी गुरुदेव रथावर स्वार होते. लेझिम पथकानेही लक्ष वेधले. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष जिनेंद्र जैन लाला, मंत्री सतेंद्र जैन मामू यांच्या मार्गदर्शनात ही शोभायात्रा इतवारी, महाल, टिळक पुतळा होत ९.३० वाजता चिटणीस पार्क येथे पोहोचली. येथे भगवान महावीरांचा अभिषेक आणि पूजन करण्यात आले. चंद्रकांतजी वेखंडे आणि पंकज बारिया यांनी दीपप्रज्वलन तर अनिलकुमार जैन यांनी ध्वजारोहण केले. परवारपुरा महिला मंडळ आणि आदर्श महिला मंडळाने ध्वजगीत सादर केले. लाडपुरा महिला मंडळाद्वारे मंगलाचरण सादर करण्यात आले.(प्रतिनिधी)
यांची होती उपस्थिती
यावेळी मंचावर भारतवर्षीय दिगंबर तीर्थरक्षा कमिटीच्या अध्यक्ष सरिता जैन कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून तर प्रमुख अतिथी म्हणून अनिलकुमार जैन, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. राजू शेट्टी, खा. अजय संचेती, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, आ. विकास कुंभारे, कृष्णा खोपड़े, जिनेंद्र लालाजी, सुभाष कोेटेचा, राष्ट्रीय महामंत्री, तीर्थरक्षा कमिटी संतोष पेंढारी, प्रा. डी. ए. पाटील, सतीश जैन कोयलावाले, संजय महाजन, प्रकाश मारवड़कर उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत जैन सेवा मंडळचे अध्यक्ष सतीश पेंढारी जैन, मंत्री पीयूष शाह, उपाध्यक्ष डॉ. कमल पुगलिया, शरद मचाले, कोषाध्यक्ष विजय उदापूरकर, उपमंत्री संजय टक्कामोरे, रवींद्र वोरा, मनोज बंड, पंकज बोहरा, संजय नेताजी, रिंकू जैन, महिला अध्यक्ष कश्मिरा पटवा, शीला उदापूरकर यांनी केले.
भक्तीच्या रंगात साधूंचा सहवास
या कार्यक्रमात प.पू. वज्ररत्न म.सा. हे आपल्या संदेशात म्हणाले, भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवात भक्तीचा रंग आणि साधूंचा सहवास लाभला आहे. कर्माशी लढताना एकता आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले, नागपुरात जैन सेवा मंडळद्वारे कॉलेज व्हायला हवे. यावेळी त्यांना खा. राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत समाजातर्फे प्रखर प्रवचनकाराची पदवीही प्रदान करण्यात आली. याप्रसंगी खा. अजय संचेती म्हणाले, विश्वासाच्या भावनेने समाजाची सेवा करायला हवी. खा. शेट्टी म्हणाले, कर्नाटक सरकारने भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवात जसे योगदान दिले तसेच योगदान महाराष्ट्र आणि भारत सरकारनेही द्यावे, यासाठी मी पुढाकार घेईल. अध्यक्षीय भाषण करताना सरिता जैन म्हणाल्या, नागपुरी संत्र्यांमध्ये जसा गोडवा आहे तसाच गोडवा तीर्थरक्षा कमिटीत आहे.
पार्श्वनाथ मंदिर, पारडी
येथे मंदिरातून प्रभातफेरी काढण्यात आली. स्वरूप संकुलात साध्वी सुरेखा यांचे प्रवचन झाले. पंचकल्याणक पूजा पार पडली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वरूपचंद लुणावत, सुरेश लुणावत, नीलेश मेहता, विजय सिंघी, महेंद्र रामानी यांनी सहकार्य केले.
महावीर वूमन्स क्लब
येथे आयुर्वेदिक तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ३०० लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष वैशाली नखाते, दीपाली भुसारी, सरिता सावलकर, पूजा मानेकर, मंजू बिबे, मंगला सावलकर, अर्चना शाहाकार, मनीषा रोहणे, राणी जैन, दीप्ती गिल्लूरकर, शुभांगी पांडवकर, स्वाती पळसापुरे, सोनाली सवाने, उज्ज्वला बेलसरे यांनी सहकार्य केले.