वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : नागपूरकरांनी अनुभवला कार्निव्हलचा झगमगाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 08:35 PM2019-01-20T20:35:11+5:302019-01-20T20:54:45+5:30
ऑरेंज मॉस्कॉटच्या गमतीजमती, लॉंग मॅन, मिरर मॅनच्या करामती, नेत्रदीपक फ्लोटचा कॉनव्हाय, डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या रशियन आणि युक्रेनच्या तरुणी, आफ्रिकन अॅक्रोबेटच्या चित्तथरारक कवायती, बटरफ्लाय गर्ल्सचा झगमगाट, मराठमोळ्या शिवसंस्कृती ढोलताशा पथकाचे व लेझीम पथकाचे दणकेबाज सादरीकरण, असा देशी आणि विदेशी संस्कृतीचा सुरेख संगम नागपूरकरांनी वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलच्या कार्निव्हल परेडमध्ये अनुभवला. उपराजधानीत सलग दुसऱ्या वर्षी कार्निव्हल परेडचे आयोजन झाले. रविवार सुटीचा दिवस असल्याने नागपूरकरांची सायंकाळ खऱ्या अर्थाने रंजक ठरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑरेंज मॉस्कॉटच्या गमतीजमती, लॉंग मॅन, मिरर मॅनच्या करामती, नेत्रदीपक फ्लोटचा कॉनव्हाय, डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या रशियन आणि युक्रेनच्या तरुणी, आफ्रिकन अॅक्रोबेटच्या चित्तथरारक कवायती, बटरफ्लाय गर्ल्सचा झगमगाट, मराठमोळ्या शिवसंस्कृती ढोलताशा पथकाचे व लेझीम पथकाचे दणकेबाज सादरीकरण, असा देशी आणि विदेशी संस्कृतीचा सुरेख संगम नागपूरकरांनी वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलच्या कार्निव्हल परेडमध्ये अनुभवला. उपराजधानीत सलग दुसऱ्या वर्षी कार्निव्हल परेडचे आयोजन झाले. रविवार सुटीचा दिवस असल्याने नागपूरकरांची सायंकाळ खऱ्या अर्थाने रंजक ठरली.
विजय दर्डांनी केले अवलोकन
लक्ष्मीनगर आठ रस्ता चौकातून निघालेल्या कार्निव्हल परेडची नागपूरकर अनुभूती घेत असतानाच लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनीही हॉटेल अशोकाच्या समोरून कार्निव्हल परेडचा आनंद लुटला. फ्लोटचा काफिला, कलावंतांचे सादरीकरण आणि नागपूरकरांचा कार्निव्हलला मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला.
अशी होती कार्निव्हल परेड
आठ रस्ता चौकातून सायंकाळी ५ वाजता शंखनाद होताच कार्निव्हल परेडला सुरुवात झाली. परेडच्या सुरुवातीलाच ऑरेंज मॉस्कोट, बायकर्सचा समूह, लाँग मॅन आणि मिरर मॅन, आफ्रिकन अॅक्रोबेट, बटरफ्लाय गर्ल, कार्निव्हल परेडचे संचलन करणारे शिवसंस्कृती ढोलताशा पथक, या पथकाच्या मागे मेजर हेमंत जकाते शाळेचे लेझिम पथक, स्केटिंग करणारी मुले, त्यापाठोपाठ नेत्रदीपक फ्लोटस् (चित्ररथ) यात प्लास्टो कंपनीचा फ्लोट, व्हीक्को कंपनीचा फ्लोट, ओसीडब्ल्यू, रोकडे ज्वेलर्स, हल्दीराम, मेट्रो व अन्य दोन आाकर्षक फ्लोट यात समाविष्ट होते.
नागपूरकरांनी लुटला आनंद
अनेकानी गोव्यात अथवा विदेशात कार्निव्हल अनुभवला असेल. पण नागपूरकर गेल्या दोन वर्षांपासून वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलनिमित्त काढण्यात येणाऱ्या कार्निव्हलचा आनंद लुटत आहे. लक्ष्मीनगर चौक ते आठ रस्ता चौकदरम्यान नागपूरकरांची उत्सुकता, उत्साह दिसून आला. मार्गात रस्त्याच्या दुतर्फा नागपूरकरांनी प्रचंड गर्दी केली होती. कार्निव्हलची दृश्ये अनेकांनी कॅमेराबद्ध केली. आकर्षक चित्ररथांसोबत अनेकांनी सेल्फी काढून घेतल्या. विदेशी नृत्यावर रशियन तरुणीच नव्हे तर नागपूरकर रसिकांनीही ठेका धरला होता. ज्येष्ठ नागरिकांनी तर गॅलरीतूनच हा सर्व जल्लोष अनुभवला.
शिवसंस्कृतीचा दणदणाट, लेझीमचा छणछणाट
कार्निव्हल परेडचा दणदणाट संपूर्ण परिसरात गरजला तो शिवसंस्कृती ढोलताशा पथकामुळे. पथकात ५० ते ६० युवक-युवतींनी आपल्या शिस्तबद्ध वादनाने संपूर्ण कार्निव्हलचा मार्ग दणाणून सोडला. त्याचबरोबर मेजर हेमंत जकाते शाळेच्या ३५ विद्यार्थ्यांनी मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वस्त्र परिधान करून लेझीमच्या छणछणाटाने कार्निव्हल परेडमध्ये रंगत आणली.
विदेशी बालांचा देशी ठुमका...
कार्निव्हलचे खरे आकर्षण ठरले ते रशियन अन् युक्रेनच्या तरुणी. पांढऱ्याशुभ्र पोशाखात विदेशी वाद्य वाजवित कार्निव्हल परेडमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. दुसरीकडे युक्रेनच्या तरुणींनी देशी संगीतावर फेर धरून जोरदार ठुमका लावला. अख्ख्या कार्निव्हल परेडमध्ये नागपूरकरांनी त्यांना आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केले. त्यांनीही हात उंचावत नागपूरकरांच्या उत्साहात भर घातली.
क्षणचित्रे...
- अझका बनच्या गेमिंग झोनच्या फ्लोटवर एडीए ग्रुपचे दमदार सादरीकरण, रशियन आर्टिस्ट इस्मीचा पारंपारिक पोशाखात फ्री स्टाईल डान्स
- ओसीडब्ल्युने दिला आकर्षक फ्लोटच्या माध्यमातून पाणी बचतीचा संदेश
- व्हिको आयुर्वेदच्या फ्लोटने केली आयुर्वेदाबाबत जनजागृती
- मेट्रोच्या फ्लोटने वेधले नागपूरकरांचे लक्ष
- हल्दिरामच्या फ्लोटची आकर्षक सजावट, संत्र्याच्या पदार्थांचे प्रदर्शन
- आफ्रिकन अॅक्राबेट्सच्या चित्तथरारक कवायती
- स्केटिंगवर लहान मुलांची स्टंटबाजी
- भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या फ्लोटचा सहभाग
- मिरर मॅन अन् लाँग मॅनच्या गमतीदार करामती
- ऑरेंज मॉस्कोटशी हस्तांदोलन करण्यासाठी चिमुकल्यांची चढाओढ
- बटर फ्लाय गर्ल्सनी उधळल्या रंगीबेरंगी छटा
- फुग्यांची आकर्षक सजावट अन् नेत्रदीपक रोशनाई
- नागपूरकर कलावंतांकडून संगीताची मेजवानी
- प्लॅस्टोने वाटले छोट्या टाकीचे वाण
- रस्त्याच्या दुतर्फा अन् गॅलरीत झाली गर्दी
- तरुणाईने सेल्फी घेत लुटला कार्निव्हलचा आनंद