जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग दिन; ‘एनटीडी’ रोगामुळे एक अब्जाहून अधिक लोक प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2022 07:00 AM2022-01-30T07:00:00+5:302022-01-30T07:00:13+5:30
Nagpur News ‘दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग’ ( एनटीडी) हा जगातील सर्वात गरीब देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळणारा रोग आहे. या रोगाने जागतिक स्तरावर एक अब्जाहून अधिक लोक प्रभावित होतात.
नागपूर : ‘दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग’ ( एनटीडी) हा जगातील सर्वात गरीब देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळणारा रोग आहे. या रोगाने जागतिक स्तरावर एक अब्जाहून अधिक लोक प्रभावित होतात. या रोगाच्या जनजागृतीवर व उपाययोजनांवर भर देण्याचे आवाहन ट्रॉपिकल न्यूरोलॉजी स्पेशॅलिटी ग्रुपचे अध्यक्ष व वर्ल्ड फेडरेशन आॅफ न्यूरोलॉजीचे विश्वस्त डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी केले आहे.
दरवर्षी ३० जानेवारी रोजी जागतिक उपेक्षित उष्णकटिबंधीय रोग दिवस साजरा केला जातो. डॉ. मेश्राम म्हणाले, ज्या देशांमध्ये पाण्याची सुरक्षा, स्वच्छता आणि आरोग्य सेवांचा दर्जा उच्च नाही तिथे हा रोग सर्वाधिक दिसून येतो. ‘एनटीडी’मध्ये सिस्टीसरकोसिस, डेंग्यू, चिकुनगुनिया, चागास डीसीस, ड्रॅकनकुलियासिस (गिनी वर्म रोग), इकिनोकोकोसिस, मानवी आफ्रिकन ट्रीपॅनोसोमियासिस (झोपेचा आजार) लेशमॅनियासिस, कुष्ठरोग, हत्तीरोग, आॅन्कोसेरसियासिस, रेबिज, खरूज आदी रोगांचा समावेश होतो. भारतात या रोगाचे अधिक प्रमाणात रुग्ण दिसून येतात. यामुळे ‘एनटीडी’बद्दल अधिक माहिती असणे आवश्यक आहे.
-‘डब्ल्यूएचओ’ काय म्हणते?
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक, डॉ. टेड्रोस अधानोम गेब्रेयसस, म्हणाले. सध्या सुरू असलेल्या कॉरोना महामारीतही या रोगांचे प्रमाण वाढले आहे. २०२० मध्ये ७५७ दशलक्ष लोकांना हा आजार आढळून आला. जवळपास एक अब्जाहून अधिक लोक या रोगाने प्रभावित आहेत.
-न्यूरो सिस्टीसरकोसिस
इंडियन अकादमी आॅफ न्यूरोलॉजीचे निर्वाचित अध्यक्ष डॉ. गगनदीप सिंग म्हणाले, ‘न्यूरो सिस्टीसरकोसिस’ हा आजार ‘टेनिया सोलियम’ (टेप वर्म) म्हणजे, ‘फीत जंतांच्या अळ्या पासून होतो. मेंदूमध्ये ‘सिस्टीसरकोसिस’च्या अळ्या जाणे हे मिरगी येण्याचे महत्त्वाचे कारण ठरते. हा आजार प्रामुख्याने लॅटिन अमेरिका, दक्षिण पूर्व आशिया आणि आफ्रिकेत आढळतो. या देशातील ३० टक्के मिरगीचे झटके ‘सिस्टीसरकोसिस’मुळे येतात. दरवर्षी जगात ५० लाख लोकांना हा संसर्ग होतो. आणि ५० हजार लोकांचा मृत्यू होतो. जिथे डुकराचे संख्या जास्त असते किंवा डुकरांचा मुक्त संचार लोकवस्तीमध्ये असतो, अशा गाव खेड्यात या आजाराचे प्रमाण अधिक आहे.