वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : संजीव कपूर यांच्या कुकरी शोमध्ये रमल्या सखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 10:38 PM2019-01-20T22:38:38+5:302019-01-20T22:43:33+5:30
‘संत्रे का धन्यवाद, संत्रे को वर्ल्ड फेमस बनानेवाले लोकमत का भी धन्यवाद’ असे म्हणत ‘फिटनेसची कुठली रेसिपी नसते, कुठल्याही गोष्टीची अती नको, जे जेवण घरी मिळते ते सर्वात बेस्ट असते. त्यामुळे गृहिणींच्या जेवणात कमतरता काढण्यापेक्षा त्यात चांगलेपणा शोधा. सर्वांचे डाएट वेगळे असते, मात्र ऋतूनुसार मिळणारे ताजे अन्न शरीरासाठी सर्वोत्तम आहे’, अशा व्यंजनांच्या, यशाच्या आणि आयुष्याच्याही टिप्स मास्टरशेफ संजीव कपूर यांनी गृहिणींना दिल्या. संजीव यांच्या संवादमय कुकरी शोमध्ये नागपूरच्या सखी रमल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘संत्रे का धन्यवाद, संत्रे को वर्ल्ड फेमस बनानेवाले लोकमत का भी धन्यवाद’ असे म्हणत ‘फिटनेसची कुठली रेसिपी नसते, कुठल्याही गोष्टीची अती नको, जे जेवण घरी मिळते ते सर्वात बेस्ट असते. त्यामुळे गृहिणींच्या जेवणात कमतरता काढण्यापेक्षा त्यात चांगलेपणा शोधा. सर्वांचे डाएट वेगळे असते, मात्र ऋतूनुसार मिळणारे ताजे अन्न शरीरासाठी सर्वोत्तम आहे’, अशा व्यंजनांच्या, यशाच्या आणि आयुष्याच्याही टिप्स मास्टरशेफ संजीव कपूर यांनी गृहिणींना दिल्या. संजीव यांच्या संवादमय कुकरी शोमध्ये नागपूरच्या सखी रमल्या.
लोकमतच्या पुढाकाराने आयोजित वर्ल्ड ऑ रेंज फेस्टिव्हलअंतर्गत लोकमत सखी मंचतर्फे एलजी हिंग आणि जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या सहकार्याने प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांच्या कुकरी शोचे आयोजन रविवारी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात करण्यात आले. अर्थातच व्यंजनांची संकल्पनाही ऑरेंज हीच होती. संजीव यांच्यासोबत कुकरी शोमध्ये सहभागी होण्यासाठी १०० च्यावर सखींनी रेसिपी बनवितानाचे व्हिडीओ फेस्टिव्हलच्या वेबसाईटवर पाठविले होते. त्यातील निवडक ५८ व्यंजनांचे प्रदर्शन येथे लावण्यात आले. संत्रा बर्फी आणि आॅरेंज ज्यूस हेच आपल्याला माहीत आहे. मात्र यानिमित्ताने सखींनी तयार केलेल्या संत्र्याची चटणी, संत्र्याचे पराठे, त्रिगुणी संत्रा मोदक, अल्कोहोल नसलेली ऑरेंज जिंजर बीअर, ऑरेंज साबुदाणा पायसम (खीर), ऑरेंज व शेवयांचा शिरा, ऑरेंज चॉप्सी, संत्र्याचे शंकरपाळे, ऑरेंज फराळी ढोकळा, ऑरेंज बालुशाही, हलवा, पुरणपोळी, कुकीज, संत्र्याचे लोणचे अशा अनेक संत्रा व्यंजनांची चव चाखायला मिळाली.
संजीव कपूर यांच्या शोपूर्वी मुंबईचे शेफ योगेश उटीकर, अपर्णा कोलारकर, तिरपुडे कॉलेजचे प्रा. नायडू व सुजाता नागपुरे या परीक्षकांनी सर्वोत्तम ११ व्यंजनांची निवड केली. यानंतर संजीव कपूर यांनी त्यातील तीन विजेत्यांची निवड केली. या विजेत्यांना संजीव कपूर यांच्याहस्ते आकर्षक गिफ्ट देण्यात आले. यावेळी एलजी हिंग कंपनीच्या रिद्धी मर्चंट व जितोच्या अर्चना झवेरी उपस्थित होत्या. संजीव कपूर यांनी यावेळी ऑरेंज मोहितो व ऑरेंज चिप्की सलाद या डिशेस तयार केल्या. जवळपास दीड तास संजीव यांनी सखींशी संवाद साधला व त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
या आहेत विजेत्या
प्रथम : उषा ठक्कर (ऑरेंज फराळी ढोकळा)
द्वितीय : वर्षा केदार (ऑरेंज बालुशाही)
तृतीय : हर्षाली काईलकर (ऑरेंज रोल) व अश्विनी मेश्राम (ऑरेंज पायसम)