जागतिक महासागर दिन; काय सांगता, समुद्राच्या पाण्याखाली हाेता विदर्भ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2022 08:00 AM2022-06-08T08:00:00+5:302022-06-08T08:00:06+5:30

Nagpur News पृथ्वीवर असलेले पहिले जीवाष्म आणि अतिप्राचीन खडकांच्या चंद्रपूर, यवतमाळ भागात आढळणाऱ्या पुराव्यातून काही काेटी वर्षापूर्वी विदर्भ समुद्राच्या पाण्याखाली हाेता, हे सिद्ध हाेते.

World Oceans Day; What do you say, Vidarbha under the sea water? |  जागतिक महासागर दिन; काय सांगता, समुद्राच्या पाण्याखाली हाेता विदर्भ?

 जागतिक महासागर दिन; काय सांगता, समुद्राच्या पाण्याखाली हाेता विदर्भ?

googlenewsNext
ठळक मुद्दे२०० ते ६ काेटी वर्षापूर्वी अस्तित्वपहिले जीवाष्म, प्राचीन खडक व काेळसा हे पुरावे

निशांत वानखेडे

नागपूर : आपल्या विदर्भात कधीकाळी समुद्र हाेता, असे आज जर कुणी सांगितले तर मस्करी केल्यासारखे वाटेल, पण ती मस्करी नाही, सत्य आहे. या परिसरात मुबलक प्रमाणात असलेला काेळसा समुद्राचे अस्तित्व दर्शविताेच. मात्र पृथ्वीवर असलेले पहिले जीवाष्म आणि अतिप्राचीन खडकांच्या चंद्रपूर, यवतमाळ भागात आढळणाऱ्या पुराव्यातून काही काेटी वर्षापूर्वी विदर्भ समुद्राच्या पाण्याखाली हाेता, हे सिद्ध हाेते.

आपली पृथ्वी, पर्यावरण आणि अंतराळ असंख्य आश्चर्यांनी भरले आहे आणि विदर्भातील समुद्र हे त्यातीलच आश्चर्य हाेय. हवामान, पर्यावरण व पुरातत्व अभ्यासक प्रा. सुरेश चाेपणे यांनी समुद्राच्या अस्तित्वाचा दावा केला आहे. यवतमाळ जिल्ह्यात वणी व बाेर्डा या भागात अनेक वर्षापूर्वी झालेल्या भूकंपाचा अभ्यास करताना प्रा. चाेपणे यांना प्राचीन जीवाष्माचे अवशेष आढळून आले. त्यावर गेल्या अनेक वर्षापासून ते अभ्यास करीत आहेत.

२०० कोटी वर्षादरम्यान ‘निओप्रोटेरोझोईक’ काळात असलेल्या समुद्रात तयार झालेल्या चुनखडकात ‘स्ट्रोमॅटोलाईट’ सूक्ष्म जीवष्मे चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात सापडली. ही पृथ्वीवरील सर्वात पहिली जीवाष्मे मानली जातात व त्यापासून पुढे डायनाेसारसारखे विशालकाय व मानवासारखे बुद्धिमान सजीव तयार झाले. याशिवाय चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात आढळतात ते चुनखडक, शेल खडक आणि क्वार्टझाईट खडक ही समुद्रातच तयार हाेतात. याशिवाय या परिसरात काेळशाचा मुबलक साठा असणे हे समुद्राचे पुरावे आहेत. अनेक नद्या त्यांच्या प्रवाहात झाडे व इतर अवशेष वाहून आणतात व समुद्रात मिळतात. समुद्र नामशेष झाला पण त्या अवशेषातून तयार झालेला काेळसा मुबलक राहिला.

- प्रा. चाेपणे यांच्या मते ५४ ते २५ काेटी वर्षापूर्वी संपूर्ण पृथ्वीवर ‘पॅजिया’ हा एकच भूखंड हाेता व सभाेवताल समुद्र हाेता.

- साधारणत: ४०० ते २०० काेटी वर्षापासून हिमालयापासून विदर्भात व दक्षिणेकडेही समुद्राचे अस्तित्व हाेते. याला ‘टेथिस’ समुद्र असेही म्हटले जाते.

- पुढे भूगर्भीय हालचालींमुळे समुद्र तुटायला लागले व भूखंड वर येत गेला. ऑस्ट्रेलियाजवळ असलेला आपला भारत उत्तरेकडे सरकत आज आहे तेथे पाेहचला.

- या परिसरात डायनाेसारसारखे अस्तित्वही हाेते. त्याचेही अनेक पुरावे आपल्याकडे सापडतात.

- साधारणत: ६ काेटी वर्षापूर्वी ‘क्रीटाशिअस’ काळात माेठ्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला. या ज्वालामुखीचा लाव्हा काही लाख वर्षे थांबून थांबून वाहत राहिला. यामध्ये डायनाेसारसह असंख्य जीव मृतप्राय झाले.

 त्यामुळे विदर्भाचा भूभाग वर आला व समुद्र दक्षिणेकडे सरकत गेला.

प्राचीन ग्रॅनाईट, क्वार्टझाईट खडक व शेल खडकांचे असंख्य पुरावे आपल्या विदर्भात सापडतात. क्रिटॅशियस काळात भूगर्भाच्या घडामाेडीमुळे समुद्र दूर गेला व चिखलाचे चुनखडकात रुपांतर झाले. काेट्यवधी वर्षापूर्वीच्या समुद्री जीवांचे जीवाष्म आजही सापडतात. विदर्भात समुद्र हाेता हे सांगण्यासाठी पुरेसे आहेत. यावर आणखी संशाेधन हाेणे गरजेचे आहे.

- प्रा. सुरेश चाेपणे, पुरातत्व अभ्यासक.

Web Title: World Oceans Day; What do you say, Vidarbha under the sea water?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.