वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल; विदेशी तज्ज्ञांनी सांगितल्या संत्रा उत्पादनाच्या पद्धती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:43 PM2019-01-21T12:43:20+5:302019-01-21T12:44:01+5:30
नागपूर: नागपुरात सुरू असलेल्या वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये रविवारी देशविदेशच्या तज्ज्ञांनी संत्रा उत्पादनाच्या विविध पद्धती शेतकऱ्यांसमोर विशद केल्या. यात श्रीलंका व कंबोडियातील प्रतिनिधी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: नागपुरात सुरू असलेल्या वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये रविवारी देशविदेशच्या तज्ज्ञांनी संत्रा उत्पादनाच्या विविध पद्धती शेतकऱ्यांसमोर विशद केल्या. यात श्रीलंका व कंबोडियातील प्रतिनिधी उपस्थित होते.
संत्रा उत्पादनात भारत आघाडीवर : विथानागे डॉन लेसली
संत्री व अन्य लिंबूवर्गीय फळांमध्ये भरपूर औषधी गुण आहेत. त्यामुळे या फळांचे उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. परंतु, ही फळे गुणवत्तापूर्णही असायला पाहिजे. या क्षेत्रात भारत बराच पुढे आहे, असे मत श्रीलंकेच्या कृषी विभागाचे प्रधान शास्त्रज्ञ विथानागे डॉन लेसली यांनी वर्ल्डऑरेंज फेस्टिव्हलमध्ये ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
भारतामध्ये संत्र्याचे उत्पादन घेण्याचे तंत्रज्ञान प्रगत आहे. विदर्भातील संत्रा शेती पाहिल्यानंतर याचा अनुभव येतो. श्रीलंकेत अशीच संत्रा शेती करण्याचे स्वप्न आहे. वर्ल्डऑरेंज फेस्टिव्हलमधून मिळालेल्या अनुभवाचा श्रीलंकेला फायदा होईल. असे महोत्सव नियमित आयोजित केल्यास शेतकऱ्यांना चांगले मार्गदर्शन मिळू शकते. शेतकऱ्यांना केवळ दिशा दाखविण्याची आवश्यकता असते. त्यानंतर ते आपोआप पुढे जातात. एवढेच नाही तर, हे महोत्सव प्रगत शेतकऱ्यांना त्यांचे कौशल्य जगापुढे आणण्याचे व्यासपीठ मिळवून देते. संशोधकांनाही त्यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळते. दोन्ही बाजूने ज्ञानाची आदानप्रदान होते असे लेसली यांनी पुढे बोलताना सांगितले.
७० टक्के संत्रा उत्पादन घरीच होते : अरुनाथिलाके
श्रीलंका येथे ७० टक्के उत्पादन घर उद्यानात तर, केवळ ३० टक्के संत्रा उत्पादन शेतीमध्ये होते. त्यामुळे संत्र्याची मागणी पूर्ण होत नाही. संत्रा उत्पादनात वाढ करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा लागणार आहे असे श्रीलंकेतील कृषी विभागाचे संशोधक गमाराल्लागे निशांथा अरुनाथिलाके यांनी वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. त्याचा उपयोग श्रीलंकेत केला जाऊ शकतो. श्रीलंका येथील वातावरण संत्रा पिकासाठी योग्य नाही. त्यामुळे हे फळ श्रीलंकेचे मुख्य पीक होऊ शकले नाही. परंतु, महाराष्ट्रातून आयात करण्यात येणाऱ्या संत्र्यांनी श्रीलंकन नागरिकांची मने जिंकली आहेत. श्रीलंका मुख्यत: भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान व अफगाणिस्तान येथून संत्री आयात करतो. नागपूरमध्ये पूर्ण शेतीमध्ये संत्र्याचे पीक घेतले जाते. त्यासोबत इतर पिके घेतली जात नाही. श्रीलंका येथे असे होणे गरजेचे आहे. सध्या येथे काही भागात संत्रा व काही भागात दुसरे पीक घेतले जाते. हे चित्र बदलणे आवश्यक आहे.
कम्बोडियामध्ये संत्रा संशोधनाची गरज : काँग वॉचिजम
कम्बोडियातील आंबा निर्यात होतो. परंतु, संत्र्याचे उत्पादन केवळ कम्बोडियातील मागणीपुरते मर्यादित आहे. त्यामुळे कम्बोडियामध्ये संत्र्याचे उत्पादन वाढविण्यासाठी अधिक संशोधन करण्याची गरज आहे असे मत कम्बोडिया येथील कृषी-उद्योग विभागाच्या प्रक्रिया व्यवस्थापन शाखेचे वरिष्ठ अधिकारी काँग वॉचिजम यांनी वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये संत्र्याच्या अनेक जाती पहायला मिळाल्या. या जाती मौल्यवान आहेत. भारतात संत्रा पिकावर होत असलेले संशोधन प्रशंसनीय आहे. कम्बोडियामध्ये अशाच संशोधनाची आवश्यकता आहे. सध्या कम्बोडियामध्ये उत्पादित होणारी संत्री ९० टक्के गोड आहेत. कम्बोडियामध्ये चीन व थायलंडमधून संत्री आयात केली जातात. कम्बोडियन नागरिक केवळ संत्री खातात किंवा संत्र्याचा रस काढून पितात. इतर प्रक्रिया केलेली उत्पादने वापरत नाहीत. कम्बोडिया येथे पुओसाट व बट्टामबंग या दोन जातीच्या संत्र्यांसह कोह ट्रोन्ग पोमेलो व लिंबू या दोन लिंबूवर्गीय फळांचेही उत्पादन होते. असे वॉचिजम यांनी सांगितले.
कम्बोडियामध्ये वर्षभरात एकच पीक होते : फान हॉर
कम्बोडिया येथे उन्हाळा व पावसाळा हे दोनच ऋतू आहेत. त्यामुळे वर्षभरात संत्र्याचे एकच पीक घेता येते, अशी माहिती कम्बोडिया येथील कृषी-उद्योग विभागाच्या प्रक्रिया व्यवस्थापन शाखेचे उपमुख्य अधिकारी फान हॉर यांनी वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये ‘लोकमत’शी बोलताना दिली. कम्बोडिया येथे पुओसाट व बट्टामबंग या दोन जातीच्या संत्र्यांचे उत्पादन घेतले जाते. सध्याची परिस्थिती लक्षात घेता कम्बोडियामध्ये संत्रा उत्पादन वाढणे गरजेचे आहे. वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये विविध प्रकारची संत्री पहायला मिळाली. नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. कम्बोडियामध्ये परत गेल्यानंतर येथील अनुभव संत्रा उत्पादकांशी वाटेल. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल हा विश्वास आहे. कम्बोडियामध्ये संत्रा संशोधनासाठी बराच वाव आहे. अजूनही बरेच पुढे जायचे आहे. हा वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल शेतकऱ्यांसाठी उपयोगी सिद्ध झाला आहे. असे फेस्टिव्हल नियमित झाले पाहिजे. कम्बोडिया सरकार शेतीमध्ये कंत्राट पद्धतीचा अवलंब करते. त्यामुळे शेतकऱ्यांनी संत्र्यासह कोणतेही पीक घेतल्यास त्याला बाजारपेठ व चांगली किंमत उपलब्ध होते असे हॉर यांनी सांगितले.