वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : भारतीय पदार्थ नव्या रूपात जगासमोर सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 09:47 PM2019-01-21T21:47:47+5:302019-01-21T21:52:21+5:30
लोकमतच्या पुढाकाराने आयोजित वर्ल्डऑरेंज फेस्टिव्हलमध्ये सोमवारचा दिवस पाकशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी अगदीच स्पेशल ठरला. हॉटेलिंग आणि हॉस्पिटॅलिटीच्या क्षेत्रात करिअर करण्याची तयारी करीत असलेल्या या विद्यार्थ्यांना देशातील प्रसिद्ध कॉर्पोरेट शेफ गौतम मेहरिषी यांनी मार्गदर्शन केले. ही काही रेस नाही, ही मॅरेथान आहे जेथे सातत्याने शिकत जावे लागते. खाद्यपदार्थाच्या बाबतीत व्यक्ती तितक्या आवडी आहेत. त्यामुळे थाळीत अन्न सजविताना आधी अन्नातील भावनिकता समजून घ्यावी लागते, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकमतच्या पुढाकाराने आयोजित वर्ल्डऑरेंज फेस्टिव्हलमध्ये सोमवारचा दिवस पाकशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी अगदीच स्पेशल ठरला. हॉटेलिंग आणि हॉस्पिटॅलिटीच्या क्षेत्रात करिअर करण्याची तयारी करीत असलेल्या या विद्यार्थ्यांना देशातील प्रसिद्ध कॉर्पोरेट शेफ गौतम मेहरिषी यांनी मार्गदर्शन केले. ही काही रेस नाही, ही मॅरेथान आहे जेथे सातत्याने शिकत जावे लागते. खाद्यपदार्थाच्या बाबतीत व्यक्ती तितक्या आवडी आहेत. त्यामुळे थाळीत अन्न सजविताना आधी अन्नातील भावनिकता समजून घ्यावी लागते, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात ‘पार्टिसिपेशन विथ शेफ गौतम मेहरिषी’ या मार्गदर्शनपर कुकरी शोचे आयोजन करण्यात आले. यावेळी मेहरिषी यांनी विविध रेसीपी समजाविण्यासह या क्षेत्रात यशस्वी होण्याचा मंत्रही दिला. शासकीय हॉटेल मॅनेजमेंट संस्था, तिरपुडे कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट व तुली कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटसह विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी यावेळी सहभागी झाले होते. यावेळी मुंबईचे शेफ योगेश उटकर व नागपूरच्या अपर्णा कोलारकर यांचे खास सहकार्य होते. वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलचे निमित्त असल्याने अर्थातच संत्रा हा केंद्रस्थानी होता. मेहरिषी यांनी ऑरेंज व मसूर डाळीचे मिश्रण असलेला पदार्थ तसेच ऑरेंज चिल्ड सलाद हा पदार्थ त्यांच्या खास शैलीद्वारे तयार करून दाखविला. विविध पदार्थ तयार करताना त्यांनी विद्यार्थ्यांशी साधलेला मनोरंजनात्मक व माहितीपूर्ण संवाद खास ठरला. हॉस्पिटॅलिटीच्या क्षेत्रात करिअर किंवा व्यवसायाचा विचार करताना नफा आणि तोट्याचा विचार करू नका. या क्षेत्राचा विचार करताना तरुणांना पाश्चिमात्य व कॉन्टिनेंटल खाद्यपदार्थांचे आकर्षण असते. मात्र भारतात पदार्थांची समृद्ध परंपरा आहे, जी सर्वत्र पसरली आहे. विद्यार्थ्यांनी जागोजागच्या भारतीय रेसीपी जाणून घ्याव्या, आईच्या-आजीच्या रेसीपी समजून नव्या रूपात जगासमोर सादर केल्यास तुम्ही नक्की यशस्वी व्हाल, असा कानमंत्र त्यांनी यावेळी दिला.
फेस्टिव्हलअंतर्गत संत्र्याच्या थीमवर पाकशास्त्राच्या विद्यार्थ्यांची त्यांच्याच महाविद्यालयात स्पर्धा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी ऑरेंज कोल्ड कॉफी, ऑरेंज मंचुरियन, ऑरेंज रेसोटो, ऑरेंज फ्राईड राईस, ऑरेंज गुलाबजाम, ऑरेंज मटर पनीर, ऑरेंज संदेश अशा नानाप्रकारच्या रेसीपी तयार करून सादर केल्या.
प्रत्येक महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली व त्यांच्या व्यंजनांचे प्रदर्शन सोमवारी भरविण्यात आले. यातील सर्वोत्तम रेसीपी सादर करणाऱ्या तीन स्पर्धकांची गौतम मेहरिषी यांनी निवड केली व त्या विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही वितरीत करण्यात आले.
हे आहेत विजेते
प्रथम : संजय वर्मा, तुली कॉलेज
द्वितीय : अंकुश वर्मा, तुली कॉलेज
तृतीय : अफराज रंगवाला, शासकीय हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज