वर्ल्ड आॅरेंज फेस्टीव्हल : जग अनुभवणार नागपुरी संत्र्याचा गोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 12:42 AM2017-12-14T00:42:35+5:302017-12-14T00:42:53+5:30
शहरात सध्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अवघे सरकार नागपुरात आहे. परंतु चर्चा मात्र नागपुरी संत्र्याची होते आहे. याला कारणही तसेच आहे. संत्र्याची जगात वेगळी ओळख आहे
नागपूर : शहरात सध्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अवघे सरकार नागपुरात आहे. परंतु चर्चा मात्र नागपुरी संत्र्याची होते आहे. याला कारणही तसेच आहे. संत्र्याची जगात वेगळी ओळख आहे. येथील संत्र्याचे भारताच्या तसेच जगाच्या कानाकोप-यात ‘ब्रॅण्डिंग’ व्हावे व सोबतच येथील संत्रा उत्पादक शेतक-यांवर लक्ष केंद्रीत करून त्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नागपुरात १६, १७ व १८ डिसेंबर रोजी ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात येत आहे. या फेस्टिव्हलमध्ये संत्र्याविषयीचे देश-विदेशातील तज्ज्ञ, उत्पादक सहभागी होतील. या क्षेत्रात रोजगार आणि पर्यटनाची संधी, संत्र्याचे मार्केटिंग यावर विचारांचे आदान-प्रदान होऊन शेतकºयांच्या आर्थिक समृद्धीचा नवा मार्ग तयार केला जाणार आहे. संत्र्याची लागवड ते निर्यातीच्या सर्वंकष विषयावर चर्चेसोबतच जगभरातील पर्यटकांना या महोत्सवाकडे आकर्षित करण्यासाठी संगीत, कला, नृत्य, नाटकांची अनोखी मेजवानीही या महोत्सवात सादर होणार आहे. याच्या जोडीलाच चित्रकार, छायाचित्रकार, दुकानदारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून विजेत्यांसाठी लाखोंच्या बक्षिशांची लयलूट केली जाणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने अवघे जग नागपुरी संत्र्याचा गोडवा अनुभवणार आहे.
यांचे लाभतेय सहकार्य
यूपीएल समूह आणि बजाज इलेक्ट्रिक लिमिटेड हे या महोत्सवाचे प्रमुख प्रायोजक असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यांच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय नॉलेज पार्टनर- राज्य शासन कृषी विभाग, आॅरेंज ग्रोवर असोसिएशन आॅफ इंडिया, आयसीएआर- सेंट्रल सिट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ- अकोला, आर्टस् पार्टनर-कॅमलीन कोकुयो, स्टाईल पार्टनर- इंटिग्रीटी, एनर्जी पार्टनर-इंडियन आॅईल, रेडिओ पार्टनर- रेडिओ सीटी, टीव्ही पार्टनर- टाईम्स नाऊ, मीडिया पार्टनर-खूशी, गेम्स पार्टनर- निकोलडीन व डिजाईन पार्टनर-जे. जे. स्कूल आॅफ आर्ट, मुंबई यांचे या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य लाभत आहे. हा महोत्सव लोकमतचे इनेशिएटीव्ह असून ही संकल्पना व नियोजन टॅपलाईटचे आहे.
संत्र्यापासून तयार होणा-या रेसिपी शिका
प्रसिद्ध मास्टर शेफ विकी रत्नानी आपल्याला संत्र्यापासून नावीन्यपूर्ण रेसीपी बनवायला शिकवतील. टी.व्ही. स्टार व प्रसिद्ध आॅस्ट्रेलियन मास्टर शेफ सारा टोड जगभरात संत्र्यापासून तयार होणाºया रेसीपींचे प्रात्यक्षिक सादर करतील.
संत्रा उत्पादन ते निर्यात सर्वंकष चर्चा
१६, १७ व १८ डिसेंबर रोजी सुरेश भट सभागृहात विदर्भ, महाराष्ट्रासह पंजाब, आंध्रप्रदेश, मनीपूर आदी राज्यांसह इस्त्राईल, टर्की मधूनही संत्रा उत्पादक शेतकरी आणि कृषी तज्ज्ञ या महोत्सवात सहभागी होतील. संत्र्याचे उत्पादन कसे वाढवावे, गुणवत्ता कशी राखावी यावर ते आपल्या शेतकºयांना मार्गदर्शन करणार आहेत. संत्रा उत्पादक शेतकºयांना संत्रा लागवडीपासून ते संत्रा वाहतुकीपर्यंतच्या ‘आॅरेंज व्हॅलू चेन’ची माहिती विविध चर्चासत्र आयोजित करून दिली जाईल. याशिवाय विविध चर्चासत्र, प्रश्नोत्तरे, प्रात्यक्षिक व फळ प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले.
हॉट एअर बलून आकर्षण : या महोत्सवादरम्यान घेण्यात येणाºया विविध स्पर्धांमधील विजेत्यांना हॉट एअर बलून (टेथर्ड बलून)ची सफर घडविली जाणार आहे. मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या प्रांगणात हॉट एअर बलूनचा हा थरार अनुभवता येणार आहे.
लाईव्ह कॉन्सर्ट, कार्निव्हल परेड, मोबाईल स्टेज अन् बरेच काही
या तीन दिवसीय महोत्सवात प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांचे गायन होईल. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (ज्युनिअर) हिचे दिलखेचक नृत्य, अनुप सोनी आणि स्मिता बन्सलचे,सोनाली कुलकर्णी (सिनिअर) यांच्याशी मनसोक्त गप्पा आणि बॉलिवूडचे आघाडीचे गायक बेनी दयाल यांचा ‘लाईव्ह कॉन्सर्ट’ होईल. डीजे अकिल, डीजेद्वयी निना आणि मलिका तरुणांना आपल्या तालावर थिरकवणार आहेत. रॉकआॅन फेम ल्युक केनी रुपमती जॉलीबरोबर अनोखी सुुफी जुगलबंदी सादर करतील. या शिवाय युरोप, आफ्रिका, आशिया आणि आॅस्ट्रेलिया या खंडातून कलाकार येऊन आपली कला सादर करतील. नागपूरकरांसाठी ही एक सांस्कृतिक मेजवानी असेल. क्रीडा संकुल (मानकापूर), ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र या प्रमुख ठिकाणी कार्यक्रम होतील. याशिवाय शहरातीत महत्वाच्या ठिकाणी ‘मोबाईल स्टेज’ च्या माध्यमातून कलाकार आपली कला सादर करतील. त्यामुळे शहराच्या कानाकोपºयात राहणाºया नागपूरकरांना या महोत्सवाचा आनंद लुटला येर्ईल. महोत्सवादरम्यान जे.जे. स्कूल आॅफ आर्ट, मुंबई व नागपूरचे कलाकार मिळून नागपुरात विविध ठिकाणी संत्राविषयक प्रतिकृती उभारतील. या सोबतच बजाज इलेक्ट्रिक लिमिटेडने विशेष एलएडी इन्टॉलेशन तयार केले आहे. संत्र्यापासून तयार केलेला ताजमहाल, संत्र्यापासून साकारलेली आयफेल टॉवर आणि हत्तीची कलाकृती लक्षवेधी ठरतील. या महोत्सवात होणारी रविवारी १७ डिसेंबर रोजी संध्याकाळी होणारी ‘कार्निव्हल परेड’ ही महोत्सवाचा सर्वोच्च बिंदू असेल. यात नागपूरचे कलाकार सहभागी होतील. फिटनेस प्रोग्रामही आयोजित केले जातील. एकूणच महोत्सवातील तीन दिवस नागपूरकरांसाठी कार्यक्रमांची रेचलेच असेल.
उद्घाटनाला ज्येष्ठ मंत्र्यांची मांदियाळी
१६ डिसेंबर रोजी नागपुरातील सुरेश भट सभागृहात आयोजित वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलचे उद्घाटन सकाळी १०.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जलसंपदा व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह, कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत, राज्याचे ऊर्जा मंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल व ऊर्जा तसेच पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
रंजक स्पर्धा आणि आकर्षक पुरस्कार
या महोत्सवादरम्यान विविध स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. यामध्ये चित्रकलेच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार लॅण्डस्केप स्पर्धा होणार आहे. चित्रकलेतले बारकावे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी कला कार्यशाळेचे आयोजनही करण्यात आले आहे.
संपूर्ण तीन दिवस इन्स्टॉलेशनही होणार आहे. सोबतच या महोत्सवाचे वेगवेगळे मूडस् टिपण्यासाठी छायाचित्र स्पर्धा होणार आहे. हौशी व व्यावसायिक अशा दोन गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून प्रथम विजेत्याला ५१ हजारांचा रोख पुरस्कार दिला जाणार आहे. या महोत्सावादरम्यान शहरातील दुकानदारांसाठीही एक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत या दुकानदारांना आपली दुकाने संत्रा ही मध्यवर्ती संकल्पना ठेवून सजवायची आहेत. या स्पर्धेतील विजेत्यालाही ५१ हजारांचा रोख पुरस्कार दिला जाणार आहे.