जागतिक निसर्ग संवर्धन दिवस; गाेरेवाडा जंगलात १९० प्रजातीचे पक्षी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 10:21 AM2021-07-28T10:21:58+5:302021-07-28T10:23:21+5:30
Nagpur News नागपूर जिल्ह्यात जवळपास २५० ते ३०० प्रजातींचे स्थानिक व स्थलांतरित पक्षी आढळून येतात. त्यातील सर्वाधिक १९० प्रजातीच्या पक्ष्यांचा गाेरेवाडा जंगल परिसरात अधिवास आहे.
निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पक्षी हे निसर्गातील महत्त्वाचा घटक आहे. वृक्षांच्या परागीकरणापासून ते पिकांवरील किटकांना नष्ट करण्यामध्ये पक्ष्यांची भूमिका महत्त्वाची आहे. जगातील एकूण प्रजातींपैकी १३ टक्के म्हणजे जवळपास १३०० प्रजाती भारतात आढळून येतात. नागपूरचा परिसरही याबाबत श्रीमंत म्हणावा लागेल. जिल्ह्यात जवळपास २५० ते ३०० प्रजातींचे स्थानिक व स्थलांतरित पक्षी आढळून येतात. त्यातील सर्वाधिक १९० प्रजातीच्या पक्ष्यांचा गाेरेवाडा जंगल परिसरात अधिवास आहे.
विज्ञान संस्था, अमरावतीचे प्रा. डाॅ. किशाेर पाटील व इन्स्टिट्यूट ऑफ फाॅरेन्सिक सायन्स, नागपूरचे प्रा. रवींद्र शेंडे यांनी गाेरेवाडा परिसरातील पक्ष्यांवर अभ्यास करून प्रजातींचे कुटुंब व ऑर्डरसह नाेंदी केल्या आहेत. त्यांचे हा अभ्यास पेपर आंतरराष्ट्रीय विज्ञान पत्रिकेत प्रकाशित झाला आहे. गाेरेवाडा तलाव १९१२ मध्ये शहरातील पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी विकसित करण्यात आला. सभाेवतालचा भाग जंगलाने व्यापला असून अनेक प्रजातीचे पक्षी व प्राण्यांचा अधिवास त्यात आहे. याच परिसरात आज गाेरेवाडा आंतरराष्ट्रीय पार्क विकसित केले जात आहे. प्रा. पाटील व प्रा. शेंडे यांनी केलेल्या अभ्यासानुसार संपूर्ण परिसरात १९० प्रजातीच्या पक्ष्यांचे वास्तव्य आहे. यामध्ये ४६ टक्के म्हणजे ८९ प्रजाती या स्थानिक आहेत. ७७ स्थानिक स्थलांतरित तर २४ प्रजाती परदेशी स्थलांतरित आहेत. सर्वाधिक प्रजाती मान्सून व थंडीच्या काळात आढळून आले.
- गाेरेवाडाजवळच्या बाेरगाव भागातून ७२ प्रजाती नाेंदविण्यात आल्या आहेत.
- प्रा. चिंचखेडे व प्रा. केदार यांनी केलेल्या अभ्यासानुसार काेराडी तलाव परिसरात ७६ प्रजातींच्या नाेंदी करण्यात आल्या. यात ५४ स्थानिक, ९ हंगामी स्थलांतरित व १३ हिवाळ्यात स्थलांतर करणाऱ्या आहेत.
गेल्या काही वर्षात नागपुरातील पक्षी नामशेष हाेण्याची नाेंद नाही. मानवी हस्तक्षेपामुळे संख्या कमीअधिक हाेऊ शकते. मात्र काही प्रजाती धाेकादायक स्थितीत पाेहोचत आहेत. या पक्ष्यांच्या संवर्धनाची निश्चित गरज आहे.
- प्रा. वीरेंद्र शेंडे, अभ्यासक
नाेंदी केलेल्या महत्त्वाच्या प्रजाती
ग्रेट क्रेस्टेड ग्रेब, लिटल ग्रेब, डार्टर, माेठा पाणकावळा, भारतीय पाणकावळा, पाणकाेंबडी, एशियन ओपन बिल, ग्रे हेराॅन, जांभळा बगळा, गाय बगळा, येलाे बिटर्न, बदक प्रजातीचे स्थानिक व स्थलांतरित पक्षी, गडवाल, काॅमन पाेचार्ड आदी प्रजातींचा समावेश आहे.