जागतिक संग्रहालय दिन; कुठे ‘ऑनलाईन’ चित्रकला तर कुठे ‘व्हर्चुअल टूर’ची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 09:19 AM2020-05-18T09:19:47+5:302020-05-18T09:20:57+5:30
देशात सुरू असलेल्या टाळेबंदीमध्येच यंदा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस साजरा केला जात आहे. त्याअनुषंगाने शहरातील विविध संग्रहालयांद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कुठे ‘ऑनलाईन’ चित्रकला स्पर्धा तर कुठे ‘व्हर्च्युअल टूर’ची तयारी केली जात आहे.
सैयद मोबीन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात सुरू असलेल्या टाळेबंदीमध्येच यंदा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस साजरा केला जात आहे. त्याअनुषंगाने शहरातील विविध संग्रहालयांद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कुठे ‘ऑनलाईन’ चित्रकला स्पर्धा तर कुठे ‘व्हर्च्युअल टूर’ची तयारी केली जात आहे. या साऱ्या आयोजनांमध्ये टाळेबंदीच्या नियमाचे उल्लंघन होणार नाही, याची काळजीही घेतली जात आहे.
शहरात तीन प्रमुख संग्रहालये आहेत. एक सिव्हील लाईन्स येथील मध्यवर्ती संग्रहालय, दुसरे सेमिनरी हिल्स येथील जीएसआय म्युझियम आणि तिसरे मोतीबाग येथील नॅरोगेज रेल्वे संग्रहालय. मध्यवर्ती संग्रहालयातर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जीएसआय संग्रहालयात आगंतुकांसाठी थर्मल स्कॅनर, हॅण्ड सॅनिटायझरीसारख्या सजगता राखणाऱ्या गोष्टींचा वापर करण्यात येत आहे तर नॅरोगेज रेल्वे संग्रहालयाच्या वतीने व्हर्च्युअल टूरची व्यवस्था करण्यात येत आहे.
भेट देण्याची इच्छा असणाऱ्यास परवानगी
टाळेबंदीमुळे संग्रहालय आगंतुकांसाठी बंदच आहे तरी देखील संग्रहालय दिनाच्या पार्श्वभूमीवर जीएसआय संग्रहालय बघण्याची कुणाची इच्छा असेल तर त्यांना परवानगी देण्यात येईल. यासाठी भेट देणाऱ्यांना द्वारावरच थर्मल स्कॅनर मशीनमधून जावे लागेल आणि जागोजागी हॅण्ड सॅनिटायर देखील ठेवण्यात आले आहे. टाळेबंदी असली तरी कार्यालयातील कर्मचारी व सफाईकर्मी नियमित येत आहेत. त्यामुळे संग्रहालयाचे हाऊसकिपिंग व मेन्टेनन्स सांभाळले जात आहे. परंतु, कॉलेज, शाळेचे विद्यार्थी, ऑफिशियल पर्सन्ससाठी भूमी संवाद मात्र बंद ठेवण्यात आले आहे.
- विशाल साखरे, डायरेक्टर, जीएसआय
नॅरोगेज रेल्वे म्युझियमतर्फे व्हर्च्युअल टूर
टाळेबंदीमुळे सध्या सर्वच बंद असले तरी भविष्यात प्रत्येक जण घरी बसून नॅरोगेज रेल्वे म्युझियमचे ‘व्हर्च्युअल टूर’ करू शकणार आहे. रेल्वे बोर्डाने यासाठी मार्गदर्शिका जारी केली होती आणि म्युझियममधील फोटो व डेटा मागविला होता. ही प्रक्रिया पार पडली आहे. सध्या म्युझियममध्ये केवळ ‘हाऊसकिपिंग’ व ‘मेन्टेनन्स’चे काम सुरू आहे.
ऑनलाईन चित्रकला स्पर्धा
पाचवी ते दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घरूनच ‘ऑनलाईन’ चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ऐतिहासिक स्मारक, प्रतिमा, इतिहास व संस्कृतिक संबंधित विषयांवर ही स्पर्धा असणार आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर ही चित्रे प्रत्यक्ष संग्रहालयात पोहोचवायची आहेत. संग्रहालय सर्वसामान्यांसाठी बंद असले तरी कार्यालय सुरू आहे आणि साफसफाई केली जात आहे.
- जया वाहणे, क्युरेटर, सेंट्रल म्युझियम