वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल; कोरियातील संत्रा उत्पादन वेगात घटत आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 11:32 AM2019-01-19T11:32:47+5:302019-01-19T11:35:01+5:30
कोरियातील संत्रा उत्पादन वाढण्याऐवजी सतत कमी होत आहे, अशी खंत जेजू नॅशनल युनिव्हर्सिटीतील हॉर्टिकल्चर प्लांट जेनेटिक अॅन्ड इंडस्ट्रीचे प्राध्यापक डॉ. क्वान जेओंग सांग यांनी व्यक्त केली.
सोपान पांढरीपांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनाप्रमाणे किंमत मिळत नसल्यामुळे कोरियातील शेतकरी संत्रा उत्पादनाबाबत फारसे उत्सुक नाहीत. परिणामी,कोरियातील संत्रा उत्पादन वाढण्याऐवजी सतत कमी होत आहे, अशी खंत जेजू नॅशनल युनिव्हर्सिटीतील हॉर्टिकल्चर प्लांट जेनेटिक अॅन्ड इंडस्ट्रीचे प्राध्यापक डॉ. क्वान जेओंग सांग यांनी व्यक्त केली.
‘लोकमत’च्या पुढाकाराने वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये शुक्रवारी त्यांनी ‘लोकमत’शी संत्रा उत्पादनासंदर्भात विस्तृत चर्चा केली. कोरियातील जेजू द्वीप येथे २० हजार हेक्टर जमिनीवर मॅन्डरीन जातीच्या संत्र्याची शेती केली जाते. कोरियात ७ लाख टन संत्र्यांची मागणी आहे. परंतु, उत्पादन केवळ ६ लाख टन होते. उर्वरित एक लाख टन संत्री अमेरिकेतून आयात केली जातात. याशिवाय कोरियात आंबे, केळी व अन्य फळांची आयात केली जाते. कोरियातील नागरिकांना इतर फळे आवडायला लागली आहेत. ते इतर फळांकडे आकर्षित झाले आहेत. त्यामुळे मॅन्डरीन संत्र्याची मागणी वेगात कमी होत आहे. परिणामी, किंमत कमी होऊन ३ ते ५ डॉलर किलो झाली आहे. त्या कारणाने शेतकऱ्यांना संत्र्याची शेती करणे नुकसानकारक झाले आहे अशी माहिती डॉ. सांग यांनी दिली. कोरियामध्ये अमेरिका व ब्राझिल येथून संत्रा ज्युस, जॅम व जेलीचेसुद्धा आयात होते. कोरियामध्ये मॅन्डरीन संत्र्याला ओन्जुमी लेगन म्हटले जाते. या संत्र्याची साल मऊ असते. हे संत्र खाण्यास गोड व रसदार आहे. परंतु, पसंती कमी होत आहे याकडे डॉ. सांग यांनी लक्ष वेधले.