जागतिक तंबाखू विरोधी दिन; फुप्फुसाचा कॅन्सरच्या ४८ टक्के रुग्णांना धूम्रपानाचे व्यसन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2022 07:00 AM2022-05-31T07:00:00+5:302022-05-31T07:00:07+5:30

Nagpur News मेडिकलच्या श्वसनरोग विभागाकडे नोंद झालेल्या १०० फुप्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये ४८ रुग्णांना धूम्रपानाचे व्यसन होते. या कर्करोगाच्या ८० टक्के मृत्यू होण्यामागे धूम्रपानाची सवय कारणीभूत असल्याचे पुढे आले आहे.

World No Tobacco Day; 48% of lung cancer patients are addicted to smoking | जागतिक तंबाखू विरोधी दिन; फुप्फुसाचा कॅन्सरच्या ४८ टक्के रुग्णांना धूम्रपानाचे व्यसन

जागतिक तंबाखू विरोधी दिन; फुप्फुसाचा कॅन्सरच्या ४८ टक्के रुग्णांना धूम्रपानाचे व्यसन

Next
ठळक मुद्देतंबाखूमुळे कर्करोग होण्याचे प्रमाण वाढीस टीबीचे ११ टक्के रुग्णही ‘चेन-स्मोकर’

नागपूर : तंबाखूचा कुठलाही प्रकार कर्करोगाचा धोका वाढवितो. मेडिकलच्या श्वसनरोग विभागाकडे नोंद झालेल्या १०० फुप्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये ४८ रुग्णांना धूम्रपानाचे व्यसन होते. या कर्करोगाच्या ८० टक्के मृत्यू होण्यामागे धूम्रपानाची सवय कारणीभूत असल्याचे पुढे आले आहे.

तंबाखू आणि सिगारेटच्या नादाला लागून प्रौढांसोबतच युवावर्गाचा -हास होत आहे. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार तंबाखूच्या व्यसनामुळे युवकांना कर्करोग होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. विशेष म्हणजे या व्यसनामध्ये अडकणाऱ्या अनेकांना याचे दुष्परिणाम माहीत आहेत. मात्र तरीदेखील तरुण वर्गात तंबाखू सेवनाचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे वास्तव आहे.

-श्वसनरोगाच्या २० टक्के रुग्णांना धूम्रपानाचे व्यसन

अनेक रोगांच्या जन्माचे कारण तंबाखू आहे. गेल्या वर्षभरातील क्रिम्स हॉस्पिटलच्या श्वसनरोग विभागातील ३ हजार ८८६ रुग्णांच्या अभ्यास केल्यावर हे आढळले की, यातील २० टक्के रुग्णांना धूम्रपानाचे व्यसन होते. यावरून श्वसनरोगासाठी धूम्रपान एक महत्त्वाचे कारण असल्याचे स्पष्ट होते, असे मत श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी व्यक्त केले.

-२७ टक्के रुग्णांना सीओपीडी

धूम्रपान करणाऱ्या २७ टक्के रुग्णांना ‘क्रॉनिक आॅब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज’ (सीओपीडी) तर २३ टक्के रुग्णांना अस्थमा विकार असल्याचेही या अभ्यासातून पुढे आले. त्यामुळे या दोन विकारांसाठी धूम्रपान कारणीभूत ठरत असल्याचेही डॉ. अरबट म्हणाले.

-क्षयरोगात धूम्रपानाची सवय ठरतेय धोकादायक

मेडिकलच्या श्वसनरोग विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम म्हणाले, विभागात नोंद झालेल्या ६६२ क्षयरोगाच्या रुग्णांत ११ टक्के रुग्णांना धूम्रपानाची सवय होती. क्षयरोगाच्या रुग्णांसाठी ही सवय धोकादायक ठरते.

-फुप्फुसाचा कॅ न्सरच्या रुग्णांत धूम्रपान करणारे सर्व पुरुषच

डॉ. मेश्राम म्हणाले, मेडिकलमध्ये नोंद झालेल्या फुप्फुसाच्या कॅन्सरच्या १०० रुग्णांमध्ये पुरुषांची संख्या ५८ तर महिलांची संख्या ४२ आहे. यात धूम्रपानाचे व्यसन असलेल्यांचे प्रमाण ४२ टक्के आहे आणि हे सर्व पुरुष आहेत.

- मला काही होणार नाही; हा विचारच धोकादायक 

तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांमध्ये मला काही होणार नाही; हा विचारच धोकादायक ठरतो. तंबाखूचे कुठल्याही प्रकारातील सेवन निश्चित घात करणारे असते.

-डॉ. अशोक अरबट, ज्येष्ठ श्वसनरोग तज्ज्ञ

-धूर हा फुप्फुसासाठी विषच 

धूम्रपान करणाऱ्यांना व धूम्रपान करणाऱ्यांच्या सानिध्यात राहणाऱ्यांना फुप्फुसाचा कर्क रोग होण्याचा धोका तेवढात असतो. धूर फुप्फुसांसाठी विषाप्रमाणेच असतो. मेडिकलच्या अभ्यासातून पुढे आलेल्या फुप्फुसाच्या कॅन्सरचे ५८ टक्के रुग्ण धूम्रपान करणारे नव्हते.

- डॉ. सुशांत मेश्राम, श्वसनरोग विभाग, मेडिकल

Web Title: World No Tobacco Day; 48% of lung cancer patients are addicted to smoking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.