जागतिक अवयवदान दिवस : राज्यात अवयवदानात नागपूर तिसऱ्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 11:11 PM2019-08-12T23:11:06+5:302019-08-12T23:14:19+5:30

अवयवदानात नागपूर राज्यात तिसऱ्या स्थानी आहे. या सहा वर्षांत ५२ मेंदुमृत व्यक्तीने १४४ अवयवांचे दान केले आहे.

World Organ Donation Day: Nagpur third in organ donation in the state | जागतिक अवयवदान दिवस : राज्यात अवयवदानात नागपूर तिसऱ्या स्थानी

जागतिक अवयवदान दिवस : राज्यात अवयवदानात नागपूर तिसऱ्या स्थानी

googlenewsNext
ठळक मुद्देसहा वर्षांत १४४ अवयवांची मदत : ५२ मेंदुमृत व्यक्तीकडून दान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवयवदानाचे अनन्यसाधारण महत्त्व आता समाजात रुजायला लागले आहे. विशेषत: नातेवाईक असह्य दु:खात बुडाले असताना स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला जात आहे. त्यांच्या या संयम आणि मानवतावादी भूमिकेमुळे अनेकांना नवे आयुष्य मिळत आहे. त्यांच्या जीवनात नवा आनंद भरला जात आहे. नागपुरात हा प्रयत्न २०१३ पासून सुरू झाला. आज अवयवदानात नागपूर राज्यात तिसऱ्या स्थानी आहे. या सहा वर्षांत ५२ मेंदुमृत व्यक्तीने १४४ अवयवांचे दान केले आहे.
मानवी जीवन वाचविण्यासाठी अवयवदान महादान आहे. मात्र मागणी व पुरवठा यात कमालीची तफावत आहे. हजारो रुग्णांना प्रत्यारोपणासाठी अवयव उपलब्ध होऊ शकत नसल्याने ते मृत्यूच्या दाढेत जगत आहेत. सध्याच्या स्थितीत भारतात दीड लाख मूत्रपिंडाची गरज असताना केवळ पाच हजार मूत्रपिंड उपलब्ध होतात. ५० हजार हृदयाची गरज असताना १०-१५ मिळतात तर ५० हजार यकृताची गरज असताना ७०० उपलब्ध होतात. परिणामी, एका-एका अवयवांसाठी अनेक दिवस वाट बघत आयुष्य कंठणाऱ्यांची संख्या वाढतच असल्याचे वास्तव आहे. ही संख्या कमी करण्यासाठी २०१३ मध्ये नागपुरात पहिल्यांदाच ‘झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटर’ (झेडटीसीसी) नागपूरची स्थापना झाली. या सेंटरचे पहिले अध्यक्ष वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. बी.जी. वाघमारे तर सचिव डॉ. रवी वानखेडे होते. त्यांच्या विशेष प्रयत्नातून नागपुरात अवयवदानाच्या चळवळीला सुरुवात झाली. नागपुरात पहिले अवयवदान अमित सिंग या १८ वर्षीय ‘ब्रेनडेड’ तरुणाकडून झाले. नंतर ही चळवळ वाढत गेली. डॉ. विभावरी दाणी या अध्यक्षस्थानी तर समन्वयिका म्हणून वीणा वाठोरे रुजू झाल्यावर गती आली. मेंदुमृत (ब्रेनडेड) व्यक्तीच्या अवयवदानात राज्यात नागपूर तिसऱ्या क्रमांकावर आले. पहिल्या क्रमांकावर मुंबई, दुसऱ्यावर पुणे तर चौथ्यावर औरंगाबाद आहे.
२०१८ मध्ये १८ व्यक्तींकडून अवयवदान
‘झेडटीसीसी’च्या प्रयत्नातून २०१३ मध्ये अवयवदानाला सुरुवात झाली. या वर्षी केवळ एकाच व्यक्तीकडून अवयवदान झाले. मात्र, त्यानंतर अवयवदानाची ही चळवळ वाढत गेली. २०१४ मध्ये तीन, २०१५ मध्ये चार, २०१६मध्ये सहा, २०१७ मध्ये १४ तर २०१८ मध्ये १८ ‘ब्रेनडेड’ व्यक्तीकडून अवयवदान करण्यात आले. जानेवारी ते जून २०१९ पर्यंत सात असे ५३ व्यक्तींकडून अवयवदान झाले.
९३ मूत्रपिंड, १३ हृदय, ३८ यृकत, दोन फफ्फुसाचे दान
२०१३ ते जुलै २०१९ या कालावधीत ९३ मूत्रपिंड काढण्यात आले. यातील ९१ मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण नागपूर विभागात तर दोन मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण मुंबई विभागात करण्यात आले. याच कालावधीत ११ हृदय काढण्यात आले. यातील तीन चेन्नई, एक दिल्ली, सात मुंबईत तर एक हृदय प्रत्यारोपण नागपूर विभागात करण्यात आले. गेल्या सहा वर्षांत ३८ यकृत काढण्यात आले. यातील पाच पुणे, एक औरंगाबाद, आठ मुंबई तर गेल्या दोन वर्षांत नागपूर विभागात २६ यृकताचे प्रत्यारोपण झाले. आतापर्यंत कवेळ दोनच फुफ्फुसाचे दान झाले. यातील एक मुंबई तर दुसरे तेलंगणा विभागात प्रत्यारोपण झाले.
लवकरच स्वादुपिंड प्रत्यारोपण
नागपूर विभागांतर्गत १० हॉस्पिटल नोंदणीकृत असून त्यांना अवयव प्रत्यारोपणाला मंजुरी मिळाली आहे. उपराजधानीत लवकरच स्वादुपिंड प्रत्यारोपण केंद्र सुरू होणार आहे. नागपूर विभागात एकाच रुग्णाला यकृत व मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले तर दुसऱ्या एका रुग्णाला दोन मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण करण्यात आले.
२३ वेळा झाले ग्रीन कॉरिडोअर
‘ब्रेनडेड’ व्यक्तीच्या शरीरातून हृदय काढल्यानंतर अवघ्या चार तासांत त्याचे प्रत्यारोपण करणे आवश्यक असते. तसेच यकृतासाठी सहा तास, फुफ्फुसांसाठी सहा तास आणि मूत्रपिंडासाठी ४८ तासांचा अवधी असतो. यामुळे ‘ग्रीन कॉरिडोअर’ महत्त्वाचे ठरते. नागपुरात हे ‘ग्रीन कॉरिडोअर’ वाहतूक पोलिसांच्या मदतीने २३ वेळा झाले.
अंधश्रद्धा, धार्मिक रुढी, परंपरेमुळे अवयवदानाचे प्रमाण कमी 


वेळेत अवयव दानासाठी दाता मिळाला असता व अवयव प्रत्यारोपण झाले असते तर कदाचित ते वाचले असते, असे वृत्त वाचतो, ऐकतो, हळहळतो. मात्र, घरच्याच कुणा व्यक्तीचे ‘ब्रेनडेड’ झाल्यास अवयव दान करण्यासाठी कुणीच पुढे येत नाही. आज भारतात हजारो लोक अवयव दानासाठी दात्यांच्या प्रतीक्षेत आयुष्याचे अखेरचे क्षण मोजत आहेत. अंधश्रद्धा, धार्मिक रुढी व परंपरा या कारणांमुळे अवयवदानाचे प्रमाण कमी आहे. ते वाढणे आवश्यक झाले आहे.
डॉ. रवी वानखेडे
सचिव, झेडटीसीसी नागपूर

Web Title: World Organ Donation Day: Nagpur third in organ donation in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.