जागतिक निसर्ग संवर्धन दिन; १६० च्यावर वनस्पती प्रजाती धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 10:21 AM2020-07-28T10:21:04+5:302020-07-28T10:23:24+5:30
उपयोगासाठी अतिदोहन झाल्याने वनस्पतींच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. एका सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील १६० ते १६६ प्रजातींच्या वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
निशांत वानखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वनस्पतीशिवाय मानवासह सर्वच सजीव प्राण्यांचे जगणे अशक्य आहे. प्रत्येक सजीव प्राण्याची अन्नाची गरज प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे झाडांवरच अवलंबून आहे. आता कुठे वृक्ष संवर्धनाबाबत बऱ्यापैकी जनजागृती होत आहे मात्र पूर्वीच्या दुर्लक्षामुळे किंवा उपयोगासाठी अतिदोहन झाल्याने वनस्पतींच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. एका सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील १६० ते १६६ प्रजातींच्या वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
‘फ्लोरा ऑफ नागपूर डिस्ट्रिक्ट’ या पुस्तकाच्या माध्यमातून नागपूर जिल्हा तसेच विदर्भ व महाराष्ट्रातील वनस्पतींचा अभ्यास करणारे वनस्पतीतज्ज्ञ डॉ. नानासाहेब उगेमुगे यांनी प्रत्येक प्रजातीच्या वृक्षसंवर्धनाची गरज व्यक्त करताना ही माहिती दिली. वनस्पती म्हटले की लोक उंच झाडे, वेली, फुलांची झाडे आदींचाच विचार करतात. मात्र या सृष्टीत केवळ त्याच नाही तर शेवाळ, मशरूम, कंदमुळे, रान वनस्पती अशा असंख्य वनस्पतींचा समावेश आहे. मात्र मानवी हव्यास आणि दुर्लक्षामुळे पूर्वी दिसणाऱ्या यातील अनेक वनस्पती आता दुर्मिळ झाल्या आहेत. यात विदर्भातील २० ते २५ प्रजातींचा समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले.
यामध्ये खाद्य उपयोगी व औषधी वनस्पतींचा समावेश आहे. यातल्या काही प्रजातींचा डॉ. उगेमुगे यांनी आवर्र्जून उल्लेख केला. कंदमुळे प्रजातीतील सफेद मुसळी (गर्भवती स्त्रियांना लाभदायक), पांढरा पळस, पांढरा गुंजा, कृष्ण वड, गुडमार (मधुमेही रुग्णांसाठी लाभकारी), सीता अशोक, पिवळी घाणेरी किंवा गोगल (शिवरात्रीच्या काळात फुलते), कराया गम (डिंक उपयोगी), रक्तरोहन (औषधी), शमी (दसऱ्याच्या वेळी फुलणारी), रक्तचंदन (मधुमेही रुग्णांसाठी उपयोगी), नक्स होमिका (कुचला) काटवेल (खाद्यउपयोगी) अशा काही प्रमुख वनस्पती त्यांनी नमूद केल्या.
डॉ. उगेमुगे यांनी १९८६ साली त्यांचा ‘फ्लोरा ऑफ नागपूर डिस्ट्रिक्ट’ हा जिल्ह्यातील वनस्पतींवरील शोधनिबंध प्रसिद्ध केला. त्यावेळी जिल्ह्यात १,१३६ प्रजातींच्या वनस्पती असल्याचे नमूद केले आहे. यात गेल्या काही वर्षात १४० ते १५० प्रजातींची भर पडली आहे. विदर्भात १५०० च्यावर प्रजातींच्या वनस्पती उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
३०० च्यावर औषधी वनस्पती
प्रत्येक वनस्पतीमध्ये काही ना काही गुणधर्म असतात. काही खाद्य उपयोगी तर बहुतेक हवा व पाणी शुद्धीकरणासाठी उपयोगी असतात. यात विशिष्टपणे औषधी वनस्पती म्हणून उपयोगी येणाऱ्या ३०० च्यावर प्रजाती विदर्भात असल्याची शक्यता डॉ. उगेमुगे यांनी व्यक्त केली. यामध्ये निरगुडी, कंबरमोडी, गुळवेल, खडूचक्का, भुईनीम, खोबरवेल, गुंज, कनेरा, घाणेरी, माका, गवतीचहा, निवडुंग, काटेसावर अशा वनस्पतींचा समावेश आहे.