वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : स्वादिष्ट संत्र्याच्या हलव्याने वाढविला गोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 09:50 PM2019-01-18T21:50:53+5:302019-01-18T22:12:53+5:30
नागपुरी संत्र्यापासून तयार होणाऱ्या हलव्याचा स्वादिष्ट स्वाद चाखण्यासाठी नागपूरकर सज्ज होते. विशेषत: महिलांसह पुरुषांनाही रेशीमबाग येथे आयोजित वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये शुक्रवारी दुपारपासूनच गर्दी केली होती. नामांकित शेफ विष्णू मनोहर यांनी संत्री आणि सालीचा उपयोग करून ७०० पेक्षा जास्त किलो हलवा तयार करून सर्वांची मने जिंकली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरी संत्र्यापासून तयार होणाऱ्या हलव्याचा स्वादिष्ट स्वाद चाखण्यासाठी नागपूरकर सज्ज होते. विशेषत: महिलांसह पुरुषांनाही रेशीमबाग येथे आयोजित वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये शुक्रवारी दुपारपासूनच गर्दी केली होती. नामांकित शेफ विष्णू मनोहर यांनी संत्री आणि सालीचा उपयोग करून ७०० पेक्षा जास्त किलो हलवा तयार करून सर्वांची मने जिंकली. सर्वांनी स्वादिष्ट हलव्याचा स्वाद घेऊन आनंद व्यक्त केला आहे. संत्र्यापासून हलवा तयार करता येऊ शकतो, याबद्दल विष्णू मनोहर यांचे उपस्थितांनी अभिनंदन केले. या निमित्ताने त्यांच्या जागतिक विक्रमाच्या यादीत आणखी एक भर पडली. हा विक्रम शेतकरी बांधवांना समर्पित केल्याची प्रतिक्रिया विष्णू मनोहर यांनी दिली.
विष्णू मनोहर यांनी संत्र्यापासून हलवा तयार करण्याची प्रक्रिया दुपारी ४ वाजता सुरू केली. एक-एक वस्तू १२० किलो वजनाच्या अॅल्युमिनियमच्या कढईत टाकत असताना उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह होता. हलवा तयार करण्यासाठी २५०० संत्री, ५० किलो रवा, ५० किलो साखर, १५० किलो ऑरेंज क्रॅश (साखर व संत्र्याचा रसापासून तयार केलेला पाक), ५० किलो शुद्ध तूप, ५० लिटर दूध, १० किलो काजू आदी सामग्रीचा उपयोग करण्यात आला. दीड तासानंतर सायंकाळी ५.३० च्या सुमारास हलवा तयार झाला. त्यावेळी मंडपात हलव्याचा सुवास दळवळत होता. प्रत्येकजण चव चाखण्यासाठी आतूर होता. यादरम्यान सर्वांना हलवा तयार करण्याची प्रक्रिया मनोहर यांनी महिलांना समजावून सांगितली. संत्र्याच्या उपयोग करून चविष्ट हलवासुद्धा तयार होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया महिलांनी दिली. त्यावेळी उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
अशा पाककृतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार : विष्णू मनोहर
महिलांनी संत्र्याचा जास्तीत जास्त उपयोग करून पाककृती तयार कराव्यात. यामुळे संत्र्याची विक्री वाढले आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चितच भर पडेल. संत्र्याच्या सालीपासूनही विविध पदार्थ तयार करता येतात. अशा इव्हेंटमुळे लोकांमध्ये उत्साह निर्माण होतो. या उपक्रमासाठी विष्णू मनोहर यांची २५ जणांची चमू कार्यरत होती. त्यांना सखी मंचच्या सदस्या, विजय जथे, प्रफुल्ल देशकर, प्रवीण सिंग, अश्विन ढोमणे, सुचिता सहस्त्रभोजनी, अपर्णा मनोहर, दिपाली ढोमणे, वसुंधरा मनोहर, तनुजा मनोहर यांनी सहकार्य केले.