जागतिक संगीत दिन; दिव्यांगांचे संगीतमय ‘दिव्यरंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 10:36 AM2018-06-21T10:36:59+5:302018-06-21T10:37:08+5:30
शिल्पा कोमलकर-नगरारे यांना पोलिओने ग्रासले आणि समोरच संपूर्ण जीवन त्यांना अंधकारात दिसू लागलं. पण माणूस संकटांमुळे जगायचा सोडत नाही. मैत्रिणींसमोर गाताना कुणीतरी तिला सुचवले की तिने गायन क्षेत्राकडे वळावे आणि तिनेही हा सल्ला मनावर घेतला.
अंकिता देशकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिल्पा कोमलकर-नगरारे यांना पोलिओने ग्रासले आणि समोरच संपूर्ण जीवन त्यांना अंधकारात दिसू लागलं. पण माणूस संकटांमुळे जगायचा सोडत नाही ना. शिल्पा मैत्रिणींसमोर गाताना कुणीतरी तिला सुचवले की तिने गायन क्षेत्राकडे वळावे आणि तिनेही हा सल्ला मनावर घेतला. पुढे संगीत विषयात स्नातकोत्तर पदवी प्राप्त केली व एका खासगी शाळेत संगीत शिक्षक म्हणून रु जू झाल्या.
मुलांना शिकविताना त्यांना जाणवले की अपंग आणि अंध लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता आहे. या शारीरिक कमतरता असलेल्यांना आत्मविश्वास देण्याचा निर्धार त्यांनी केला. कारण ही मानसिक अवस्था त्यांनीही भोगली होती. त्यांनी अनेक दिव्यांगांना एकत्रित करून ‘दिव्यरंग’ची स्थापना केली. हे दिव्यरंग त्यांच्यासारख्या अनेक मुलांसाठी आत्मविश्वासाचे स्रोत झाले आहे. सुरुवातीला कसे होईल, अशी धाकधूक होती, परंतु एकदा ही मुले मंचावर गेली आणि पुढे दिव्यत्वाचा हा प्रवास सुरू झाला. पुढे विजय देशपांडे, लक्ष्मी पांडे, जितेश ठाकरे, शशी परमार, संजय, सौरभ किल्लेदार आणि श्रेयस आदी कलावंत या ग्रुपमध्ये सामील झाले.
दिव्यरंगने जेमतेम सुरु वात केली असून सध्या त्यांनी काही कार्यक्रम सादर केले आहेत. मात्र ही सुरुवात या अभावग्रस्तांना मानसिक बळ देणारीच आहे. आधी गाणे ठरवायचे, कुणा एकाकडे गोळा व्हायचे आणि जोमाने रियाज करायचा, असा त्यांचा नित्यक्रम. एकाच वेळी भेटणे शक्य नाही म्हणून जसे जमेल तसा रियाझ करायचा आणि उत्साहाने कार्यक्रम सादर करायचा. अशा अवस्थेतही ही भट्टी चांगली जमून आली आहे.
या समूहातील दोन कलाकार अपंग नाहीत. त्यामुळे या सर्व प्रयत्नात त्यांची मदत मोलाची ठरत असल्याचे शिल्पा कोमलकर यांनी सांगितले. घरगुती भजनाच्या कार्यक्र मापासून ते स्टेजवरही या कलावंतांनी कार्यक्रम सादर केले आहेत. अवहेलना, उपेक्षा सहन करताना संगीताचा हा प्रवास या समूहातील कलावंतांसाठी नवी उमेद घेऊन आलाय.