जागतिक तंबाखू विरोधी दिन; धूम्रपान करणाऱ्यांना कोरोना गंभीरतेचा धोका अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 08:24 AM2021-05-31T08:24:36+5:302021-05-31T08:25:48+5:30
Nagpur News सातत्याने धूम्रपान करणाऱ्या चारजणांपैकी किमान एकाला ‘सीओपीडी’ (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज) होण्याचा अधिक धोका असतो. धूम्रपान करणाऱ्यांपैकी ४० टक्के जणांना गंभीर स्वरुपाचा दमा होतो आणि त्यातील अर्धेअधिक लोकांना ‘सीओपीडी’ही होत असल्याचे श्वसन रोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संकटाने गंभीर रूप धारण केले आहे. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीस कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याची तीव्रता वाढते. शिवाय, सातत्याने धूम्रपान करणाऱ्या चारजणांपैकी किमान एकाला ‘सीओपीडी’ (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज) होण्याचा अधिक धोका असतो. धूम्रपान करणाऱ्यांपैकी ४० टक्के जणांना गंभीर स्वरुपाचा दमा होतो आणि त्यातील अर्धेअधिक लोकांना ‘सीओपीडी’ही होत असल्याचे श्वसन रोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कोरोना विषाणू हा माणसाच्या श्वसनसंस्थेवरच हल्ला करतो. या आजारात श्वसनमार्गावर सूज येते. गंभीर स्वरुपाचा निमोनिया होतो. श्वास घेण्यास अडथळा येतो आणि शरीरातील ऑक्सिजन पुरवठा कमी होत जातो. धूम्रपानामुळे फुफ्फुसाची क्रियाशक्ती कमी झालेली असते. यात कोरोनाचा संसर्ग झाल्यास श्वास घेण्यास अडथळा निर्माण होण्याची प्रक्रिया वेगाने होते. यामुळे सिगारेटचे व्यसन सोडण्याचा सल्ला श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी दिला.
-धूम्रपान करणारे सात हजारांहून रसायनाचा संपर्कात येतात
तज्ज्ञांच्या मते, धूम्रपानाद्वारे तंबाखू घेणारे सात हजारांहून अधिक रसायनांच्या संपर्कात येतात. यातील सुमारे २५० रसायने घातक, तर सुमारे ६९ रसायने कर्करोगाला कारणीभूत ठरणारी असतात. भारतात आढळणाऱ्या एकूण कर्करुग्णांमध्ये ३० टक्के मुखाचा, तसेच फुफ्फुसांचा कर्करोग झालेले असतात.
-धूम्रपानामुळे मृत्यूचा धोका १४ पट
धूम्रपानामुळे फुफ्फुसे, घसा किंवा मुखाच्या कर्करोगाने मृत्यूचा धोका १४ पटीने वाढतो. अन्ननलिकेच्या कर्करोगाने मृत्यूचा धोका चारपटीने वाढतो. हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू होण्याचा धोका दुप्पट, तर मूत्राशयाच्या कर्करोगाने मृत्यू होण्याचा धोकाही दुप्पटीने वाढतो.
-धूम्रपान सोडल्यास ५० टक्क्यांनी धोका कमी होतो
‘सीओपीडी’, हृदय व हृदयरक्तवाहिनीसंबंधीतील आजार (कार्डिओव्हस्क्युलर डिसीज) आणि फुफ्फुसांचा कर्करोग यासाठी धूम्रपान हा एक प्रमुख घटक आहे. परंतु, धूम्रपान सोडल्यास फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचा धोका ५० टक्क्यांनी कमी होतो.
-धूम्रपानाची सवय मोडणे शक्य
धूम्रपानाची सवय मोडणे कठीण असले तरी ते शक्य आहे. तंबाखूतील रासायनिक उत्तेजित घटक ‘निकोटीन’ हा व्यसन लावणारा घटक आहे. यामुळे याची तीव्र इच्छा होत राहते; परंतु सुदैवाने ही तीव्र इच्छा आणि निकोटीन सोडल्यानंतर दिसणारी लक्षणे यांच्यावर नियंत्रण मिळविण्यास मदत करणारे वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत.
-डॉ. अशोक अरबट
श्वसनरोग तज्ज्ञ